*मेघालय वसतिगृह भूमिपूजन सोहळा*

0
355

पूर्वांचल अजूनही उर्वरित भारताशी समरस झालेला नाही

पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे काका यांची खंत लातूर ;(प्रतिनिधी)- अरुणाचल, आसाम ,मेघालय ,मणिपूर ,मिझोराम, नागालँड,व त्रिपुरा ही राज्य म्हणजे पूर्वांचल म्हणून ओळखला जातो. सत्तर वर्षानंतरही हा भाग सांस्कृतिकद्रष्टा उर्वरित भारताशी समरस झालेला नाही , याचा विपरीत परिणाम येथील जनजीवनावर व राष्ट्रीय एकात्मतेवरही होत आहे ,अशी खंत पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.


. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित पूर्वांचल मेघालय विद्यार्थी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा रविवारी संपन्न झाला .या प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. रेणुकाई केमिस्ट्री व आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर आप्पा बिडवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व विधिवत पूजन करून या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले . याप्रसंगी मंचावर रा स्व संघ जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरुण डंके , जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष एस. आर .कुलकर्णी ,जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, निधी संकलन समिती प्रमुख अभियंते अतुल ठोंबरे , प्रकल्प प्रमुख तथा बांधकाम समितीचे प्रमुख योगेश तोतला यांची प्रमुख उपस्थिती होती.


हा भूमिपूजन सोहळा नसून मातृभूमी पूजन व राष्ट्र पूजन आहे असे डॉ.अशोक कुकडे काका यांनी प्रारंभीच आपल्या भाषणात स्पष्ट केले. कुकडे काका यांनी पूर्वांचलाचा इतिहास , सद्यस्थिती आणि राजकीय इच्छाशक्ती यावर विस्तृत भाष्य केले .ते म्हणाले की पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीमुळे आणि दुर्लक्षामुळे पूर्वांचलातील सात राज्यातील शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक स्थिती तील दुरवस्थेमुळे तेथील समाज अस्वस्थ आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तारूढ झाल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे .इतर क्षेत्रात सुधारणा झाल्या असल्या तरी अजूनही तेथील सामाजिक , वैचारिक क्षेत्रात अपेक्षित बदल झालेले नाहीत . राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा , एकात्मता वाढीस लागण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे .


शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपल्यावर बालपणी संघाचे संस्कार झाले असून आपल्या व्यवसायात या संस्काराचा शिस्तीसाठी चांगला उपयोग होत आहे अशी कबुली त्यांनी दिली . स्वच्छ , प्रामाणिक पिढी निर्माण होण्यासाठी आणि देशभक्त नागरिक निर्माण करण्यासाठी व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी संघ संस्कार हे महत्त्वाचे व अनिवार्य आहेत असे सांगत त्यांनी या वसतिगृह उभारण्यासाठी जी जी आर्थिक मदत लागेल ती देण्याचे अभिवचन दिले .


अतुल ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले .लातुरात पंचवीस वर्षापासून भाड्याच्या जागेत मेघालय वसतिगृह लोकाश्रयातून चालवले जाते ; परंतु विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी निवासस्थान असावे यासाठी स्वतःच्या जागेत वसतिगृहाची उभारणी केली जात आहे . जवळपास पन्नास लाख रुपये खर्चाच्या या वसतिगृह उभारणीस लातुरातील दानशूर मंडळींचा हातभार लागत आहे , असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले . योगेश तोतला यांनी आभार प्रदर्शन केले तर सीमा अयाचित यांनी वैयक्तिक पद्य म्हटले .या कार्यक्रमास विनोद कुचेरिया , अजित पाटील कव्हेकर , सुधाकर जोशी , डॉ. विश्वास कुलकर्णी , अनिल अंधोरीकर , रामचंद्र बिलोलीकर, नरेंद्र पाठक , डॉ.मनोज शिरुरे, शांताराम देशमुख , शरदराव कुलकर्णी , निशिकांत कुलकर्णी , गोपाळ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here