बसपूर – बाकली मांजरा नदीवरील पुलाची दूरवस्था
दोन्ही बाजूला पाईप नाहीत, सळया पडल्या उघड्या…..
निलंगा,-(प्रशांत साळुंके)- मांजरा नदीवरील बसपूर-बाकलीच्या हद्दीवरील पुलाची दूरवस्था झाली असून दोन्ही बाजूचे पाईप नसल्यामुळे वाहने चालवणारे व पादचारी यांना धोका निर्माण होत आहे.
निलंगा व शिरूरअनंतपाळ तालुक्याचा जवळच्या मार्गाने जोडणारा मार्ग असून या नदीवरील पूल बांधकाम करून जवळपास पंधरा वर्षे झाली आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता मंजूर झाला असला तरी अनेक ठेकेदार काम अर्धवट सोडून पळ काढत आहेत.

शिवाय दोन तालुक्याच्या हद्दीवरील हा पूल असल्यामुळे या पुलाच्या दुरूस्तीसाठी निधी मिळत नाही. पुलाच्या पृष्ठभागावरील सळया उघड्या पडल्या असून अनेक वाहनाच्या टायरमध्ये सळया घुसून पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पादचारी यांना चालताना उघड्या पडलेल्या सळया पायाला लागून ईजा होत आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी या रस्ता दुरूस्तीसाठी विशेष निधी मंजूर करून तत्काळ पूल दुरूस्ती करावी अशी मागणी बसपूर व बाकली गावातील नागरिकांकडून केली जात आहे.












