24.1 C
Pune
Saturday, February 7, 2026
Homeलेख*यशस्वी पत्रकार.. यशस्वी माणूस..*

*यशस्वी पत्रकार.. यशस्वी माणूस..*

वाढदिवस विशेष

जगदीश हा बाबा दळवींचा आवडता शिष्य… त्याची दोन कारणं.. पहिलं म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जात त्यानं केलेलं लग्न.. दुसरं.. त्याचा स्वभाव.. गोष्टीवेल्हाळ, सरळ, साधा, निष्कपट.. शिवाय उत्तम लेखणी, साहित्याची चांगली जाण आणि शुध्द लेखन.. त्यामुळं अग्रलेखाच्या डिक्टेशनचं काम जगदीशकडंच असायचं. जगदीशनं डिक्टेशन घेतलं की, बाबांना वाक्य सुटण्याची, शुध्द लेखणाची चूक व्हायची काळजी नसायची.. जगदीशलाही ते काम आवडायचं.. मला मात्र अग्रलेखाचं डिक्टेशन घ्यायला अजिबात आवडायचं नाही.. “अशी कारकुनी करण्यासाठी मी पत्रकारितेत आलो नाही” असं वाटायचं.. त्यामुळं अग्रलेख डिक्टेशनाची माझ्यावरची जबाबदारी मी अलगतपणे जगदीश पिंगळेवर सोपविली अन मी निसटलो.. त्यानं मात्र ती अनेक वर्षे निष्ठेनं पार पाडली.. मला आज वाटतं की, पत्रकार म्हणून जगदीशच्या झालेल्या जडणघडणीत बाबा दळवींच्या अग्रलेख डिकटेशनचा मोठा वाटा आहे.. बाबांसारखया शिध्दहस्त पत्रकाराचा दीर्घकाळ सहवास जगदीशला लाभला त्याचा नक्की फायदा त्याला झाला.. सामाजिक विषयाकडे आपलेपणानं पाहण्याचं बाळकडू त्याला बाबांकडून मिळालं हे नाकारता येणार नाही..बाबा बरोबर राहिल्यानं सामाजिक विषय कळले, त्यातली गुंतागुंत कळली, त्याची उकल करण्याचे मार्ग दिसले..त्याचा पुढील आयुष्यात त्याला नक्की उपयोग झाला

जगदीश अगोदर औरंगाबादला मुख्य ऑफिसला उपसंपादक होता.. मी बीडला जिल्हा प्रतिनिधी होतो.. पण मी लोकमत सोडून पुण्याला आलो आणि जगदीश माझ्या जागेवर बीडला जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेला.. जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यानं जिल्ह्यातले असंख्य सामाजिक प्रश्न हाताळले.. पाणी प्रश्न, महिलांचे प्रश्न, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न त्यानं तळमळीनं मांडले…राजकीय मांडणी करताना मात्र तो धास्तावलेला आहे की, काय असं त्याचा मजकूर वाचताना वाटायचं.. राजकारण हा त्याचा पिंडही नव्हता.. त्यामुळे चळवळीतले जेवढे मित्र त्याला लाभले तेवढी राजकारणात त्याची फारशी कोणाशी गट्टी जमली नाही.. याचं आणखी एक कारण असं की, पुढारयांच्या पुढं, पुढं करणं त्याला कधी जमलं नाही, त्यांच्यासमोर कधी हात पसरायची देखील त्याला गरज पडली नाही.. रात्रीच्या पार्ट्या वगैरे पासून तो अलिप्त असायचा.. देव धर्म जपणारा, आध्यात्मिक वृत्तीचा, मास, मच्छी, मद्य यापासून दूर असलेला जगदीश खरं म्हणजे पत्रकारितेत अनफिट होता.. परंतू गेली ४० वर्षे बदनामीचा अंगावर एक डाग ही न येऊ देता, अत्यंत शांतपणे, कोणाला अंगावर न घेता किंवा कोणाच्या अंगावर न जाता या माणसानं प्रामाणिकपणे, आदर्श पत्रकारिता केली.. ललित लेखनात गती असलेला जगदीश खरं तर चांगला प्राध्यापक झाला असता.. पण मिळालेल्या क्षेत्रातही त्यानं इमानेइतबारे काम करून नावलौकिक मिळविला..मला मात्र नेहमी वाटतं, जगदीश औरंगाबादहून परत बीडला गेला आणि त्याची प्रगती खुंटली.. लोकमत हेच त्याचं विश्व झालं.. त्यानं पुढचा टप्पा पुण्याचा गाठला असता तर कदाचीत तो संपादकही झाला असता.. पण माझं दुसरं मन असंही सांगतं की जगदीश बीडला राहिला तेच बरं झालं.. तो चांगला संपादक झाला असता पण तो टीम लिडर होऊ शकला नसता.. त्यासाठी जी चलाखी, जो बेडरपणा, जी धाडसीवृत्ती लागते ती जगदीशकडे नाही.. मी याबद्दल जगदीशला अनेकदा बोललो…”तुझ्या बरोबरचे आम्ही काहीजण संपादक झालो, तुझ्या लेखणीत ताकद असताना देखील तू आहे तिथंच राहिलास” मात्र जगदीशला त्याची कधी खंत वाटली नाही.. वाटत नाही.. जे आयुष्य, जे कार्य वाट्याला आले त्यात समाधान मानणारा असलयानं आपण आहो तिथंच राहिलो याचं वाईट त्याला वाटलं नाही.. त्यामुळंच तो खरया अर्थानं जीवनाचा आनंद घेऊ शकतो.. कधी नाटकात कामं करतो,कधी कीर्तन करतो, कधी गाणं गातो , कधी नातवात रमतो..कधी पारायण करतो, पुस्तकं लिहितो… थोडक्यात जगदीश मस्त आयुष्य जगतोय.. हे भाग्य फारच थोडयाना मिळतं.. म्हणूनच जगदीश एक यशस्वी पत्रकार आणि यशस्वी माणूस आहे..असं मला वाटतं..

जगदीश आणि मी लोकमतला एकाच दिवशी ट्रेनी उपसंपादक म्हणून रूजू झालोत.. माझ्या बीड जिल्ह्यातला म्हणून मला त्याच्याबद्दल विशेष ममत्व.. आमचा लोकमतचा सहप्रवास जेमतेम एक वर्षाचा असेल पण या काळात आमची चांगली दोस्ती झाली.. ती आजतागायत टिकून आहे.. खरं म्हणजे आमच्या दोघांचे स्वभाव दोन टोकाचे.. तो शांत, संयमी, मी त्याला कधी रागावलेला पाहिलेला नाही.. समोरचा अंगावर आला तरी तू मोठ्या बापाचा म्हणत एक पाऊल मागे घेणारा.. कट, कपट, कारस्थान, यापासून दूर.. कोणाबद्दलही वाईट न बोलणारा, वाईट न लिहिणारा.. उलट मी.. वृत्तीने बंडखोर.. लोकांना अंगावर घेणं, त्यांच्या अंगावर जाणं, दोन हात करणं, लेखणीचे फटकारे मारत दररोज नवे शत्रू निर्माण करणं हा आमचा आवडता उद्योग.. तरीही आमची दोस्ती जमली.. ती टिकली देखील.. अलिकडे आमच्या फारश्या भेटी होत नाहीत.. त्यामुळे सौ. वहिनींची सारखी तक्रार असते, “तुम्ही मोठे झालात, आम्हाला विसरलात.. दारावरून जाता पण घरी येत नाही “.. ते खरंही आहे.. व्याप वाढल्याने घरी जाणं होत नाही पण जगदीश बरोबर फोनवर नक्की बोलणे होते.. … घरात कंटाळा आला, कधी मन उदास झालं, नैराश्य आलं की, जवळचा आणि हक्काचा मित्र म्हणून जगदीशला फोन करतो.. अनेक किस्से त्याच्या जवळ असल्याने तो ते सांगत राहतो आणि मी ऐकत राहतो…बरं वाटतं.. नितळ मनाचा, माझ्याकडून कधीच कोणतीच अपेक्षा न ठेवणारा, पण माझ्यावर निर्मळ प्रेम करणारा हा माझा मित्र आहे..

जगदीशला पत्रकार म्हणून अनेक मान सन्मान मिळाले, कौतूक झालं, राज्यभर त्याचं नाव झालं.. उद्या त्याचा अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे.. आपल्या गावात, आपल्या माणसांत आणि आपल्या माणसांनी केलेलं कौतूक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं असतं.. हे भाग्य सारयांनाच मिळतं असं नाही.. कारण आपला माणूस एवढा मोठा आहे हेच अनेकदा लोकांना कळत नाही.. जगदीशच्या बाबतीत असं झालं नाही त्याचा नक्कीच आनंद आहे.. पत्रकार संघाचे दत्ता आंबेकर आणि गजानन मुडेगावकर यांनी स्मरणपू्र्वक जगदीशचा सन्मान करायचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार..
जगदीशचं अभिनंदन आणि शुभेच्छा..
जग्गूदादा आणि सौ. वहिनी तुम्ही शंभरवर्षे निरोगी आयुष्य जगावेत.. आणि आपली “क्रांतीकारी जोडी” सलामत राहो एवढीच शुभेच्छा

एस.एम देशमुख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]