आमदार धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; रुग्णालय होणार आता ५० खाटांचे
—
लातूर : ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे लातूर तालुक्यातील मुरुड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर आता ५० खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयात झाले आहे. यानिमित्ताने मुरुड आणि परिसरातील ग्रामस्थांची आरोग्यविषयक मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. याचे मला मनापासून समाधान आहे, अशा भावना आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केल्या.
मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे खाट उपलब्ध नसल्यास अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन आणि ग्रामस्थांची तसेच या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार श्री. धिरज देशमुख यांनी मुरुड येथे उप जिल्हा रुग्णालय होण्यासाठी पुढाकार घेतला.

यासंदर्भात आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर आता ५० खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयात झाले आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे मुरुड आणि परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. शिवाय, एकाच वेळी अनेक रुग्णांना आपल्या भागात उपचार घेता येणार आहेत. यामुळे जलद उपचार मिळण्याबरोबरच जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना लागणारा प्रवास खर्च व वेळही वाचणार आहे. या निर्णयाबद्दल आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

ग्रामस्थांनी मानले आभार
लातूर तालुक्यातील मुरुड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाले. याबद्दल सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल मुरुड येथील ग्रामस्थांनी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले.
—




