भगवान महावीर यांचा अनेकांत सिद्धांत अतिशय महत्वाचा
- प्रा. सोमनाथ रोडे; प्रभातफेरी: रक्तदान शिबिर :व्याख्यान : धार्मिक कार्यक्रमाने महावीर जयंती साजरी
लातूर; दि.१४(माध्यम वृत्तसेवा) –-
” जगात आज अनेक कारणांनी युद्ध , जातीय दंगली घडत आहेत . भगवान महावीर यांनी ‘जगा आणि जगू द्या’ हा शांतीचा मंत्र जगाला दिला .त्यांच्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत सिद्धांताचा अंगीकार केला तर जगात शांती नांदून सर्व जण गुण्या – गोविंदाने राहतील .भगवान महावीर यांचा अनेकांत सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे , असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले.


सकल जैन समाजाच्या वतीने महावीर २६२१ जनकल्याण महोत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त वर्धमान उद्यान येथे ‘भगवान महावीर यांचे सिद्धांत ‘ या विषयावर प्राध्यापक रोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते , यावेळी ते बोलत होते. मंचकावर लातूर जैन मंडळाचे अध्यक्ष तेजमल बोरा, श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष राजीव बुबणे, श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल छाजेड, तेरापंथ सभेचे अध्यक्ष सुरेश जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तपमहर्षी खान्देश शिरोमणी उप प्रवर्तक परमपूजनीय अक्षय ऋषीजी , प.पू. अमृत ऋषीजी , प.पू. गीतार्थ ऋषीजी यांनीही उपस्थित राहून आशीर्वचन दिले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचीही यावेळी सपत्नीक उपस्थिती होती.

याप्रसंगी समाजभूषण सुमतीलाल छाजेड, स्वागताध्यक्ष राजीव बुबणे, सनदी अधिकारी कमलकिशोर कंडारकर, गोभक्त शरद डुंगरवाल , प्राणीमित्र सय्यद मेहबूब इसाक उर्फ मेहबूब चाचा , सीए शुभम डुंगरवाल, उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्राप्त अशोक कोटे, उत्कृष्ट कोरोना योद्धा कल्पेश ओस्तवाल , जैन प्रवाह त्रैमासिकाचे संपादक प्रा. डॉ. महावीर उदगीरकर , सोलापूरच्या न्यायाधीश कीर्ती देसरडा यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला .

प्रारंभी भगवान महावीर यांचा 2611 जन्म कल्याण महोत्सव समितीच्या वतीने सकाळी 6:30 वाजता प्रतिमा पालखीसह प्रभात फेरी काढण्यात आली. दिगंबर जैन मंदिर येथून निघालेली ही प्रभात फेरी पटेल चौक , खडक हनुमान, जीवराज भवन, सेंट्रल हनुमान, दयाराम रोड, सुभाष चौक , गंज गोलाई, हनुमान चौक या मार्गावर फिरून चंद्रनगर येथील वर्धमान उद्यानात विसर्जित झाली . कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे हा उत्सव स्थगित करण्यात आला होता. यंदा प्रशासनाने प्रतिबंध उठवल्यामुळे या प्रभात फेरी मध्ये युवक-युवती व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महोत्सव समितीच्या वतीने उत्साही वातावरणात प्रभातफेरी काढण्यात आली .

प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी आपल्या व्याख्यानात अत्यंत सोप्या भाषेत जैन तत्त्वज्ञान व जैन वांड्.मय उपस्थितांना समजावून सांगत आपले विस्तृत व्याख्यान रंजक केले . पुढे बोलताना ते.म्हणाले की, मुस्लिम ,ख्रिस्ती धर्माने आपला धर्म वाढवण्यासाठी जगभर इतर धर्मियांवर आक्रमण केले. धर्म प्रसारासाठी अन्याय-अत्याचार केले. परंतु भगवान महावीर यांनी आपला धर्म प्रसार करण्यासाठी संयम तथा सन्मार्गाचा अवलंब केला. जैन धर्माने कुणाचाही दु:स्वास अथवा द्वेष केला नाही. कुणावरही धर्मांतरासाठी जबरदस्ती केली नाही .
तपमहर्षी खानदेश शिरोमणी उपप्रवर्तक प.पू.अक्षय ऋषीजी म.सा. यांनी प्रारंभी आपल्या आशीर्वचनाने उपस्थितांची मने जिंकली .डॉ. कुलभूषण कंडारकर यांच्या संचाने स्वागत गीत व ध्वज गीत म्हटले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात जैन ग्रंथ साहित्य प्रदर्शनी, गौतम प्रसादी (भोजन) आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी आपल्या प्रास्ताविकात महोत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. बार्शी रस्त्यावरील दयानंद महाविद्यालय चौकात ध्वजस्तंभ उभारणीचे काम सुरू असून महानगरपालिका या कामी पुढाकार घेत असल्याने वर्षभरात या स्तंभाची उभारणी होईल ,असा आशावाद व्यक्त केला .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजेश डुंगरवाल यांनी केले. सुरेश जैन यांनी आभार मानले .
