महिलांसह युवतींचा लक्षणीय सहभाग
लातूर/प्रतिनिधी ः-
जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमीच्या निमित्ताने शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी मार्केट येथील गौरशंकर मंदिरापासून निघालेल्या या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत महिलांसह युवतींचा लक्षणीय सहभाग होता. विशेषतः महिलांचे झेंडापथक आणि माहेश्वरी युवासंघटनच्या ढोल पथकाचे सादरीकरणाचे कौतुक करण्यात आले.

लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमीच्या निमित्ताने दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते. मात्र गत दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या निर्बंधामुळे ही शोभायात्रा निघाली नव्हती. यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने माहेश्वरी सभेच्या वतीने ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट येथील गौरशंकर मंदिरापासून या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शोभायात्रेत सभेच्या पदाधिकार्यांसह शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभुषा करून घोडे व उंटावर स्वार करण्यात आले होते. त्याचबरोबर समाजातील महिलांचे झेंडापथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. देशातील वेगवेगळ्या ज्योर्तिलींग मंदिराचे देखावे शोभायात्रेत सहभागी झाले होते. माहेश्वरी युवा संघटनांच्या ढोलपथक सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरले. तरुण आणि तरुणी या ढोलपथकात सहभागी होत त्यांनी आपल्या कला सादरीकरणाच्या माध्यमातून लातूरकरांची मने जिंकून घेतली.

गौरशंकर मंदिरापासून सुरु झालेली ही शोभा यात्रा हनुमान चौक, गोलाई, सुभाष चौक मार्गे बालाजी मंदिर येथे महाआरती करुन शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 61 जणांनी रक्तदान केले. जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड व शोभायात्रेचे प्रमुख द्वारकादास सोनी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत सचिव फुलचंद काबरा, कोषाध्यक्ष गोविंद कोठारी, संघटनमंत्री राजेश मंत्री, संयोजक लक्ष्मीकांत कालीया, सांस्कृतीक मंत्री विनय भुतडा, गोकुळ चांडक, बालकिशन मुंदडा गुरुजी, सी.ए. कासट, अकाश कासट, हुकुमचंद कलंत्री, प्रेमकिशन मुंदडा, लक्ष्मीरमण लाहोटी, श्रीनिवास लाहोटी, ईश्वरप्रसाद डागा, अशोक भुतडा, बालकिशन भुतडा, आनंद मालु, अनुराधा कर्वा, अनिता मालु, वदंना दरक, लिला कर्वा, वाहतुक निरिक्षक सुनिल बिर्ला, परिवहन अधिकारी सचिन बंग, मधुसुदर सोनी, दिलीप सोमाणी, विजयभाऊ राठी, डॉ. गोपीकिशन भराडीया, दिपक भुतडा, डॉ. चेतन सारडा, दिपक बजाज, डॉ. सुभाष पल्लोड, बजरंग पल्लोड, धनराज पल्लोड, प्रसिद्धी प्रमुख शाम भट्टड आदींसह माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन, माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी महासभा, गावभाग माहेश्वरी संघटन, माहेश्वरी युगल्स, माय क्लब आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी होत त्यांनी शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शोभायात्रा सांगतेनंतर पल्लोड परिवाराच्या वतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

सर्व छायाचित्रे व वृत्त संकलन : शाम भट्टड