मंगेश पाडगांवकर हे खरे आनंदयात्री ! अत्यंत सुंदर चालीमध्ये बांधता येतील अशी शेकडो गीते त्यांनी रचली, वात्रटिका रचल्या. पण पाडगावकर यांची ‘ बोलगाणी ‘ म्हणजे आगळीवेगळी अशी सौंदर्यलेणी ! शब्दांची शिस्त, व्याकरणाचे नियम,वृत्त, अलंकार अशा साहित्यिक सोपस्कारामध्ये न पडता, एका वेगळ्याच वळणाने विषय मांडण्याची ही एक शब्दधमाल !
सोपे सरळ असे कांही लिहिता लिहिता, पाडगांवकर हळूच एखादा खट्याळ, मिश्किल धक्का देऊन जातात. ही कविता मी
त्यांची ही वैशिष्ठ्ये लक्षात घेऊन, त्यांचीच वाटावी अशा पद्धतीने रचण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी कवितांमध्ये हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा.
रेन म्हणजे रेन म्हणजे रेन असतो,
कुठेही पडला तरी तो सेम असतो ।।
पाऊस म्हटलं तरी तो पडणारच,
आणि बरसात म्हटलं तरीही तो पडणारच।
कारण ‘ पडणं ‘ हा त्याचा नेम असतो,
कुठेही पडला तरी तो सेम असतो ।। १ ।।
” येरे येरे पावसा ” म्हटलं तरी तो येतो,
” कम कम रेन ” म्हटलं तरीही तो येतो ।
कारण, तेव्हां रेन हा आपला गेम असतो,
कुठेही पडला तरी तो सेम असतो ।। २ ।।
छत्रीत बिलगलात म्हणून बाहेर, तो पडत असतोच असे नाही।
छत्री विसरलात म्हणून तो पडायचा थांबतो असेही नाही।
कारण, काहीही झालं तरी तो रेन असतो,
कुठेही पडला तरी तो सेम असतो।। ३ ।।
रेन म्हणजे रेन म्हणजे रेन असतो,
कुठेही पडला तरी तो सेम असतो ।।
***रचना — *मकरंद करंदीकर*
( पुनःप्रेषित)
( पूर्वप्रसिद्धी – किस्त्रीम २०१६ )
* *मकरंद करंदीकर*.
*makarandsk@gmail.com*




