महिला संतांच्या जीवनावर आधारित नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती
पुणे:
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत, यंदा पंढरपूरच्या वारी मध्ये महिला संतांची माहिती सांगणारे दोन चित्ररथ सहभागी झाले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या चित्ररथावरील रंगमंचावर दररोज; नाटिका, अभंग, गवळणी, लोककला आणि इतर सादरीकरणे यांच्या माध्यमातून या महिला संतांचा जागर प्रथमच वारीमध्ये पहावयास मिळत असून त्यामाध्यमातून महाराष्ट्रातील महिला संतांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंड्यांसोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे हे दोन चित्ररथ संपूर्ण वारी प्रवासासाठी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख महिला संत जसे की; संत महदंबा, मुक्ताई, जनाबाई, सखुबाई, बहिणाई, कान्होपात्रा, गोणाई, सोयराबाई, निर्मळा, भागु, राजाई, लिंबाई, गोडाई, प्रेमाबाई, वेणाबाई, अंबाबाई अशा कितीतरी महिला संतांनी इथल्या समाज मनाची वैचारिक मशागत केली आहे. बंधुभाव, समता आणि भक्ती याचे महत्त्व सांगताना; त्यांनी समाजातील कु:प्रथा आणि अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार केले होते. या महिला संतांची माहिती वारीतील सहभागी वारकरी तसेच महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी या हेतूने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा दोन चित्ररथ तयार करण्यात आले असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या सूचनेनुसार हे चित्ररथ साकार झालेले आहेत. दोन्ही पालखी मार्गावर पुण्यामधून हे दोन चित्ररथ वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. या चित्ररथावर दहा- दहा कलाकारांचे समूह रोज दहा ते बारा ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहेत.

या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील महिला संतांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोच करण्याचे काम या कलाकारांमार्फत होत आहे. महाराष्ट्रातील महिला संतांच्या कार्याविषयी माहिती संकलन प्रसिद्ध लेखिका प्राची गडकरी यांनी लेखन केलेले आहे. तसेच त्या स्वतःही यामध्ये सादरीकरण करत आहेत. आकर्षक चित्ररथ, संगीतमय कार्यक्रम, भक्तीपूर्ण वातावरण आणि सर्वांग सुंदर सादरीकरण यामुळे या चित्ररथाना वारीमध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासनाने अशा प्रकारच्या चित्ररथाची निर्मिती करून महिला संतांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नाची प्रशंसा होत आहे. सुमारे १७ दिवस हे दोन्ही चित्ररथ दोन्ही पालखी मार्गावर वारीसोबत राहणार आहेत.




