26.2 C
Pune
Sunday, May 18, 2025
Homeराजकीय*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन*

पुणे, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

स्वत:च्या कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख आपले मानून जगणारे खूप कमी असतात. लक्ष्मण जगताप हे त्यापैकी एक होते, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री म्हणाले, लक्ष्णम जगताप यांनी लोकांसाठी काम केले. ते अतिशय लोकप्रिय आमदार होते. निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. उपचार सुरू असतानाही विधानभवनात मतदान करताना त्यांची कर्तव्याप्रति असलेली निष्ठा दिसून आली. आपल्या मतदारसंघात जनहिताचे काम करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. समाजासाठी वाहून घेतलेल्या दुर्मिळ माणसांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे समाजाची, पक्षाची न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी कर्करोगाशी मोठी झुंज दिली. त्यांचा मूळ स्वभाव संघर्षशील असल्याने त्यांनी कधी हार मानली नव्हती. पिंपरी-चिंचवड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सामान्य माणसाशी जोडल्यामुळे अतिशय लोकप्रिय आमदार म्हणून ते परिचित होते. त्यांच्या कल्पक स्वभावामुळे त्यांनी विविध प्रकल्प मतदार संघात राबविले. यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील मतदान केले. आज आमच्यातून एक योद्धा निघून गेल्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह उपस्थित मंत्री महोदयांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शंकर जगताप, विजय जगताप, श्रीमती अश्विनी जगताप, आदित्य जगताप, ऐश्वर्या रेणुशे-जगताप, विराज रेणुशे उपस्थित होते.

तत्पूर्वी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]