23.6 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*राज्य महिला आयोगाची ‘आरोग्य वारी’ सोलापुरात दाखल*

*राज्य महिला आयोगाची ‘आरोग्य वारी’ सोलापुरात दाखल*

महिला वारकऱ्यांसाठी विविध सुविधांचे रूपाली चाकणकरांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. २१ जून – आषाढी वारीत सहभागी होणार्या लाखो महिला वारकर्यांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून आयोजित ‘आरोग्य वारी’ सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली असून आज नातेपुते येथे महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम अशा सुविधांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उद्घाटन केले. महिलांना त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती देणाऱ्या फिरत्या एलईडी स्क्रीनचे उद्घाटन आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ची पालखी उद्या नातेपुते येथे दाखल होत आहे. नंतर अनेक संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. या अनुषंगाने नातेपुते येथे रूपाली चाकणकर यांनी पाहणी करत संपूर्ण जिल्ह्यात महिला वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा प्रशासनाकडून आढावा घेतला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षा पलंगे, स्थानिक नगरसेवक, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे आदी उपस्थित होते.

महिला वारकर्यांना वारीत चालत असताना आरोग्य सुविधा, सुरक्षितता उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आरोग्य वारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आरोग्य वारीचे हे दुसरे वर्ष आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आरोग्य वारी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर आरोग्य वारी सोलापुर जिल्ह्यात दाखल झाली आहे.

सोलापुर जिल्ह्यात पुढचे काही दिवस जवळपास १५ लाख वारकरी वास्तव्य करणार आहेत. यात लाखोंच्या संख्येने महिला वारकरीही असल्याने प्रशासनाने महिलांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २४७५ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी १५५ डॉक्टर उपलब्ध आहेत. पाऊस लांबल्याने असलेल्या उष्णतेची काळजी घेत निवारा मंडपात एकाच वेळी चार हजार महिला झोपू शकतील अशी व्यवस्था असून मोठे पंखे लावण्यात आले आहेत. अनेक गावकरी आपली खाजगी शौचालये महिलांना उपलब्ध करून देत असतात मात्र ते ओळखता यावे यासाठी वेगळे झेंडे लावून व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 84 अंगणवाड्यांमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या तयारीची ही माहिती देत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आषाढी पर्यंत आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे वारकरी म्हणून सेवा करणार आहेत असे नमूद केले.

सोलापुरातील वारी हरित वारी व्हावी यासाठी ११९७५ झाडे महिला वारकऱ्यांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत. त्याचे उद्घाटन आज आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते एक रोपटे लावून करण्यात आले. झाड लावणे नव्हे तर ते जगवणे हे आमचे उद्दिष्ट आहे असेही श्री स्वामी यांनी यावेळी सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, मी स्वतः गेले अनेक वर्ष वारीत पायी चालत सहभागी होत आहे. त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणींबाबत मला जाणीव होती. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष झाल्यानंतर महिलांसाठी विशेष सुविधा असाव्यात अशी आग्रही भूमिका मी मांडली. महिलांना त्यांचे कायदे अधिकार समजावून सांगणाऱ्या फिरत्या एलईडी स्क्रीन चा उपक्रमही कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ श्री स्वामी यांनी गरजू मुलींना सायकल देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम संपूर्ण राज्याने अनुकरण करावा असा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले . आज श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते चार विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. पुणे सातारा जिल्हा प्रशासनाने आरोग्य वारीची प्रभावी अंमलबजावणी केली आणि आता सोलापूर प्रशासनानेही चांगली तयारी केली आहे. त्याबद्दल श्रीमती. चाकणकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

ooo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]