20.2 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeलेख*महाकवी कालिदास*

*महाकवी कालिदास*

दिन विशेष

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com

सोमवार ता.१९ जून २०२३ रोजी महाकवी कालिदास दिन आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कवीकुलगुरू म्हणून गौरवला गेलेला कालिदास हा संस्कृत मधील श्रेष्ठ महाकवी होता. त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही तसेच त्याच्या कालखंडाबाबतही वेगवेगळी मते आहेत. अनेक अभ्यासकांनी तो इसवी सन पूर्व पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या शतकात होऊन गेला अशी निरनिराळे मते मांडलेली आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कालिदासाच्या जन्मस्थळाबाबत ही नेमका उल्लेख आढळत नाही. मात्र उज्जैन या शहराविषयी त्याच्या साहित्यात झालेला उल्लेख लक्षात घेता तेथेच तो जन्मला असावा असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कालिदासाबाबत अनेक दंतकथा आहेत.

संस्कृत साहित्याचे गाढे विद्वान महामहोपाध्याय पद्मभूषण डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांनी ‘ कालिदास ‘ नावाचा तीनशे पानी ग्रंथ १९३४ साली नागपूरच्या नवभारत ग्रंथमालेत लिहिला होता. नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनेही प्रकाशित झाला. त्यामध्ये कालनिर्णय, कालिदासकालीन परिस्थिती, जन्मस्थानाचा वाद, चरित्रविषयक अनुमाने, कालिदासाची काव्ये,कालिदासाची नाटके, कालिदासीय विचार,कालिदास व उत्तरकालीन ग्रंथकार,कालिदासस्तुती कुसुमांजली आदी प्रकरणांमधून सविस्तर चर्चा केलेली आहे. मिराशी यांच्या मते कालिदास द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयाला होता. चंद्रगुप्ताने इसवी सन ३८० पासून ४१३ पर्यंत राज्य केले. म्हणून कालिदास चौथ्या शतकाच्या शेवटी व पाचव्या शतकाचे आरंभी होऊन गेला असावा असे म्हटले आहे.तसेच त्याचे जन्मस्थान उज्जैन आहे हे ही स्पष्ट केले.

कालिदासाने रघुवंश आणि कुमार संभव ही महाकाव्ये लिहिली. ऋतुसंहार व मेघदूत ची खंडकाव्ये लिहिली.आणि मालविकानी मित्र, विक्रमोर्वशीय , अभिज्ञान शाकुंतल ही नाटके लिहिली होती.तसेच कुंतलेश्वरद्योत्य या नावाचा एक ग्रंथ ही त्याने लिहिला होता असे मानले जाते.पण हा ग्रंथ अनुपलब्ध आहे. दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके उपलब्ध आहेत. ही सातही पुस्तके संस्कृत साहित्याची भूषणे मानली जातात. कालिदासाच्या या वाङ्मयातून वेद ,उपनिषदे ,भगवद्गीता ,रामायण ,महाभारत , षडदर्शने, शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रे आदी ललित कला यांचे उल्लेख जागोजागी आढळतात. तसेच त्याच्या साहित्यातून एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजाततेचे,प्रगत सामाजिक जीवनाचे दर्शन घडते.प्रतिभा आणि रसिकता यांचा मनोज्ञ संगम त्याच्या साहित्यात आहे.

कालिदासाच्या लेखन वैशिष्ट्य सांगताना गो.के.भट मराठी विश्वकोशात म्हणतात”……. शृंगार आणि करूण ह्या दोन रसांचा परिपोष कालिदासाच्या साहित्यकृतीत प्रामुख्याने आढळतो. वर्णन विषयातील सौंदर्य अचूक हेरून ते मोजक्या शब्दात व्यक्त करणे हे त्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. संस्कृत साहित्यशास्त्रातील परिभाषेप्रमाणे कालिदास याची शैली किंवा रीती वैदर्भी ठरते .दीर्घ समास आणि कठोर वर्ण त्यामध्ये सामान्यतः आढळत नाहीत. विविध भाषालंकार त्याच्या काव्य ,नाटकात आढळतात. विशेषतः त्याच्या उपमातील तरल सौंदर्यामुळे ‘ उपमा कालिदासस्य ‘ ही एका सुभाषितकाराची ततसंबंधी गौरवोक्ती रूढ झालेली आहे .उपमांचे एक वैविध्यपूर्ण विश्व कालिदासाने आपल्या साहित्यकृतीतून उभे केले आहे. विविध प्रकृतीच्या व्यक्तींचे मार्मिक स्वभाव चित्रण करण्याचे त्याचे कौशल्य ही फार मोठे आहे.’

कालिदास जीवनातील वेदनादायी अनुभवांपासून दूर होता. त्याच्या साहित्य वेदना दुःख तीव्रतेने येत नाही हे वास्तव आहे.तसेच त्याच्या साहित्यातील पात्रे सामाजिक बाबतीत अनेकदा कर्मठ भूमिका घेतानाही दिसतात. त्याच्या साहित्यातील व व्यक्तीत्वातील काही कमजोरी लक्षात घेतली तरीही कालिदासाच्या प्रतिभेला जगभर गौरवले गेले यात शंका नाही. सर विल्यम जोन्सने त्याला ‘भारताचा शेक्सपियर ‘असे म्हटले होते. तर गटेसहित अनेक पाश्चिमात्य लेखकाने त्याच्या प्रतिभेला गौरवले होते. महामहोपाध्याय पद्मभूषण डॉ. वा.वी. मिराशी म्हणतात “,….. एकधर्मी व एकभाषिक इंग्लंडला शेक्सपियरचे महत्त्व वाटते. त्याच्या शतपट कालिदासाचे महत्त्व विविध धर्म, जाती ,पंथ व भाषा यांनी विभागलेल्या हिंदुस्थानास वाटले पाहिजे. धर्म ,संस्कृती, भाषा याप्रमाणे अभिजात व सर्वमान्य ग्रंथकारांचीही राष्ट्राचे एकीकरणास मदत होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कालिदास होय. उत्तरेस पंजाब पासून दक्षिणेस मद्रासे पर्यंत आणि पश्चिमेस महाराष्ट्रापासून पूर्वेस बंगालपर्यंत सर्व प्रांताच्या विद्वानांनी आत्मीयतेने कालिदा साचा काल, जीवित व ग्रंथ यांची गुण रहस्य उलगडण्यास मदत केली आहे. हिंदू संस्कृती व संस्कृत भाषा यांचा युरोपीय विद्वानास प्रथम परिचय झाला तो कालिदासाच्या भाषांतरीत शाकुंतल मुळेच. आज पाश्चात्य देशात हिंदू लोकांनी अभिमानाने सांगण्यासारख्या गोष्टीत कालिदासाच्या ग्रंथाचा समावेश केला पाहिजे. इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे, इटलीचा दांते यांच्या प्रमाणेच हिंदुस्थानच्या कालिदासाची जगताच्या कवी मालिकेत प्रमुख स्थान मिळाले आहे.’

हिमालयाची दिलीस उंची नाटकास अन् काव्यालाही
कालिदास तू गुलाबपाणी केले कोसळ पाण्यालाही….

प्रेम रसाचा दुत बनवले आषाढाच्या मेघाला तू
व्याकुळलेली अलका कळली तेव्हा शापित यक्षालाही..

तुझ्या अंतरी प्रेमभावना सदैव दाटून आली होती
त्यामुळेच तर फुटला पाझर आर्तभावनी शब्दालाही…

तू लिहिलेल्या प्रेम रसाने भिजून गेली युगे युगेही
आले कौतुक कृष्ण सावळ्या नभांगणाच्या वाट्यालाही…

अपुल्या नंतर केवळ मागे प्रेम दिलेले शिल्लक उरते
प्रेमभराने जगावयाला शिकविलेस तू प्रेमालाही….

प्रसाद कुलकर्णी

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेली अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]