मिशन आयएएस :नाबाद २१…..
देशातील तळागाळातील मुला मुलींना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, त्यांची तयारी करून घेण्यात यावी,त्यांच्यासाठी शिबिरे,कार्यशाळा आयोजित करणाऱ्या ” मिशन आयएएस ” अभियानास आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रा.डॉ नरेशश्चंद्र काठोळे यांनी जवळपास एकहाती चालविलेल्या मिशनवर एक नजर….
डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या अभ्यासिकेची व ग्रंथालयाची रितसर स्थापना सध्या सोलापूर येथे कार्यरत असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन उपविभागीय अधिकारी अमरावती श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते अमरावती येथे10 ऑगस्ट 2002 रोजी झाली. या कार्यक्रमाला तत्कालीन उपायुक्त श्री सदानंद कोचे आणि पितामह डॉ. मोतीलाल राठी तसेच प्राचार्य अण्णासाहेब हिवसे हे उपस्थित होते.
आतापर्यंतच्या वाटचालीत या अकादमीने महाराष्ट्राच्या 36 ही जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची चळवळ पसरवली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या काळातही डॉक्टर पंजाबराव देशमुख देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएसने जवळपास दोन हजार आँनलाईन कार्यक्रम आणि दोनशेच्यावर झूम मीटिंग आयोजित केलेल्या आहेत. या सर्व उपक्रमात आतापर्यंत जवळपास 350 आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत .माझ्या मते हा स्पर्धा परीक्षेच्या जगतातील उच्चांक असावा.
अमरावतीमध्ये पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सुरू झाली ती 12 मे 2000 रोजी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरेसाहेब यांचे विद्यमान प्रधान सचिव श्री विकास खारगे तेव्हा अमरावती विभागात जिल्हाधिकारी होते .त्यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले होते.
त्यानंतर दोन वर्षानंतर संस्थेने रितसर ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केली. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभ्यासिका व ग्रंथालय स्थापन करून संस्थेने खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची चळवळ महाराष्ट्रात सर्वदूर पसरवली आहे .फक्त एक रुपया इतक्या अल्प शुल्कामध्ये दुसऱ्या वर्गापासून आयएएसची तयारी करणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन अंतर्गत दुस-या वर्गापासून मुलांना मराठी इंग्रजी व सेमी या तीन भाषांमधून याचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे .फक्त एक रुपया भरून जी मुलं या उपक्रमात सहभागी होतात त्या मुलांना पुस्तके विनामूल्य देण्यात येतात .त्याचबरोबर त्यांच्या सराव परीक्षा घेण्यात येतात .त्यांचे पेपर्स तपासण्यात येतात. त्यांना गुणपत्रिका प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येते.
महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातील जवळपास 26000 मुले सहभागी झालेली आहेत .दुसरे महत्त्वाचे म्हणजे १२ मे २००० पासून तर आज पर्यंत या 21 वर्षात मिशन अंतर्गत जवळपास संपूर्ण भारतामध्ये 15000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन मिशन आयएएसने एक विक्रम स्थापन केलेला आहे .
अगदी जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक तामिळनाडू केरळ छत्तीसगड झारखंड बिहार व राजस्थान या राज्यात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन देशामध्ये स्पर्धा परीक्षेचे लोण पसरविले आहे.
सर्वात महत्त्वाचं प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी जेव्हा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घ्यायला कुठे जातात तर ते मानधन घेत नाहीत.निस्पृहपणे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा या उपक्रमाला पूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये तसेच त्या विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये मिशन आयएएस ने वेळोवेळी स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी व्यापक जनजागृती केली आहेत.
विशेष म्हणजे डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने स्वतःचा आयएएसचा कोचिंग क्लास काढला नाही. कारण कोचिंग क्लासच्या माध्यमातून अर्थाजन करणे हा उद्देश नाहीच .स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग आवश्यकच आहे असेही मिशनला वाटत नाही .म्हणून देखील क्लास काढला नाही .मात्र विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत ज्या अडीअडचणी असतील त्यासाठी मात्र अकादमीने नेहमी पुढाकार घेतला आहे .
अकादमीच्या झुम मीटिंगमध्ये दर रविवारी दुपारी चार वाजता व सायंकाळी सात वाजता मिशन आयएएस परिवारामध्ये सहभागी असलेले किमान चार आयएएस अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना नियमितपणे सविस्तर मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देतात. अशाप्रकारे दर रविवारीं चार अधिकारी उपलब्ध करून देणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे. अकादमीमध्ये मोठ्या संख्येने आयएएस ,आयपीएस ऑफिसर यासाठी येतात की मिशन आयएएस हे काम सेवाभावी वृत्तीने करीत आहे व करणार आहे .
मिशन आयएएसच्या पावलावर पाऊल ठेवून कोल्हापूर येथील पुढचं पाऊल चांगुलपणाची चळवळ महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व करियर कट्टा या उपक्रमाचे जनक पितामह डॉ. ज्ञानेश्वर मुळे व त्यांचे सहकारी श्री यशवंत शितोळे यांनी पुढाकार घेऊन आयएएस आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे .हा उपक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .त्यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील तीन हजार 149 शैक्षणिक संस्था या उपक्रमात रितसर एक रुपया भरून म्हणून संलग्न झालेल्या आहेत.
या कार्यक्रमात दररोज एक आयपीएस व राजपत्रित अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना दररोज सायंकाळी सहा वाजता मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्यापासून तर मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे .
डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचा मिशन अंतर्गत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. गेल्या जवळपास 21 वर्षांपासूनचा हा उपक्रम .मिशन आयएएस अंतर्गत आतापर्यंतचे जवळपास सर्व आयएएस टॉपर या ना त्या निमित्ताने अमरावतीला येऊन गेले आहेत .अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात हा भव्य सत्कार समारंभ संपन्न होतो. यावर्षी हा समारंभ ऑनलाईन घेण्यात आला. यामध्ये जवळपास स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहा विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे , सनदी अधिकारी श्री रंगनाथ नाईकडे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यशदाचे डॉ. बबन जोगदंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की या वर्षी झालेल्या आयएएस एमपीएससी या सर्व परीक्षेमध्ये टॉपवर आलेली मुले ही अमरावती जिल्ह्यातीलच आहेत. संपूर्ण
भारतातून आय ए एस च्या परीक्षेत मुलींमधून पहिली आलेली कुमारी सृष्टी देशमुख अमरावती जिल्ह्यातील धामणगाव काटसुर येथील मूळ राहणारी आहे. तसेच उपजिल्हाधिकारी परीक्षेमध्ये पहिली आलेली कुं. पर्वणी पाटील अचलपूर ही मुलगी देखील कुष्ठा या गावची राहणारी आहे .त्याचप्रमाणे तहसीलदाराच्या परीक्षेमध्ये पहिली आलेली रूपाली मोगरकर ही मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा येथे राहणारी आहे. तसेच लिपिकाच्या परीक्षेमध्ये पहिली आलेली कुमारी प्राजक्ता चौधरी ही वरूड येथील राहणारी आहे .त्याचबरोबर कर सहाय्यकाच्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला आलेला विद्यार्थी मोहम्मद शाहिद हा दर्यापूरचा राहणारा आहे .
विशेष म्हणजे या निकालामध्ये दोन अभूतपूर्व निकाल मिळालेले आहेत .ते म्हणजे तिवसा येथील सायकलवर भंगार विकणारे श्री बाबाराव गडलिंग यांचा अक्षय गडलिंग हा मुलगा नायब तहसीलदारची परीक्षा पास झाला आहे. त्याचबरोबर अमरावतीच्या साईनगर भागातील अकोली या गरीब वस्तीत राहणारी कु. प्राजक्ता बारसे ही मुलगी देखील नायब तहसीलदारची परीक्षा पास झालेली आहे .चांगले वातावरण तयार झाले तर मुले मोठ्या संख्येने पास होतात आणि अमरावतीने तर यावर कहर केलेला आहे. सर्व परीक्षांमध्ये प्रथम येऊन अमरावतीच्या मुलांनी यशाचा झेंडा रोवला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे दरवर्षी विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन घेण्यात येते .स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार व्हावे हा यामागील उद्देश आहे. आतापर्यंत अमरावती गुरुकुंज मोझरी व खामगाव येथे ही स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलने झालेली आहेत. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. अशाप्रकारे सातत्याने स्पर्धा परीक्षेचे साहित्य संमेलन घेणारी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही महाराष्ट्रातील एकमेव अकादमी आहे. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे मुख्य सचिव मा. श्री जे पी डांगे. दुसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे खाजगी सचिव व सनदी अधिकारी श्री रवींद्र जाधव तर तिस-या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते ते पुणे येथील वनसंरक्षक श्री रंगनाथ नाईकडे यांनी. या संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षीचे साहित्य संमेलन हे ऑनलाईन होणार आहे.
अकादमीने दरवर्षी ग्रीष्मकालीन शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला आहे. आतापर्यंत ही शिबिरे अमरावतीच्या भव्य अशा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये होत होती. आता मात्र ही शिबिरे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमामध्ये नियमितपणे होतात. यावर्षी हे शिबिर ऑनलाइन घेण्यात आले आणि चांगला प्रतिसाद मिळाला .या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरांमध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. या शिबिरामध्ये सर्व आयएएस, आयपीएस अधिकारी आवर्जून मुलांना शिकवायला येतात. विशेष म्हणजे दरवर्षीचा आयएएस टॉपर या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हमखास येतो.
स्पर्धा परीक्षेचा प्रचार सर्वदूर व्हावा यासाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर याबरोबरच एक अभिनव उपक्रम या अकादमीने राबवलेला आहे तो म्हणजे पुस्तक प्रकाशन. पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा संदेश महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात झाला आहे .” मी आयएएस अधिकारी होणारच ” “शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर ” “विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा” ” विद्यार्थिनी अधिकारी व्हा” “प्रेरणा स्पर्धा परीक्षेची” “आनंदी राहा यशस्वी व्हा”, “स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी” ” स्पर्धा परीक्षेची तयारी, घरच्याघरी” ” सक्सेस स्टोरीज ऑफ आयएएस ऑफिसर्स ” “सक्सेस स्टोरीज ऑफ आयपीएस ऑफिसर्स “अशी विविध पुस्तके प्रकाशित करून अकादमीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.
विशेष म्हणजे श्री विशाल नरवाडे,नवनियुक्त आय ए एस अधिकारी तथा विद्यमान सहाय्यक जिल्हाधिकारी सांगली हे आवर्जून सांगतात ही काठोळे सरांचे मी आयएएस अधिकारी होणारच हे पुस्तक वाचून मला जिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे झारखंड येथील जिल्हाधिकारी श्री रमेश घोलप देखील या उपक्रमामुळे विद्यार्थीदशेत प्रेरित होऊन आयएएस कडे वळले व आयएएस झाले.
डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने जेव्हा मिशन आयएएस हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रातून फक्त तेवीस विद्यार्थी आयएएसची परीक्षा पास होत होते .आता हा आकडा 100 च्या जवळपास पोहोचला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीने या संदर्भात आपला खारीचा वाटा उचलला आहे.
आज महाराष्ट्रात ठिकाणी स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात. अकादमीने या कामाला रितसर प्रामाणिकपणे वीस वर्षापूर्वी प्रारंभ केला आहे .आजच्या तरुण वर्गाला जागे करण्याचे काम केले आहे .करीत आहे व करणार आहे. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास मावळत्या सूर्याचे या जगाला प्रश्न केला माझे काम माझ्या नंतर कोण करेल ? कोणी उत्तर दिले नाही एक मिणमिणती पणती म्हणाली .परमेश्वरा मी माझ्या परीने प्रयत्न करीन .या भावनेने डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने कार्य केले आहे. आधी केले मग सांगितले हा संकेत अकादमीने पाळला आहे.
अकादमीच्या प्रवासामध्ये ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी स्पर्धा परीक्षेच्या जगतात विनामूल्य कार्य करू शकली व करणार आहे.तसेच विशेष आभार मानले पाहिजेत ते म्हणजे
काठोळे सरांच्या पत्नी सौ विद्याताई आणि परिवाराचे, जे सरांना सतत सक्रिय साथ देत आहेत. अकादमीच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ
(राज्य समन्वयक मिशन आयएएस )
9869484800