मराठी भाषा गौरव दिनी ‘मराठी’ ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा :
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिले सकारात्मक आश्वासन
नवी दिल्ली , 21 :
महाराष्ट्रमध्ये कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणुन साजरी केली जाती. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांना भेटून केली.

येथील परिवहन भवनमध्ये श्री देसाई यांनी श्री रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात आहे या विषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्वच निकष, अटींचे पालन केले असल्याचे केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांनी सांगितले. यासोबत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचेही याबाबत सकारात्मक दृष्टीकोण असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचे श्री रेड्डी यावेळी म्हणाले.

श्री देसाई यांनी केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना कुसूमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणा-या ‘मराठी भाषा गौरव दिना’ला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद होईल, असे श्री देसाई यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जनअभियानाचे रूप आले असल्याचे सांगुन श्री देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याची माहिती श्री रेड्डी यांना दिली.
यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यामातूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून पाठविली असल्याचे श्री देसाई यांनी माहिती दिली.











