लातूर/ प्रतिनिधी: येथील बालाजी मंदिर परिसरात सुरू असणाऱ्या सर्वस्तोमोतीरात्र महासोमयागात जिज्ञासुंची गर्दी पहावयास मिळत आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अबालवृद्ध दर्शन करण्यासाठी येत असून अध्यात्मा सोबतच यज्ञ ही संकल्पना समजून घेणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.यात तरुणांची संख्या अधिक असून शेजारील राज्यातुनही मोठ्या संख्येने भक्त महासोमयागासाठी दाखल झाले आहेत. दि.२३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हा सोमयाग संपन्न होत आहे.यागाच्या तिसरे दिवशी सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत धार्मिक विधी व हवन संपन्न झाले.यात सकाळी ८ वाजता,१० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता प्रवर्ग्य हा हवनाचा विधी संपन्न झाला.या हवनात मंत्रोच्चाराच्या माध्यमातून प्रज्वलित होणारा अग्नी,त्याची ३० फुट उंच उसळणारी ज्वाला पाहण्यासाठी सभामंडपात भक्त आणि अभ्यासकांनी गर्दी केली होती.

कडाक्याच्या थंडीत सुर्योदयाला विधी सुरू झाला.तेंव्हापासुनच शहर व परिसरातील अबालवृद्ध नागरिक,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. महासोमयागाच्या ठिकाणी हवनकुंड अर्थात यज्ञवेदीला परिक्रमा करण्यासाठी देखील गर्दी होत आहे.विविध उपयागांसाठी तयार करण्यात आलेल्या हवनकुंडांना १०८ प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. या महासोमयागास महाराष्ट्रासह शेजारील आंध्रप्रदेश,तेलंगाणा व कर्नाटकातील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने येत आहेत.विदेशातुनही काही मंडळी खासकरून सोमयागासाठी लातूर येथे दाखल झाली आहेत.





