मुंबई; ( वृत्तसेवा )-अर्चना पाटील चाकूरकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र काही ना काही कारणास्तव प्रवेशास उशीर झाला आहे. आता पुन्हा एकदा अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
आज दि. 29 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते राज्यसभेवर गेले. आता अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे आणखी एक मोठे नाव आणि काँग्रेसचा नेता भाजपकडून गळाला लागण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यानंतर आता अर्चना पाटील चाकूरकरही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मराठवाड्यात काँग्रेसची पडझड सुरूच
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही दिवसांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानस पुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील अनेक दुफळीच्या व गट तटाच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा गट नेहमीच चाकूरकर गटाशी जोडलेला होता. आगामी काळात मराठवाड्यात काँग्रेसमध्ये देशमुख गटाचेच वर्चस्व राहणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता अर्चना पाटील चाकूरकर यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची वाट धरल्याचे बोलले जात आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील लातूर परिसरात काँग्रेसमध्ये केवळ देशमुख कुटुंबीयांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. दरम्यान, चाकूरकर कुटुंबाचा चव्हाण कुटुंबाशी नेहमीच एकोपा राहिला आहे. त्यामुळे आता अर्चना पाटील यांना भाजपमध्ये घेण्यासाठी चव्हाण आणि पाटील जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून संधी दिली जाऊ शकते.
