*”मातृ शक्तिस्थळ”*
माय म्हणजेच आई आणि आई म्हणजेचं माय… आई हा दोन अक्षरांचा मिळून बनलेला शब्द…’आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर… याचा प्रत्यय आज ‘आई’वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकास पहावयास मिळतो… जगातील सर्वश्रेष्ठ न्यायालय जर कोणते असेल तर ते आई… मराठी वाड:मयातचं नव्हे तर अनेक लेखकांनी आईची महती सांगितली आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ कवी यशवंत किंवा पाश्चात्य लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी आई विषयी लिहिलेले लेखन आज जगप्रसिद्ध आहे. पण हे सर्व काही वर्षांपूर्वीचं…

आज आपल्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे… आई-वडील निराश्रितपणे जगताना दिसत आहेत… तेव्हा कुठेतरी ‘अंधार फार झाला’ असे वाटू लागते, तेव्हाचं कुठेतरी ‘एखादी पणती ही लुकलुकताना दिसते’… एवढाच आशेचा किरण वाटतो… श्रावण बाळाची आणि भक्त पुंडलिकाची गोडवे गाणारी आपली संस्कृती आज आईला विसरत चालली आहे. फ्लॅट संस्कृती आणि आयुष्यातील स्पर्धां यामुळे कुटुंब मर्यादीत झाले आहेत. मी, माझी बायको व मुलं एवढचं कुटुंब झालं आहे… अशा परिस्थितीमध्ये काही लोकांच्या कुटुंबात आईचे स्थान देवा पेक्षाही श्रेष्ठ असल्याची प्रचिती पहावयास मिळते.
संस्कार – उपदेश आणि योग्य दिशा ही केवळ आई कडूनच मिळते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ मुळेच घडले. हा इतिहास आपणास माहीत आहे, तर महाराष्ट्राला साने गुरुजी सारखा महान लेखक केवळ आई मुळेच मिळाला. कित्येक महापुरुषांनी आपल्या जडणघडणीत केवळ आईचं असल्याचे सांगितले आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आपली प्रेरणा आईच आहे असे अभिमानाने सांगतात. आईची महती कितीही गायली तरी कमीच आहे. अगदी महाभारतात श्रीकृष्णाची ओळख ‘यशोदापुत्र’ म्हणूनच होती. भक्त पुंडलिका मुळेच पांडुरंग पंढरपुरात स्थिरावला.
आई व्यक्ती नसून ती संस्काराची खान असते. परमेश्वराला प्रत्येकाच्या सोबत येता येत नाही म्हणून त्यांनी आपले स्वतःचे एक रूप आई द्वारे प्रत्येका सोबत पाठवले आहे. अशा आईसाठी जगणारे अनेक जण पाहावयास मिळतात. असेच एक कुटुंब लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात आहे. स्वातंत्र्य सेनानी बळीराम सोनटक्के यांच्या कुटुंबात मातृशक्तीचे स्थान सर्वश्रेष्ठ असल्याचे सर्वदूर परिचित आहे. त्यांच्या कुटुंबातील काशीबाई यांना सर्व सोनटक्के कुटुंबीय देवा स्वरूप मानतात. त्यांच्या दातृत्वाची महती मोठी आहे. तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्न, मायने देने हीच काशीबाई सोनटक्के यांची संपत्ती होती. त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी चाकूर शहरात बॉल बॅडमिंटन चे राष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय पंच शिवकुमार सोनटक्के यांनी त्यांच्या जन्मदात्रीचे मंदिर बांधले आहे नव्हे ‘मातृ शक्तिस्थळ’ निर्माण केले आहे. त्यामुळे सर्वांच्या मातृ स्मृती जाग्या होणार आहेत. काशीबाई यांच्या विषयी संपूर्ण परिसर अतिशय आदराने बोलायचा. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या बळीराम सोनटक्के यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे जीवन बदलून गेले. स्वतःच्या संसारा सोबत राष्ट्राच्या संसाराची घडी बसवण्यासाठी भूमिगत असणारे कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना भाजी भाकरी खाऊ घातली. अनेक गुप्त बैठकींच्या त्या साक्षीदार होत्या. आज देहाने त्या नसल्या तरी स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के या निखाऱ्यासोबत हळुवारपणे संसार करून त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे. दोन वर्षपूर्वी काशीबाई यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचे मंदिर उभा केले आहे. सोनटक्के परिवारातील मुलं – मुलींनी आई वडिलांची सेवा करण्याचा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे











