नेहरू युवा मंडळाच्या महिलांनी झाडे लावून केले नवीन वर्षाचे स्वागत
————————————————-
लातूर : उन्हाळ्याच्या दिवसात अंत्यविधीला जाणाऱ्या लोकांचे हाल पाहून ओसाड स्मशानभूमीला स्वर्गभूमी बनवण्याचा निर्धार हाळी खुर्द (ता.चाकूर) येथील नेहरू युवा मंडळासह विविध संघटनेच्या व गटाच्या महिलांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून डोंगराळ जमिनीवर झाडे लावून गावातील महिलांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. वाळवंट जमिनीला हरित करण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत झाडे लावून निर्धाराच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यात आलं आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगांच्या खुशीत वसलेलं हाळी खुर्द हे छोटंसं गावं… या गावाची शासनाच्या काही दरबारी खुर्दळी तर काही ठिकाणी हाळी खुर्द अशी नोंद… भक्तांच्या नवसाला पावणारी जनमाता देवी याचं गावची… पाऊने पाचशे ते पाचशे उंबर ओठ्याचे गावं… गावची लोकसंख्या साडेचार हजाराच्या घरात… प्रत्येक जाती धर्मियांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी… यात कुणाची दहन भूमी तर कोणाची दफन भूमी… सार्वजनिक दहन भूमीला साधारण दहा एक्कर डोंगराळ, पाषाणाची जागा… त्यात तीन दहन शेड, मात्र अंत्यविधीला आलेल्या नागरिकांसाठी एकही निवारा शेड नाही… एवढेच नव्हे तर आजूबाजूला सावलीत थांबण्यासाठी एकही झाड नाही… अशा ओसाड स्मशानभूमीला स्वर्ग भूमी करण्याचा निर्धार नेहरू युवा मंडळ, ग्रामपंचायत, एकल महिला संघटन व बचत गटाच्या महिलांनी केला आहे.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने लातूर चं नेहरू युवा केंद्र चालवलं जात. जिल्हा युवा समन्वयक साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिला असलेलं जिल्ह्यातील एकमेव हाळी खुर्द येथील नेहरू युवा मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून शासन निर्देशाप्रमाणे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. रक्तदान शिबिर, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी शिबीर, सर्वरोग निदान शिबिर, वयोवृद्धांना आधार काठ्यांचे वाटप, पाणी टंचाईच्या काळात पाणी वाटप, कोरोना काळात जनजागृती, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन तर बेरोजगारांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावे आदी उपक्रम राबविण्यात येतात. आता या मंडळाने स्मशानभूमीला स्वर्गभूमीत बदलण्याचा निर्धार केला आहे.
सरपंच मुनिरपाशा पटेल, उप सरपंच निवृत्ती चामले, ग्रामसेवक शिवप्रसाद स्वामी यांनी चाकूर तालुका युवा समन्वयक प्रा.प्रशांत साबणे, नेहरू युवा मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया जनगावे, एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा अफसना शेख, बचत गटाच्या अध्यक्षा मेहरूनबी शेख, आशा स्वामी यांच्यासह गावातील हाकानी सय्यद, बालाजी शिंदे, कौस्तुभ राठी, आकाश सरवदे, कृष्णा जाधव, लक्ष्मण जाधव, सूरज पिसे, ओम चामले, सुमित शिंदे, लक्ष्मण भालेराव या युवकांसह गावातील महिलांना सोबत घेऊन एक एक्कर जागेवर करंज, पिंपळ, वड, चिंच, आंबा, कन्हेरी व इतर फुलांची अशी एकूण सहाशे झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डोंगरातील ओसाड स्मशानभूमी हरित होणार आहे.
कोट
——–
१) “दुपारच्या वेळी व उन्हाळा ऋतूत अंत्यविधी करण्यास घेलेल्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीत निवारा सेड नाही त्यामुळे नागरिकांना उन्हात थांबून अंत्यविधी उरकावा लागत आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
– मुनिरपाशा पटेल, सरपंच – हाळी खुर्द
२) “नेहरू युवा मंडळाच्या वतीने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही स्मशानभूमीत झाडे लावली आहेत. यामुळे येणाऱ्या काळात लोक स्मशानभूमीला स्वर्ग भूमी म्हणून ओळखतील. अशी आम्हाला अशा आहे.”

– सुप्रिया जनगावे, अध्यक्ष – नेहरू युवा मंडळ
३) “आम्ही केवळ झाडे लावूनच थांबणार नाहीत तर प्रत्येक महिलेने एका झाडांचं पालकत्व स्वीकारलं आहे. संगोपनाचं निसर्गदत्त देणं महिलांना जन्मजात लाभलेलं असतं. त्यामुळे आम्ही महिलांनी झाडांना जगवणे व वाढवणे ही जबाबदारी घेतली आहे. याला सर्वांच्या सहकार्यांची गरज आहे.”

– अफसना शेख, अध्यक्ष – एकल महिला संघटना
——————–
फोटो ओळी –
१) हाळी खुर्द : ओसाड स्मशान भूमीला स्वर्ग भूमी बनवण्यासाठी झाडे लावताना सरपंच मुनिरपाशा पटेल, प्रा.प्रशांत साबणे, नेहरू युवा मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया जनगावे, अफसना शेख, मेहरूनबी शेख, आशा स्वामी
२) मुनिरपाशा पटेल, सरपंच – हाळी खुर्द (डोळ्याला गॉगल असलेला फोटो)
३) सुप्रिया जनगावे, अध्यक्ष – नेहरू युवा मंडळ (लाल & हिरव्या साडीतील फोटो)
४) अफसना शेख, अध्यक्ष – एकल महिला संघटना (डोक्याला व अंगाला स्कार्प गुंडाळलेला फोटो)











