लातूर/प्रतिनिधी:
गेल्या कांही दिवसात शहरात नळाद्वारे पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून तांत्रिक दुरुस्त्या करण्यात आल्या असून गुरुवार दि.२८ एप्रिल पासून शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, लातूर शहराला धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. धरण पूर्णपणे भरून राहिल्यानंतर उन्हाळ्याच्या कालावधीत पहिल्यांदा कालव्यातून पाणी सोडल्यानंतर प्रकल्पात मागील बाजूस असणारे पाणी पुढे येते. या पाण्याचा रंग काहीसा पिवळसर असतो. हेच पाणी शहरात येत होते. पालिकेने या पाण्याची तपासणी करून घेतलेली होती. पिवळसर दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याची खात्रीही करून घेतली होती. तसेच यापूर्वी पाण्याचा रंग नाहिसा होवून तीन दिवस योग्य पद्धतीने पाणी देण्यात आले परंतु पुन्हा हा प्रकार समोर आला. महापौर म्हणाले की, पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची तपासणी करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्याच्या तांत्रिक चुकीमुळे जलशुद्धीकरण केल्यानंतर वेगळे करण्यात आलेले पाणी पुन्हा शुद्ध पाण्यात मिसळले जात होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकणार आहे. शहरातील नागरिकांना अधिक काळ पाणी पुरवठा करता यावा यासाठी दुष्काळ काळात महानगरपालिकेचा पाणी उपसा पंप अधिक खोलीवर बसविण्यात आलेला आहे. अधिक खोलीवर शेवाळ सदृश्य वनस्पती व जीवाणूंची संख्या जास्त असू शकते. त्यामुळेही या पाण्याचा रंग पिवळसर झालेला असू शकतो. हे पाणी अशुद्ध नव्हते. लातूर प्रमाणेच कळंब शहरालाही अशीच समस्या येत होती. आता लातूरकरांची समस्या दूर झाली आहे.मागील दोन दिवसांपासून स्वतः महापौर या सर्व सुधारणांवर व्यक्तिशः लक्ष देवून होते. गुरूवारी शहराच्या ज्या भागात प्रथम पाणी पुरवठा होईल तेथे सुरुवातीची काही मिनिटे जलवाहिनीत असणारे पिवळसर पाणी येऊ शकते.नंतर मात्र शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल ,असे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्याच्या तांत्रिक चुकीमुळे शहरवासियांना पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाला असला तरीही याबद्दल त्यांनी लातूरकरांची दिलगिरीही व्यक्त केली.