*लय भारी…*

0
304

*केट्याची यारी..लय भारी..पुढच्या पिढीतही दोस्ती तुटायची नाय!*
नमस्कार,
केट्या (स्व.शिवप्रकाश कथले) आणि संज्या (संजय स्वामी )या दोन् जीवलगा मित्रांच्या कुटुंबांवर आनंदाचा शिडकावा करणारी घटना घडली आणि माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या…१९८०-८१ ची घटना.. कोल्हापुरात मी एम.बी.ए.तर शिवराम सोनवणे (गुरु) मानसशास्त्रात एम.ए.करीत होता.त्याच काळात कराड मध्ये आमचा दोस्त शिवप्रकाश कथले ज्याला आम्ही केट्या म्हणायचो,तो इंजिनिअरिंग शिकत होता.एका शनिवार-रविवारी मी व गुरुने केट्याकडे जायचे ठरविले.दोघांच्याही खिश्यात जाण्याच्या तिकिटा एवढेच पैसै होते.तरीही येताना तिकिटांला केट्याकडून पैसे घेवू,असे ठरवून आम्ही शनिवारी कराड गाठले. आम्ही भेटायला आल्याने केट्या जाम खूश झाला.त्याच्या मेसमध्ये जेवन न घालता आम्हाला भारी हाँटेलमध्ये घेऊन गेला.आमच्यावर खूप खर्च केला. त्यादिवशी आम्ही त्याच्या होस्टेलवर मुक्काम केला.दुसरा दिवस रविवार असल्याने मेसच्या फीस्टचा म्हणजे एक वेळच गोडधोड जेवणाचा तो दिवस होता.त्यामुळे आम्ही सकाळी त्याच्या मेसलाच जेवलो.त्यानंतर त्याने हौसेने अख्खे कराड पायी फिरविले. अखेर थकल्याने संध्याकाळी चहा प्यावा वाटला.म्हणून केट्याला सांगितले.त्यावर केट्या म्हणाला,”चहासाठी तुझ्याजवळचे पैसे दे!”.मी हो,म्हणालो.चहा पिला माझ्या व गुरुच्या दोघांच्या खिश्यातून एकूण बारा रुपये मिळाले.चहाचे भागले! पण केट्याने आमच्यावर बॉम्बच टाकला.. त्याच्याजवळचे सगळे पैसे कालच आमच्यावर खर्च केले होते.त्याच्या जवळ दमडाही उरला नव्हता.एकूण काय तर तिघांचेही खिसे रिकामेच! हे सत्य तिघांनाही समजले आणि रात्रीच्या जेवणाचे व कोल्हापूरला जायच्या एसटी तिकिटाचा प्रश्न जास्तच त्रास देवू लागला.तो प्रश्न मानगुटीवर घेऊन पायीच होस्टेलवर पोहोचलो.खिश्यात पैसा नसला की भूकही कडकडून लागते.तस्संच झालं.कडकडून लागलेल्या भूकेला पाण्याने शांत करण्याचा प्रयत्न करत गप्पांचा फड आम्ही रात्रभर रंगविला..केट्याने सकाळी होस्टेलवरच्या काही विद्यार्थ्यांकडून २-५रुपये गोळा केले.मिसळ पाव खा्वू घातला.त्याच पैशातून आमच्या तिकिटाची सोय लावली आणि मला व गुरुला कोल्हापूरला रवाना केले.त्या रात्रीच्या उपासमारीने केट्याच्या आणि आमच्या दोस्तीचा पाया अधिकच भक्कम केला.त्याच पायावर पुढे बार्शीत जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचीश “पद्मावती गॅंग” तयार झाली‌.स्वर्गीय अशोक घोडके, स्वर्गीय अनिल झाडबुके, स्वर्गीय विजय शेटे, स्वर्गीय उदय धर्माधिकारी, स्वर्गीय शिवप्रकाशकथले(केट्या),कुमार कंकाळ, डॉ.प्रसाद कुलकर्णी, सुर्यकांतदादा वायकर,सुभाष डाळे, संजय स्वामी,विजय हावळे, अतुल लाड अशी ही सुरुवाती पासूनची गॅंग!
शिक्षण संपवून आम्ही पोटापाण्याला लागलो.केट्या एक्साईज इन्स्पेक्टर झाला.संज्या सोलापूर जिल्हा परिषदेत केमिस्टपदावर नोकरीला लागला.काही काळानंतर केट्याचा अनुजा वहिनीशी विवाह झाला.पुढे मनाली व अदिती या दोन मुली झाल्या.त्याचे सोलापूरला पोस्टिंग होते.त्याचा संसार सुखा समाधानाने चालला होता आणि एके दिवशी काळाने त्याच्यावर झडप घातली. अपघाताने शिवप्रकाशचा जीव घेतला. अनुजा वहिनी , कथले परिवार आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला.काळाने अपार दुःखं लादली तरी मैत्रीच्या अतूट बंधनात एकमेकांना बांधली गेलेली “पद्मावती गॅंग” ची कुटुंबं मात्र सुख-दु;खात सदैव एकोप्याने राहिली.त्याच एकोप्याची आठवण परवा स्वर्गीय केट्याची मुलगी
अदिती आणि संज्याचा थोरला मुलगा प्रसाद यांच्या साखरपुड्याने दिली.लहानपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या.संज्या..संजय स्वामी याची पत्नी व आमच्या प्रेमा वहिनी यांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.स्व.प्रेमा वहिनी आणि स्व.शिवप्रकाश याच्या पत्नी अनुजा वहिनी या जीवाभावाच्या मैत्रिणी!
या साखरपुड्याने स्व.शिवप्रकाश कथले व संजय स्वामी आणि पद्मावती गॅंगच्या पुढील पिढीच्या दोस्तान्याला नवे आयाम दिले आणि सर्वांच्याच मनात सूर उमटला.. ही दोस्ती तुटायची नाय..जय हो स्व.शिवप्रकाश कथले..जय हो स्व.प्रेमावहिनी संजय स्वामी!! स्वामी आणि कथले परिवाराला या नव्या नात्याने नवी उभारी दिली.शेवटी दोस्त आणि दोस्तान्याला काय हव़े असते?..जय हो पद्मावती गॅंग!!

*-राजा माने.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here