रोटरी क्लब ऑफ लातूर हॉरीझॉनच्या वतीने
लातुरात कापडी पिशव्यांचे वाटप
लातूर : पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत रोटरी क्लब ऑफ लातूर हॉरीझॉनच्या वतीने लातुरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ लातूर हॉरीझॉनचे अध्यक्ष रो. विश्वनाथ स्वामी सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्त लातूरच्या अनुषंगाने हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जात आहे. यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ लातूर हॉरीझॉनचे अध्यक्ष रो. विश्वनाथ स्वामी सावळे म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक जागरूक नागरिकांची आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा किती मोठा ह्रास होतो हे आता लोकांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही लोक दैनंदिन खरेदीसाठी प्लास्टिकच्याच पिशव्यांचा वापर करताना दिसतात. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याने लोकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे प्रबोधन व्हावे यासाठी आपण व आपले सहकारी सातत्याने प्रयत्नशील असून वेगवेगळ्या शाळा – महाविद्यालय, भाजी विक्रीच्या ठिकाणी जाऊन पर्यावरणाचे महत्व विशद केले जात आहे. हा उपक्रम केवळ लातूर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. हा उपक्रम हाती घेतल्यापासून अनेकांच्या हाती आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या दिसत आहेत. हे एक प्रकारे या अभियानाचे यशच असल्याची भावना व्यक्त करून ज्येष्ठांसह नागरिकांनी स्वतःही प्लॅस्टिकच्या वापरापासून दूर रहावे व समाजातील विविध घटकातील लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन विश्वनाथ सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.