माफ करा चिंतामणी

0
467

(‘चिंतामणराव देशमुख म्हणजे राजीनामा’ एवढीच ओळख या पिढीला आहे.पुढील पिढीला ती पण असेल का माहीत नाही.पण या माणसाच्या विविध पैलूंचा विचार केला तर महाराष्ट्रात जन्मून आणि भारतात काम करून त्यांनी चूक तर केली नाही ना? हा प्रश्न पडतो…

शतकोत्तर रौप्यमहोत्सवातही त्यांचे स्मारक नसावे, हा आमचा कोडगेपणा..)

 

*दैनिक उद्याचा मराठवाडातील साप्ताहिक सदरात चिंतामणरावांशी साधलेला संवाद*

 

माफ करा चिंतामणी…..

 

सन्माननीय चिंतामणरावजी ,

तुमच्या अद्याक्षरानं म्हणजे ‘ सी. डी. देशमुख ‘या नावानंच महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. हे सी. डी. देशमुख म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देणारे (रोखठोक भाषेत सांगावयाचे झाल्यास राजीनामा फेकणारे) एवढीच तुमची आम्हाला ओळख! म्हणजे राजीनामा देणं एवढेच जणू काही तुमच्या हातून सर्वात मोठं झालेलं काम.. या एवढयाच प्रतिमेत अडकवून आम्ही तुम्हाला ‘आमचे’ करून टाकलं.एकदा असं कोणत्या तरी प्रतिमेत अडकवून टाकलं की मग तुमच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्तृत्वाकडे पाहण्याची आम्हाला गरजच वाटली नाही.

 

उत्तर भारतीय राजांच्या पदरी लेखनिक असणारे तुमचे

पूर्वज कोकणात उतरले आणि स्थिरावले.या पुर्वजांनी आपल्या कर्तत्वावर देशमुखी मिळविली. मात्र या घराण्याचा जागतिक पातळीवर नावलौकिक पोचविण्याचे श्रेय तुम्हाला जाते.. रोह्यातील नाता या गावापासून भारतभर आपल्या कर्तत्वाची पताका फडकवित तुम्ही भागानगरीत चिरनिद्रा घेऊन विसावलात. पण तत्पूर्वी देशाच्या कारभारात व विदेशातही आपली नाममुद्रा ठळकपणे उमटविलीत. तुमच्या जन्माला आज १२५ वर्षे पूर्ण होत असताना तुमच्यासारखा माणूस इथे होऊन गेला हेच पचविणे कठीण आहे. कारण ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. असे आम्ही अभिमानाने सांगतो त्या महाराष्ट्राला कुठे तुमची आठवण आहे? आणि मग उर्वरित भारताने तुमचे स्मरण तरी का करावे ? तुमच्या कर्तत्वाची अस्मिता घेऊन मिरवायला ना आम्ही दाक्षिणात्य ना बंगाली! शिवाय अलीकडच्या काळात महत्वाचा घटक असलेली जात या पातळीवर संख्यात्मक दृष्ट्या तुमचे उपद्रवमुल्य नाहीच. ना प्रांताची अस्मिता ना जातीय अभिनिवेष ! सरकारी कार्यालयापुरते सुद्धा तुम्ही उरला नाहीत .कारण तुम्ही पडले ‘राजीनामा’ फेम.निरंकुश सत्तेला तत्वाच्या पातळीवर आव्हान देणं किती कठीण आहे हेच तुमच्या उपेक्षेनं सिद्ध होतं…

 

कोकणातल्या नारळसुपारीच्या बागा सांभाळण्याऐवजी तुम्ही जणू काही शिक्षणात नाव काढण्यासाठीच गाव सोडलं. जगन्नाथ शंकरसेठ शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरून वनस्पतीशास्त्र शिकण्यासाठी तुम्ही इंग्लडला गेलात. आजची आयएएस म्हणजे त्यावेळची आयसीएस परीक्षा त्यावेळी फक्त इंग्लडमध्येच व्हायची.

आता इंग्लंडला आलोच आहोत तर देऊ या परीक्षा ईतक्या सहजतेने ती परीक्षा देत तुम्ही आयसीएस झालात.अर्थात त्या आधी विद्यापीठातल्या शिक्षणातही सुवर्णपदकावर जणू काही तुमचे नाव कोरलेलेच. आयसीएस झाल्यानंतरही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचा तुमचा संकल्प होता. पण लोकमान्य टिळकांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने जो संकल्प रद्द करण्यास भाग पाडले.”काही काळात देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यानंतर प्रशासन चालविण्यासाठी अनुभवी, लोकांची गरज लागणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रशासकीय सेवेतच रहावे “! असे लोकमान्य टिळकांनी सांगितले. प्रत्यक्ष देश स्वतंत्र झाल्यानंतर आयसीएस मध्ये सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र भारताच्या सेवेस परवानगी दयावी का नाही हा विषय चर्चिला गेला. पंडीत जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या विषयावर खल होत असताना नेहरूंना अपेक्षित गुणांची पूर्तता करणारा अधिकारी म्हणून सरदार पटेल यांनी तुमचे उदाहरण दिले. ब्रिटिश भारतातील सेवाकाळातही ही नेहमी सामान्य माणसांच्या कल्याणाचा तुम्ही केलेला विचार इथे प्रभावी ठरला. १९२६ सालापासून मध्यप्रांतातील वसाहती बाबतचे काम असेल की शेती व सामान्य माणसांबद्दलची कणव व प्रामाणिकपणा, निःपक्ष न्यायाबद्दलची तुमची चीड या सा-या बाबी सरस ठरल्या होत्या. लोकमान्यांच्या स्वातंत्र्य विषयक दृढ जाणिवेने व स्वातंत्रोत्तर काळानंतरच्या दूरदृष्टीने नागरी सेवेची जाण असणारा अस्सल भारतीय अधिकारी भारतीय प्रशासन सेवेला मिळाला. पण ही वहिवाटही घालून देण्याचे श्रेय तुमच्या धोरणांना आणि कर्तत्वाला जाते.

 

आचार्य अत्र्यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास ‘देशाचा चिंतामणी ‘ठरलेल्या नायका, तुमच्या कर्तत्वाला कोणत्या निकषात बसवावे ? हा प्रश्न तुमच्या निधनानंतरच्या चाळीशीतही आम्हा पामरांना सुटला नाही.

 

वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी असणा-या तुमचे अर्थशास्त्रातले ज्ञान सा-या जगाला स्तिमित करणारे. भारतीय अर्थव्यवस्था नुकतीच जन्मलेल्या प्रक्रियेत असताना तिने बाळसे धरावे यासाठी जे जे करणे शक्य आहे ते तुम्ही केले. अर्थव्यवस्थेतील धोरण आखणीसाठी समर्पक संस्थामक व्यवस्था उभारल्या ,’खमक्या संस्था उभारा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा आणि नव्या ज्ञानाच्या निर्मितीत गुंतवणूक करा’ हा जणू काही तुमच्या जगण्याचा ध्यास होता .रचनात्मक कार्य हीच जणू तुमची ओळख. ते करताना लहानमोठेपणाचा भेदभाव कधीही तुमच्या मनी आला नाही.

 

पंडीत नेहरूंच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन तुम्ही बाहेर

पडला तरी तुमच्या आणि त्यांच्या संबंधात कधीही बाधा आली नाही. दुर्गाताई आणि तुमच्या विवाहाच्या नोंदणीचे साक्षीदार असणारे पंडीतजी तुमच्या साठाव्या वाढदिवसाला तुमच्या घरी यावेत यात नवल कसले? त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी तुम्ही स्विकारावी म्हणून विचारणा करण्यात आली.अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नेहरूजींना खरमरीत पत्र लिहून राजीनामा दिला असताना पंडीतजी या नियुक्तीबाबत सकारात्मक असावेत ही घटना त्यावेळच्या दिलखुलासपणाला व थोरांच्या वर्तनाला साजेशी होती. वास्तविक पाहता या पदावर युरोपियन व्यक्तीची निवड व्हावी हा दंडक असताना त्याला छेद देत तुमच्या नावाची होणारी निवड हा तुमच्या बुद्धीमत्तेचा, व्यासंगांचा सन्मान होता. या पदाला असणारी प्रतिष्ठा, तगडा ‘मान’आणि तगड़े ‘धन’ असताना तुलनेने कमी मानधनाच्या पदाला म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदाला तुम्ही प्राधान्य दिलेत. त्याला असलेले महत्वाचे कारण म्हणजे तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना तुम्ही दिलेला शब्द. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याचा तुमच्या तुम्ही दिलेला शब्द जेवढा महत्वाचा होता तेवढाच कामात मिळणारा आनंदही. वास्तविक पाहता अर्थतज्ञ म्हणून नाणेनिधीच्या कार्यास प्राधान्य देणे काही वावगे नव्हते . ‘मी पडलो अर्थतज्ञ ‘ अशी भूमिका घेऊन नाणेनिधीच्या संचालकपदावर तुम्ही आंतरराष्ट्रीय मानमरताबाच्या त्या पदावर गेला असता.पण ‘आपल्याला जे काही करावयाचे आहे ते भारतात राहून’ या भूमिकेतून तुम्ही घेतलेला निर्णय आजच्या देश सोडून जाणाऱ्यांना चपराकच ठरतो.

 

अर्थविषयाचा जागतिक तज्ञ असूनही तुम्ही वैयक्तिक आयुष्यात ‘अर्था’ च्या मोहात अडकला नाहीत. दुर्गाबाईंसोबतच्या सहजीवनात दोघांपैकी एकानेच अर्थार्जन करायचे हे एकदाठरल्यानंतर समाजकल्याण खात्याची पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून

मिळणाऱ्या त्यांच्या उत्पन्नाचा स्विकार करताना विद्यापीठ अनुदानआयोगाचा अध्यक्ष म्हणून केवळ एक रुपया मानधनावर काम करणारे तुम्ही आजच्या दलदलीत दंतकथेचा विषय वाटू शकता. अर्थात अशा पदांसाठी आज सत्ताधीशांचा गोंडा घोळणा-यांची फौज पाहिल्यानंतर तुम्हाला आठवणे सुध्दा गुन्हा वाटावा अशी परिस्थिती असताना तुमचे कौतुक ते आम्हाला काय वाटावे ?

 

वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, अर्थशास्त्राचा विचारवंत, संस्कृत

सारख्या भाषेच्या अभ्यासक अशी तुमची विविध रुपे. संस्कृत

मधल्या तुमच्या कवितांना गौरवावे की मराठीतल्या रसिकत्वाला असा प्रश्न असताना नॅशनल बुक ट्रस्टच्या स्थापनेची तुमची कामगिरी पिढ्यानपिढ्यांना उपकृत करणारी आहे. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर ,केंद्रीय अर्थमंत्री, नॅशनल कौन्सिल आॕफ अप्लाईड इकनॉमिक रिसर्चचे संस्थापक , दिल्ली

विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष

इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॕडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष, जिवन

विमा कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे शिल्पकार व दृष्टे अर्थशास्त्री

असणाऱ्या चिंतामणींच्या कर्तृत्वाचे पोवाडे जरी गायिले जात नसले तरी आजच्या समाजजिवनावर

तुमच्या कर्तत्वाची असणारी मोहर अविट आहे.

 

फाळणीनंतर भारत पाकिस्तानच्या दोन्ही मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून काम करताना तुमचे निःपक्षपाती वर्तन सा-या जगासाठी दिशादर्शक आहे. रिझर्व बँकेतील जे अधिकारी / कर्मचारी पाकिस्तानात जाऊ इच्छित होते त्यांना तेथे त्याच पदावर काम मिळावे अशी व्यवस्था तर केलीतच पण समन्यायीपणाच्या भूमिकेतून त्या देशाच्या बँकेकडे ठरविलेला वाटा पोचविण्याची तुमची भूमिका समन्यायी प्रशासकाची होती.डझनावर संख्या उभारून रचनात्मक कामासाठी आपले आयुष्य वेचताना आम्ही तुम्हाला काय दिले? हा प्रश्न उरतोच. मुंबईला महाराष्ट्रात आणावे यासाठी राजीनामा देऊन तुमच्या करिअरचे हौतात्म्य स्विकारून तुम्ही केलेल्या त्यागाची जाणीव आज महाराष्ट्राला किती आहे याचे उत्तर ‘काहीच नाही’ हे आहे. दिल्ली दरबारी निष्ठा असणाऱ्या महाराष्ट्रातील किती सहका-यांनी तुमचे अनुकरण केले? आता असा बाणेदारपणा शब्दकोशापुरता उरला असताना अस्मितेच्या नावावर आमची दुकाने चालू आहेत पण तुमचा बाणेदारपणा आता आम्ही’ नाणे’दार केला आहे. तुमच्या मूळ घराला स्मारकाचा दर्जा मिळू शकत नाही ही आमची शोकांतिका आहे. ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही ताठ बाण्याने उभा राहिलात तो महाराष्ट्र तुम्हाला विसरला. मग हैद्राबादेत शासकीय इतमामाशिवाय तुमचे अंत्यसंस्कार होण्याबाबत आम्ही कुणाला बोल लावूच शकत नाही. आपण मेल्यानंतर आपले पुतळे उभारतील की नाही म्हणून जिवंतपणीच स्वतःच्या नावाने शाळा, महाविद्यालये, कारखाने उभारण्याची दृष्टी असण्याचा कोडगेपणा तुम्हाला शिवणारा नव्हता.आपल्याच बगलबच्च्यांच्या हाती संस्था देऊन आपल्या पश्चात गौरविले जाण्याची तरतूद करण्याचा व्यवहार तुम्हाला जमला नाही. रॅमन मॅगसेसे’, पद्मविभूषण सारखे सन्मान जरी मिळाले असले तरी आमचा कृतघ्नपणा तुमच्या बाबत कायम राहिला. कायम उपेक्षित राहिलेल्या प्रकापंडिता ,त्यामुळे तुमची थोरवी कमी होत नाही एवढेही आम्ही समजू शकलो तर खूप आहे… जमल्यास माफ करा चिंतामणी..

 

तुला’ तोलणारी ‘तुला’ सापडेना कसे माप लावू, तुला तोलताना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here