मसाप अध्यक्षपदी रावसाहेब कसबे

0
382

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी

डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम यांची निवड करण्यात आली असून कार्यकारी विश्‍वस्त म्हणून डॉ. पी. डी. पाटील आणि विश्‍वस्त म्हणून यशवंतराव गडाख यांची निवड करण्यात आली. परिषदेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आणि लेखक डॉ. तानाजीराव चोरगे आणि ज्येष्ठ प्रकाशक राजीव बर्वे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी डॉ. पुरुषोत्तम काळे यांची तर, विभागीय कार्यवाह म्हणून जयंत येलूलकर (अहमदनगर) व डॉ. शशिकला पवार (धुळे-नंदुरबार) यांची आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरील परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून प्रा डॉ. तानसेन जगताप (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले, ‘दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकारी मंडळाने ठेवलेला पाच वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव वार्षिक सभेने गेल्या पाच वर्षात साहित्यपरिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी कार्यकारी मंडळाने केलेले काम पाहून बहुमताने मंजूर केला. कोरोनामुळे सर्वच साहित्य संस्थांसमोर मोठी आर्थिक आव्हाने असून विद्यमान कार्यकारी मंडळ त्याचा समर्थपणे मुकाबला करेल. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील सूचनेनुसार दोन वर्षानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यात अ‍ॅड प्रमोद आडकर, अ‍ॅड जे.जे. कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, बंडोपंत राजोपाध्ये, दिनेश फडतरे आणि प्रा. सोमनाथ जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे.

काही व्यक्ती आणि संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासदत्व मिळवून देतो म्हणून साहित्यप्रेमींकडून अर्ज भरून घेऊन पैसे गोळा करीत आहेत. साहित्य परिषदेने अशा कोणत्याही मध्यस्थांची नेमणूक केली नसून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्यास त्याला महाराष्ट्र साहित्य परिषद जबाबदार असणार नाही. असेही प्रा. जोशींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here