*नृसिंहवाडीचा पूर आणि आनंदाचा महासागर*
“आमची वाडी”……
आम्हा वाडीकरांसाठी एवढा शब्दच पुरेसा आहे. सुख म्हणजे काय तर ते म्हणजे वाडी. नृसिंहवाडी दत्तात्रेयांची राजधानी आणि याचे प्रत्यंतर येथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला येतेच. कोणीही एकदा वाडीला येऊन महाराजांना डोळे भरून पाहिल्यानंतर वाडी विसरणे म्हणजे निव्वळ अशक्य.
नृसिंहवाडीत वर्षभर काही ना काही सण, उत्सव साजरे होत असतात. पण पावसाळा आला की सर्वांना ओढ लागते ती ‘दक्षिणद्वार ‘ सोहळ्याची.
*”दक्षिणद्वार सोहळा”….. काय वर्णन करावे याचे? ही तर साक्षात स्वर्गाची वाट! कृष्णा पंचगंगा नदीला पूर आला की पाणी देवळात येते. साक्षात कृष्णावेणी माता महाराजांना भेटण्यासाठी येते. विलक्षण असा तो क्षण! पाणी उत्तरद्वारातून पादुकांवर जाते आणि ते तीर्थ दक्षिणद्वारातून बाहेर येते. मग दक्षिणद्वारात बुडी मारून तिर्थस्नान करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते. हा सोहळा दर वर्षी होतो. नंतर पाणी कधी वाढते तर कधी कमी होते.*
दक्षिणद्वार झाले की मग रोजचे पादुकांवरचे सर्व पूजा उपचार उत्सवमूर्तीवर म्हणजेच आमच्या स्वारींवर होतात. स्वारी अगदी थाटामाटात, ऐटीत बसलेली पाहून भाविकांच्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटते. आधीच लोभस, मनाला भावणारे स्वारीचे रूप आणखीनच विलोभनीय वाटू लागते.
पाण्याची पातळी वाढून नारायण स्वामींच्या मठामध्ये पाणी आले की देव टेंबे स्वामींच्या मठामध्ये येतात. मग मात्र सर्व ग्रामस्थांना व पुजारी मंडळींना ओढ लागते ती देव गावात येण्याची…..
महापूर आला की सगळीकडे अगदी हाहाकार माजतो. प्रत्येकाला राहण्याची, घराची चिंता भेडसावू लागते. पण आमच्या महाराजांच्या राजधानी मध्ये अगदी वेगळे दृश्य असते. देव गावात येणार अशी कुणकुण लागताच महाराजांचे लाडके बालगोपाळ (पुजारी मंडळी) एका अलौकीक शक्तीच्या संचाराने महाराजांच्या आगमनाच्या तयारीमध्ये गुंग होऊन जातात. वाडीचे पुजारीवृंद म्हणजे एक अजब रसायन आहे. ऊन पाऊस वारा महापूर अगदी काहीही होवो… दुनिया इकडची तिकडे होवो… पण त्यांच्या सेवेचे व्रत हे अविरतपणे चालूच असते आणि हे करण्याची ताकद महाराजच त्यांना देतात यात काडीमात्रही शंका नाही.
गावातील सुवासींनीची महाराजांच्या औक्षणाची लगबग चालू होते. सडा रांगोळी नैवेद्य फुले विडा सगळ्याची अगदी धूम चालू होते आणि ज्या हक्कदार पुजाऱ्यांच्या घरी देव येणार त्यांचा आनंद तर शब्दात वर्णन करण्या पलीकडचा. अगदी काय करू आणि काय नको असं होत असतं. या सगळ्यामध्ये पाणी वाढतंय, जीवाला धोका वगैरे गोष्टी तर कोणाच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाहीत… सगळीकडे अगदी आनंदी आनंद असतो. वातावरण दत्तमय होऊन जातं.
आणि तो क्षण येतो……..
टेंबे स्वामी महाराजांच्या मठाच्या उंबऱ्याला पाणी लागले की देव गावात येण्यासाठी निघतात ते ही अगदी थाटामाटात, वाजतगाजत, झांज, टाळांच्या गजरात! दिगंबराचा गजर, इंदुकोटी, करुणात्रिपदी, धावे, पालखीची पदे,अष्टके म्हणत वाजत गाजत महाराजांचा जथ्था गावात येतो. स्वर्ग जणू पृथ्वीवर अवतरले आहे की काय असेच वाटू लागते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो. प्रत्येक दारात सुवासिनी औक्षण करतात. किती आणि कोठवर वर्णावे या क्षणांना? शब्द बंद होतात आणि डोळ्यात तरळतात ते आनंदाश्रू… हे सुख फक्त नशीबवानास मिळते हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवू लागते आणि आपण त्या नशीबवानान पैकी एक आहोत यात धन्यता वाटू लागते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
संकलन – सुकन्या श्रीकांत पुजारी.











