मराठी “कांतरा” अर्थात “देवक्या ” …!!
मराठी मुलखातील मराठवाड्यात लग्नाच्या पहिल्या दिवशी.. “मरीआई” ( जी गावाच्या बाहेर ग्राम संरक्षक म्हणून बसविलेली असते ) चे दर्शन घेऊन.. देवक काढले जाते. देवक म्हणजे टोटेम… विवाह इत्यादी कार्यामध्ये क्षात्र समाजात आवर्जुन एखाद्या वॄक्ष, फूल, पान्, वेल, सोने,काही वेळा कोचा सारखे जंगली फळ, केर, साळूंखी-मोर अशा पक्षांचे पिस, शस्त्र अशा गोष्टींपैकी एकाची आपआपल्या घराण्याच्या रीती प्रमाणे अग्रमानाने पूजा केली जाते त्यास देवक असे म्हणतात. काही ठीकाणी ह्यास कुळाची फांदी असे देखील म्हणतात.
त्या त्या देवका च्या मुळाशी आपली कुलदेवता निवास करते अशी लोकधारणा असते.विवाह जूळ्वताना गोत्र, नातेसंबध या खेरीज कुळी व देवक यांचाही आवर्जून विचार केला जातो. कश्यप गोत्र सोडून इतर गोत्र व देवक एकच आल्यास विवाह टाळतात. नाते संबध पहाणे, पदर लागणे अशा गोष्टी,वंश पहाणे, हे सर्व कुळ गोत्राचे प्रवर पहाण्या सारखाच प्रकार आहे. बर्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पुर्वापार मिळलेली पदवी अशा स्वरुपाचे असते म्हणून देवक पहाण्याची प्रथा पडलेली आहे.

घरातील लग्नकार्य व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावे, म्हणून घरात कुलदैवत आणि विविध देवी देवता बरोबर आपल्या पूर्वजांची स्थापना करून पूजा केली जाते यांस ‘ देवक ‘
पूजणे अथवा ठेवणे म्हणतात. देवक फक्त ज्येष्ठांकडूनच पूजले जाते, देवक पूजन म्हणजे तुमचे पर्वज या शुभकार्याला बोलावणे असते, पूर्वजांचे आत्मे तुमच्या सोबत असावेत पण तुमच्या शरीरात जाऊ नये म्हणून देवक्याच्या खांद्यावर लोखंडी कुराड असते… ती कुराड आणि घरातल्या मुसळाला हळदाचे खोंब बांधून ती हळदीच्या मांडवावर (जो मांडव आपटा, संमदडाच्या साह्याने बांधला जातो ) ठेवले जाते.. जेणे करून पूर्वजांचे आत्मे आपल्याला बादू नयेत अशी लोकधारणा असते…
विवाहप्रसंगी वर आणि वधू, दोघांच्याही घरी शुभ कार्य असल्याने देवक बसविले जाते.

देवक बसविल्यानंतर त्या घरातील कोणीही व्यक्ति कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावत नाही. एकदा देवक बसविल्यानंतर त्या घरात कांहीही अशुभ घटना
घडली तरी विवाह थांबत नाही अगदी घरात कोणी दगावले असतांना सुद्धां. ह्या सर्व प्राचीन परंपरा आहेत शेकडो वर्षापासून अत्यंत श्रद्धेनी जपल्या जातात…आज तरी ग्रामीण भागात जपल्या जात आहेत.

@युवराज पाटील
( लेखक : लातूर जिल्हा माहिती अधिकारी आहेत )




