मराठी भाषेचा स्वाभिमान जपायला हवा : शरद पवार 
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप
कुसुमाग्रजनगरी (भुजबळ नॉलेज सिटी) नाशिक :- ‘मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला हवा. त्यासाठी मराठी मन घडवावे, भाषा संपली तर आपली अस्मिता देखील नष्ट होईल!’असा इशारा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिला. गेल्या तीन दिवसांपासून भरगच्च गर्दी आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रम यांनी गजबजलेल्या संमेलनाची दिमाखदार सांगता झाली.
नाशिकचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहित्य कर्तृत्वाचा उल्लेख करून त्यांनी गौरव केला व कुसुमाग्रज यांचे नाव साहित्य नगरीस दिले हे योग्यच असल्याचे स्पष्ट केले. समाजमाध्यमांत मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याचे आवाहन करून शालेय शिक्षणासाठी इंग्रजीला प्रधान्य दिले जाते, महाविद्यालयिन शिक्षणात देखील मराठीतून शिक्षण देण्याचा विचार व्हावा. पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणं आवश्यक आहे. बहुजनांच्या भाषेला बोली भाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिक स्थान द्यायला हवे. प्रमाण भाषेबद्दल दुराग्रह सोडून सर्व शैलींना स्थान द्यावे असे आवाहन त्यांनी ,केले.


