देवणी येथे मुलींच्या वस्तीगृहासाठी जागा हस्तांतरित
लातूर/प्रतिनिधी:निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी जागा हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी तसेच तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्याला यश आले असून यामुळे निलंगा मतदारसंघात आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात विकासपर्वास प्रारंभ झाला आहे.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देवणी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा तसेच शिरूर अनंतपाळ येथेही याच प्रकारच्या शासकीय शाळांची मागणी केली होती. शिरूर अनंतपाळ येथे मुले व मुलींसाठी स्वतंत्रपणे शासकीय वसतिगृहांची मागणीही त्यांनी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन केली होती.त्याचा पाठपुरावाही केला होता.या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानुसार देवणी येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुलींसाठी शासकीय वसतीगृह बांधण्यात येणार आहे.या वसतीगृहाच्या इमारतीसाठी देवणी तहसील कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या शिल्लक जागेपैकी एक एकर जागा द्यावी अशीही मागणी आ.निलंगेकर यांनी केली होती.
मंत्रालयीन पातळीवरून परवानगी मिळाल्यानंतर या वसतीगृहासाठी १ एकर जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.त्यामुळे देवणी येथे मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निलंगा विधानसभा मतदार संघातील विविध कामांसाठी आ.निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेक योजना मंजूर करून घेतल्या आहेत. विविध विकासकामे सुरू आहेत. आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात मतदारसंघात पुन्हा एकदा विकासपर्व सुरू झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.




