*महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याविरोधात लातुरात महाविकास आघाडीचे निदर्शने
,सरकारविरोधात रोष व्यक्त*
*महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा व सरकार विरोधात* *घोषणाबाजी*
लातूर प्रतिनिधी:-दि.१० सप्टेंबर २०२५(बुधवार)महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने दि.१० सप्टेंबर (बुधवार) रोजी लातुर शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करीत या जुलमी कायद्याला तीव्र विरोध करण्यात आला.
शहरातील महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते,सामाजिक कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*कायद्यावर गंभीर आक्षेप*महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा कायदा म्हणजे “काळा कायदा” असून तो लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील आणि त्याचा गैरवापर राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केला जाईल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात असून यावर गंभीर आक्षेप घेत आंदोलकांनी “हे सरकार निर्लज्ज आणि मस्तवाल” असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली

.*’भगत सिंग होण्याची वेळ आली आहे’*
यावेळी बोलताना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले की, या कायद्याची तुलना इंग्रजांच्या “पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट”शी करावी लागेल. इंग्रजांनी याच कायद्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकले होते,आणि तेव्हा भगत सिंग यांनी संसदेत बॉम्ब टाकून त्याचा निषेध केला होता.आज पुन्हा एकदा स्वतंत्र भारतात भगतसिंग होण्याची वेळ आली आहे,असे ते म्हणत या कायद्याला प्रत्येक देशभक्त नागरिकाने विरोध करणे आवश्यक आहे,असेही आवाहन त्यांनी केले.
*लोकशाहीचा गळा दाबणारा कायदा*
या आंदोलनात सहभागी झालेले विचारवंत प्रा.डॉ. सोमनाथ रोडे यांनी हा कायदा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील मूळ सिद्धांतावर घाला घालणारा प्रकार असून हा कायदा लोकशाहीचा गळा दाबनारा कायदा आहे असे मत व्यक्त केले. तसेच ज्याप्रमाणे जनतेने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करायला सरकारला भाग पाडले तसाच जनरेटा या कायद्याच्या विरोधात तयार झाला पाहिजे आणि हे कायदे रद्द झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.
*चळवळीचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जन सुरक्षा कायदा आणला आहे*
ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे देखील या आंदोलनामध्ये सामील झाले होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना चळवळीचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जन सुरक्षा कायदा आणला आहे असे सांगून याचा सर्व स्तरातून निषेध व्हावा व हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी केली. दरम्यान यावेळी महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. उदय गवारे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी,बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. समद पटेल, अशोक गोविंदपुरकर, सुनिता चाळक,मनिषा कोकणे,कल्पना फरकांडे, सुलेखा कारेपूरकर, करुणा शिंदे, कल्पना मोरे,शीतल मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.-
——————————————




