अक्षर-दुर्गा – ४/ प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३.
कवितेलाच जन्म घ्यायचा असतो. त्यासाठी, ती आपल्याला निवडते. आपण मात्र, या भ्रमात असतो की आपण कवी आहोत. कवी किंवा कवयित्रीच्या मनात कविता किती सहज आणि उत्स्फूर्त अवतरीत होते हे सांगताय, लातूरच्या कवयित्री अरुणाताई दिवेगावकर. खरंतर, आपण कविता लिहतच नाही. कविताच आपल्याकडून ते लिहून घेते. हे लिहणं, लिहणाऱ्याच्या मानसिकतेवर, त्याच्या भवतालावर आणि त्याच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते. याच अनुभुतीतून, आपल्या सभोवतालचा अवकाश वाचून, त्यावर चिंतन करुन अरुणाताई व्यक्त होत राहतात. त्यांचं हे व्यक्त होणं निर्विकार आहे. निरपेक्ष, प्रांजळ, सहसंवेदी आणि पारदर्शी आहे. म्हणून त्यांची कविता साधी, सोपी, सहज आणि अनअलंकारीक आहे. ती जेव्हा येते, तेव्हा माणुसपणाची सारी लक्षणं लेवून येते. ती संवाद साधते. मनाची खंत व्यक्त करते. परिस्थितीवर भाष्य करते आणि व्यवस्थेला जाबही विचारते. लेखक-कवी जेव्हा डोळसपणे व्यक्त होतो, तेव्हा तो स्वतःला घरात कोंडून घेवू शकत नाही. त्याला घराबाहेर पडावं लागतं. माणसं, परीसर, व्यवस्था, यंत्रणा आणि भवताल वाचावा लागतो. त्याची साक्ष, अरुणाताईंच्या “उंबरा ओलांडताना” या कवितासंग्रहात पानापानावर दिसून येते.
फेसबुकसारख्या अभासी माध्यमातून ओळख झालेल्या अरुणाताई, त्यांच्या लेखातून आणि कवितांमधून उलगडत गेल्या. समविचारी माणसं सहज एकमेकांशी जोडली जातात. त्यांच्यात एक अनामिक बंध तयार होतो. एक अदृष्य नातं आकाराला येतं. हे नातं बहरतं, फुलतं आणि आपलेपणाची जाणीव पेरत जातं. ताईच्या कवितांनी मला जशी भुरळ घातली, तशी त्यांच्या प्रगल्भ विचारांनीही माझ्या मनावर गारुड केलं. लेखनाचा हा वारसा त्यांना आई, श्रीमती चंद्रकला लाड यांचेकडून प्राप्त झाला आहे. त्यांच्या आईंना जात्यावरील असंख्य ओव्या तोंडपाठ होत्या. काही त्यांनी स्वतः रचल्या होत्या. त्या संकलित स्वरुपात "जाते ओवी गाते" या संग्रहात वाचता येतात. या ओव्यांना लोकस्विकृती आणि लोकमान्यता प्राप्त झाली आहे. यातून अरुणाताईंवर लिहण्याचा संस्कार झाला असावा. त्यांनी फेसबुकवर लिहलेली "शब्द-रेषा-अक्षरे" ही मालिकाही लक्षवेधी ठरली होती. यात अरुणाताईंचे शब्द, अनिता सावंत देशपांडेची रेखाचित्र आणि साक्षी कुलकर्णींची सुलेखनाची अक्षरं असा त्रिवेणी संगम जुळून आला होता. शब्दांना चित्रांची आणि सुलेखनाची साथ मिळाली, तर ती बोलकी आणि संस्मरणीय होतात, ते या उपक्रमातून दिसून आले. प्रबोधनाचा आणि वैचारीक मुल्यांचा वसा घेतलेला असल्याने, ताईंना सावित्रीबाई आणि ज्योतीबा फुले यांच्याबद्दल अपार प्रेम आणि श्रध्दा आहे. त्यातूनच त्यांनी "ज्योतिर्मय सावित्री - एक समताधिष्टीत सहजीवन" या पुस्तकाची निर्मिती केली. जिचा एनडीटीव्हीचे संपादक रवीश कुमार यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. यातच या पुस्तकाचे मोल आणि उपयुक्तता अधोरेखीत होते. अरुणाताईंचे सुपुत्र कौस्तुभ दिवेगावकर हे आयएएस अधिकारी आहेत. ही त्यांची ओळख सांगितल्याशिवाय त्यांच्या वैचारिक बैठकीची कल्पना पूर्ण होवूच शकत नाही. कौस्तुभजी हे आमच्या जळगाव जिल्ह्य़ात जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी होते. त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उस्मानाबाद जिल्ह्यात उमटविला आहे. एका कवयित्रीची लेक आणि जिल्हाधिकाऱ्यांची आई, या व्यतिरिक्त त्यांची वैचारीक लेखिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणून स्वतःची अशी खास ओळख आहे. जी त्या स्वतंत्र आणि निर्भिडपणे जपत आहेत.
कविता नेमकी काय असते.? याबाबत अरुणाताईंची एक ठाम अशी भूमिका आहे. शब्दरचना, अर्थानूभव, भावानुभव, जाणीव नेणीव या साऱ्यांच्या पलीकडे कविता असते, असं त्या म्हणतात. शब्दांच्या पलीकडचा अनुभव असते कविता. कवितेतील शब्दकळेपेक्षा भावसौंदर्य मनाला जास्त आनंद देत असतं. कविता आकारापेक्षा प्रक्रिया अधिक असते. कवितेच्या रचनेतून दिसणारा तिचा आकार हा तिच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. हे सांगताना, त्या कवितेची नेमकी व्याख्याच स्पष्ट करतात. ज्या कवितेच्या शब्दांचा स्पर्श अंगावर शहारे आणतो, ती कविता काळजाला भिडणारी असते. कवितेचा पिंड असलेला माणूस, कधी मुद्दाम कविता लिहित नाही असं त्या म्हणतात. कविता केवळ सृजनशील आत्म्याचा उच्चार नाही, तर एक मूर्तरूप अविष्कार आहे, हे सांगताना त्या कवितेच्या नेमक्या जागा दाखवतात. एखादं सुंदर चित्र जसं कविता वाटतं, तशी एखादी बोलकी कविता सुंदर चित्र असू शकतं. एखाद्या सुंदर मूर्तीत, आखीवरेखीव काव्यरचना भासते. तर कधी एखादी दर्दभरी तान अर्थवाही कविता वाटते. कवितेला नेमकं मांडणं आणि अचूक ओळखणं यासाठी कवितेशी एकरुप व्हावं लागतं. स्वतःला कवितेत हरवून घ्यावं लागतं. ही त्यांची भूमिका कवितेशी त्या किती समरसून एकजीव झाल्या आहेत, याची साक्ष देतात.
अरुणाताई यांचा 'उंबरा ओलांडताना' हा कविता संग्रह "हरिती प्रकाशन" ने प्रकाशित केला आहे. अभिनव काफरे यांचे सुबक मुखपृष्ठ बोलकं आणि सूचक आहे. कवयित्रीने स्त्रीवादी आणि भवतालातील विविध सामाजिक स्तरातील स्त्रियांची सुखदुःखे अत्यंत आत्मीयतेने टिपलेली आहेत. संग्रहात एकूण ६१ कविता आहेत. ज्या नवकवींप्रमाणे केवळ स्वमग्न नाहीत. तर, परिघाबाहेरचं जगणं टिपणाऱ्या आहेत. त्यात स्त्रियांची दुखणी, स्त्रीयांचे दमन, नदीची अस्वस्थता, बापाची आगतीकता, मायची तगमग, बहिणीचं पोरकंपण, जीवनाची रोजनिशी, अटळ मरण आणि जगण्याचं रिंगण असा सारा जमाखर्च मांडत, ती फेरधरुन अवतरीत होते. अस्वस्थ करते. दिड्गमूढ करते.
कष्ट, दुःख, राबणं बाईच्या पाचविलाच पूजलेलं असतं. शेतात राबतांना, मजूरी करतांना स्त्रीचं होणारं आर्थिक आणि शारीरीक शोषण तिच्या दयनियतेची साक्ष देतं. ऊसतोड करणाऱ्या स्त्रीची वेदना मांडताना कवयित्री म्हणतात.
ऊस खाणाऱ्याला गोड
बाईसाठी तो नरक
भोग सरता सरेना
कवा सुटलं ह्यो चरक ?
ऊस चवीला गोड असला तरी त्यासाठी राबणाऱ्यांना विचारा तो किती कडू असतो. साखर कारखानदारी ही जणू चरकासारखी मजूरांना चिपाड करुन सोडते. बाईसाठी तर तो जणू नरक झाला आहे. नरक आणि चरक यातला यमक आणि विरोधाभास व्यवस्थेचं करुप रुप जगासमोर मांडतं. बाईचा जन्मच अदखलपात्र आहे, हे मांडतांना त्या बाईला साधं माणूस म्हणूननही कुणी गृहीत धरत नाही, याची खंत व्यक्त करतात.
माझ्यात इतकं मुरलंय बाईपण
कि, मी माणूस आहे हेच विसरलेय.
शतकानुशतकांच्या प्रवासात.
बाईपणाची झूल पांघरलीय
संस्कृतिरक्षणाची वाहक होऊन.
बाईपणाची झूल बाईने अंगावर घेतलीय म्हणून या संस्कृतीचं रक्षण होत आहे. अशी जाणिव त्या करुन देतात. तिनं ही झूल उतरायची म्हटली तर पुरुषाचं पौरुषत्व उघडं पडेल, अशी चेतावनी त्या संयत शब्दात देतात.
झूल पांघरलेलीच राहू देत
सहन होणार नाही
झूली शिवायचं बाईपण
आदिम पौरुषत्वाला .
बाई घुसमटत राहते आतल्या आत. तिला मुक्त होण्यासाठी नदी नाहीतर पाणवठाच हक्काचा. तिथं बाई मनमोकळं करते. बाईला बाई सुख दुःखाच्या गोष्टी सांगते.

चार बाया
चार चार हंडे
तापला फुफाट्याचा रस्ता
चार सुख-दुःखाच्या गोष्टी
बाई बाईजवळच मोकळं करते मन
बाईचं जगणं म्हणजे फफुट्याचा रस्ता. उन, वारा, पाऊस झेलणारा. रस्त्यागत तिही वाहते डोईवर भार. अहोरात्र. हे सांगतांना कवयित्री नेमकं मर्मावर बोट ठेवते.
फुफाट्याचा तापला रस्ता
अन् पाणवठा अखंड प्रवास.
बाई,
डोक्यावर अन् मनावर
युगानुयुगे वाहतेच आहे
भार …!
बाई आणि नदी जणू मैत्रीणी. बहिणी. समदुःखी. दोघातलं साम्य दाखवतांना कवयित्री डोहाचं प्रतिक योजते. दोघी वरवर शांत, नितळ दिसत असल्या तरी एकीच्या डोहाचा तळ आणि दुसरीचा मनाचा डोह कुणाला कळतो कां, हा प्रश्न वाचकाला खोल खोल नेतो.
गावा काठी नदी वाहे
नदी नितळनिळी भासे
नदीमधे काळा डोह
मना अथांगसा मोह
जीवा लागते वेड
गाव नदी डोह सोड
बाई, नदीसारखी अखंड वहात राहते. दुसऱ्यांसाठी. ती केवळ देतच असते. तरी समाज एकीचं मूळ आणि दुसरीच कुळ का शोधत राहतो, ही शंका कवयित्रीला अस्वस्थ करते.
अखंड वाहतो
ग आपण
खळाळत राहतो
दिवस – रात्र
न थकता.
शोधत राहतात
तुझं मूळ
माझं कुळ
पावित्र्य – पातिव्रत्य
राखलंय का
तपासण्यासाठी.
नदीला उपासनांचे निर्माल्य विटंबित करते. तर, स्त्रीला विखारी वासनांचे विर्य विटंबित करते. हे सांगण्याचे धारिष्ट्य दाखवणारी कवयित्री, मला येथे बंडखोर झाल्यासारखी वाटते. तिची सहनशीलता क्षमतेच्या टोकावर आल्याचे भासते.
विटंबित करतात
उपासनांचे निर्माल्य
वासनांचे वीर्य
आपल्यात विसर्जित
करुन.
असं असलं तरी नदीला आणि स्त्रीला थांबता येत नाही. सारं काही सहन करत, तिला वाहत रहावं लागतं. गात रहावं लागतं. ती थांबली तर हे जग थांबेल. हाच संदेश कवयित्री देत असावी.
तिने विचारले नदीला
तुझ्या अंत नाही का ?
नदी काहीच न बोलता गात राहीली
तिच्या निळ्या डोळ्यातला डोह
उचंबळत राहीला.
दुःखाचे आणि वेदनांचे उमाळे स्त्री आईजवळ मांडते. मात्र, ही मायच देवाघरी गेली असेल तर ती बापुडी होते. ही जाणिव कवयित्रीच्या पुढील कातर ओळीतून डोकावते.
आई विना पोरके
तिच्या आठवात बुडाले
जनी कितीही सोहळे
मन होतसे बापुडे।।
माय-बाप आहेत तोवर माहेर. ते गेल्यावर आपण नेमकं काय गमावून बसतो याची जाणिव त्या सूचक शब्दात मांडतात.
बाप गेला त्यावेळी
कळलंच नाही
तो गेला म्हणजे
काय झालं…
भाऊ-बहिणीचं नातं खरतरं भक्कम नातं असतं. मात्र, हिस्सेवाटे, जगाचे व्यवहार रक्ताची नाती तटातटा तोडून टाकतात. याचं दर्शन त्यांच्या शब्दाशब्दातून घडतं. एक दुःखद चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं.
तेराव्या दिवशी
भावानं कागद पुढ्यात टाकला
सह्या करायला
अन् कळलं …
डोक्यावरचं आभाळच उडून गेलंय!
भडभडून आलं
अन्
फुटला हंबरडा
बिन आभाळाचा.
समाजात असो की घरात, आपलंच माणूस आपला गळा कापतो. हे कटू सत्य अरुणाताई स्पष्ट शब्दात मांडतात.
कापला केसाने गळा आमुचा
होते ओळखीचेच मारेकरी,
भासतो हा जूनाच कैदखाना
फक्त आले हे नवे पहारेकरी।।
शस्त्राने कळा कापणारा शत्रू माहित असतो. मात्र, केसाने गळा कापणारा आप्त, मित्र आपलाच असतो. आपण त्यावरच विसंबून असतो. याचं दुःख, ज्याचं जळतं त्यालाच हे कळतं. ही वस्तुस्थिती कवयित्री सहज मांडतात.
“ज्याचं जळतं त्यालाच कळतं”
आम्ही आमचं जाळून बसलोय सगळं
वाचवता येत असेल
तर वाचवा तुमची भूमी !
परपिडा कळायला संवेदनशीलता असावी लागते. नाहीतर काही त्यावर कवनं रचतात. अशी कवनं म्हणजे केवळ शोभेचे अश्रू. जे कुणी बलिदानावर, आक्रोशावर तर कणी विलापावर सांडतात. सत्तेतील दलाल, राजकारणी, ढोंगी पुढारी यांना ही जणू चपराकच आहे.
आम्ही फक्त बघत बसू
फार फार तर कवणं रचू
अनाम बलिदानावर…
आक्रोश विलापावर…
जगणं म्हणजे नेमकं काय आहे.? तर तो एक जमाखर्च आहे. रोजनिशी आहे, असं कवयित्रीला वाटतं. त्या म्हणतात, जिथं जीवनाचं गणितच चुकलं आहे, तिथं रोजनिशी काय लिहायची. त्यासाठी रोजनिशीतल्या काही जागा रिकाम्या ठेवण्यातच शहाणपण आहे, या शास्वत सत्यापर्यंत त्या वाचकांना आणून सोडतात.
बेरीज,वजाबाकी,भागाकार
सतत चुकलेलेच!
लक्षात आलं
आपलं गणितच कच्चं.
शेवटी ठरवलं
आपल्या आयुष्याची रोजनिशी
रिकामीच ठेवायची.
इतरांना काही लिहावंसं वाटलं
तर लिहितील बापडे…!
आपल्या आयुष्याची रोजनिशी दुसऱ्याने पूर्ण करावी, हीच माणसाची आगतिकता आहे. हेच त्याचं दुर्भाग्य आणि हिच त्याची परावलंबितता. याची सल बाईलाच जाणवते. ती बाईपणाची झूल बाजूला सारते. आणि, माणूस म्हणून जगायला सिध्द होते.
बाईपणाची झूल सारुन
माणूस म्हणून जगायचंय एकदा.
माणूसपणाच्या जाणिवेचा
स्पर्श अनुभवायचाय एकदा.
बाईपणाची झूल दूर सारल्याशिवाय माणूसपणाच्या जाणिवा, स्पर्श अनुभवता येत नाहीत. हेच खरं.! यासाठी आजच्या स्त्रीने स्वतःला सिद्ध करायला हवं. सक्षम, सजग व्हायला हवं. समाजाला? व्यवस्थेला भिडायला हवं, असा संदेश अरुणाताई देवू पाहतात. जन्माला येणं आणि मरणाला टिपणं हे एक रिंगण आहे. ते प्रत्येकालाच पूर्ण करावं लागतं. मरणाचाही सोहळा करणारी आपली संस्कृती आहे. मरणाचंही गाणं व्हावं, यासाठी इथली स्त्री फेर धरते. झिम्मा करते. स्वतःचं सरण स्वतः गोळा करते. सरण रचते. जणू रिंगणच बांधते. एका शास्वत सत्यापर्यंत कवयित्री कवितेला आणते. अरुणाताईंची कविता अशी, जीवनाचं मर्म, तत्व सांगते. लढायचं बळ देते. जगण्याची आस पेरते.
एक सरपण वेचू बाई
वेचता वेचता सरण रचू बाई
मी सरण रचिते बाई
मी रिंगण बांधते सरणा भोवती
रिंगण बांधू नाच गं घुमा
कशी मी नाचू ?
अरुणाताई दिवेगावकर यांची कविता, बाईवर संस्कृतीने लादलेले सारे तथाकथित बेगडी अलंकार पूर्णपणे नाकारते. ती अनलंकृत होऊ पाहते. बंड करते, स्वातंत्र्याची कास धरते. मुक्त श्वासाची आस धरते. आपल्या लेखनातून एकाचवेळी, बाईपणाची आगतिकता आणि शक्ती प्रकट करणाऱ्या अक्षर-दुर्गा सौ. अरुणाताई दिवेगावकर (९४०५० ४६२३१) यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)