भेटी लागे जिवा,लागलेसी आस..
सगळ्या राजकीय भेटी गर्भित इशारा देण्यासाठीच असतात का? हा कायम पडलेला प्रश्न..मोठ्या लोकांनी खाजगीत भेटायचं असतं आणि सामान्यांनी त्यावर चर्चा करायची,एकमेकांची ऊणेदुणे काढत राहायचं हे ठरलेलं आहे..याची चर्चा जरूर करा पण राजकारण शुचिर्भूत राहिले नाही हेही लक्षात ठेवा..मग कार्यकर्त्यांनी निष्ठेच्या गप्पा कशासाठी मारायच्या?एखादा नेता सकाळपासून पक्षाच्या व्यासपीठावर गप्पा मारणार आणि संध्याकाळी तिकिटासाठी,स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाच्या दारात जाऊन उभा राहणार..कार्यकर्त्यांनी रात्रीतून निष्ठा आणि झेंडे बदलायचे आणि पुन्हा त्याचा जयजयकार करायचा..कुणी काही का असेना मात्र भारतीय राजकारणात सुरू असलेला हा स्वार्थी डाव आता जनतेने ओळखायला हवा..महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला हा पहाटेपासूनचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा मांडणारा आहे..परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानाला भेटले अनेकांनी आपल्या कंडया पिकवल्या,कुणी राष्ट्रवादीला गर्भित इशारा देण्यासाठी उद्धव ठाकरे भेटले असे सांगितले तर कुणी भाजप सेना एक होऊन आगामी सत्ता बनवेल असे सांगितले..नेते भेटत राहतात आम्ही आमच्या मनाचे मांडे भाजत राहतो.काल शरद पवार पंतप्रधानांना भेटले, सुरू झाले जाणकार म्हणणारे,काहींनी काहीही तर्कवितर्क लावून आपली बाजू मांडली..हे का आणि कशासाठी होते?नेत्यांची विश्वासार्हता यामुळे अबाधित राहते का?अडचणीच्या काळातच आपण भेटायला का जातो याचाही अभ्यास राजकीय नेत्यांनी करायला हवा..या अश्या गोष्टींमुळे आज जो कार्यकर्ता राजकीय लोकांसोबत सोयीने वागत आहे त्याला हीच कारणे कारणीभूत आहेत..कोण कोणाला भेटावे याला काही बंधन हवीत का? राजकीय नेत्यांना काही आचारसंहिता लागू असावी का?पक्षीय बंधने म्हणजे नेमकी काय?एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना आम्ही काही बंधने लादणार आहोत की नाही?
जर राजकीय वरिष्ठ नेत्यांनीच ही आचारसंहिता पाळली नाही तर कार्यकर्त्यांनी ती पाळायलाच हवी का? अश्या अनेक प्रश्नांची मालिका आज मनामध्ये आहे..प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते,त्या विचारधारेनुसार पक्ष काम करत राहतो,असे काही घडताना दिसले की कार्यकर्त्यांनी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारायची?की नेत्याप्रमाणेच सर मिसळ करत जगायचं हे ठरवायची गरज आता निर्माण झाली आहे..राजकीय नेत्यांनी तडजोडी करत पक्षाचा अजेंडा रेटायचा आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर खांद्यावर झेंडे घेऊन प्रामाणिकपणे सतरंज्या उचलायच्या हे किती दिवस चालायचे..शरद पवार असोत की उद्धव ठाकरे की मोदी असोत प्रत्येकाला सोयीचे राजकारण करायचे आहे..सोयीने एकमेकाला शह काटशह द्यायचे आहे..आता कार्यकर्त्याला विचार करणे गरजेचे आहे..कसे जगायचे?कुणासाठी जगायचे?कशासाठी जगायचे?राजकीय इथिक्सच्या गप्पा फक्त मेळाव्यातच मारायच्या का?असे अनेक प्रश्न आज उपस्थित झाले आहेत..आम्हाला या सगळ्या भेटीची आस लागली आहे..जे घडायचे ते घडू देत,फक्त आता कार्यकर्त्यांचा विश्वासघात करू नका..
@ संजय जेवरीकर
पत्रकार,सरपंच











