–परिषदेच्या ‘मराठवाडा विकास पत्रिका‘ या मुखपत्राचे विमोचन
लातूर, प्रतिनिधी
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाड्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्याचा मानस असून त्यासाठी परिषदेचा केंद्रीय अभ्यास गट गठित करण्यात येईल असे प्रतिपादन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी नुकतेच येथे केले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेला त्यांनी भेट देऊन लातूर शहराच्या समस्यांची माहिती करून घेतली. यावेळी सदस्यांनी शहर विकासाच्या अनेक प्रश्नांना ऐरणीवर आणून त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे होते. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात झालेल्या या बैठकीस मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, सहसचिव प्रा. अशोक सिद्धेवाड (नांदेड), सुमंत गायकवाड (बीड) यांचीही उपस्थिती होती.
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून या बैठकीत परिषदेच्या ‘मराठवाडा विकास पत्रिका’ या मुखपत्राचा प्रथम अंकाचे विमोचनही डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते करण्यात आले.या मुखपत्राचे मानसेवी संपादक जयप्रकाश दगडे यांनी मुखपत्राच्या प्रकाशनाखालील भूमिका स्पष्ट करून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विकास प्रश्नांना व परिषदेच्या उपक्रमांना स्थान देण्यात येईल असे स्पष्ट केले.
मराठवाडा जनता विकास परिषदेची ही चळवळ राजकारणाशी संबंधित नसून केवळ संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा पाठपुरावा करणारे हे व्यासपीठ आहे तरुणांनी आता मराठवाड्याची अस्मिता जागती ठेवण्यासाठी परिषदेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करून डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी परिषदेच्या इतिहासात प्रथमच निघालेल्या या मुखपत्राचे वर्णन ‘ऐतिहासिक कामगिरी’ या शब्दात केले. मराठवाड्यावरील अन्याय दूर होऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्याची गरज असून मराठवाडावाशीयांनी परिषदेची ताकद वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य ॲड भारत साबदे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक मराठवाड्याला शासनाकडून मिळत असलेल्या असमान वागणुकीची पद्धतशीर मांडणी केली. मराठवाड्याला मिळणारा अत्यंत अपुरा निधी, निती आयोगापुढे तत्कालीन महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेले मराठवाड्याचे अर्धवट स्वरूप, मराठवाड्याचा रोड मॅप याविषयी त्यांनी आढावा घेतला. मराठवाड्याच्या विकासासाठी 48 आमदार आणि आठ खासदारांनी मिळून दबाव गट तयार करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. लातूर शहराच्या दहा प्रश्नांचा प्राधान्यक्रमही त्यांनी विस्ताराने सांगितला.
यावेळी डॉ. बीआर पाटील, प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, महेंद्र जोशी अशोक गोविंदपुरकर, प्रा. बीएस पळसकर, डॉ. सुरेखा काळे, राजकुमार होळीकर, प्रा. अर्जुन जाधव यांनीही यथोचीत भाषणे करून लातूर शहराच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या महानगर शाखेचे सचिव प्रा. विनोद चव्हाण यांनी महानगरशाखा स्थापनेपासून चा अहवाल सादर केला. बैठकीचे सूत्रसंचलन परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. सुधीर अनवले तर आभार प्रदर्शन किशोर जैन यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रा भालचंद्र येडवे, भीम दुनगावे, प्रा. शंकर भोसले, सौ शुभदा रेड्डी, प्रकाश घादगिने, रामानुज रांदड, ॲड. अमित रोडे आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ
-मराठवाडा जनता विकास परिषदेच्या ‘मराठवाडा विकास पत्रिका’ या मुखपत्राचे विमोचन लातूर मध्ये करताना मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.व्यंकटेश काब्दे, मानसेवी संपादक जयप्रकाश दगडे, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सोमनाथ रोडे, सहसचिव अशोक सिद्धेवाड, सुमंत गायकवाड, प्रा सुधीर अनवले.
-मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या बैठकीत बोलताना परिषदेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.व्यंकटेश काब्दे. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सोमनाथ रोडे, सहसचिव अशोक सिद्धेवाड, सुमंत गायकवाड.




