लातूरच्या “फुनसुख वांगडू” ची अफलातून कामगिरी.
लातूरची टेक्नॉलॉजी जपान मध्ये पोहचली.
थ्री इडियट्स या चित्रपटाची पटकथा आपण सर्वांना माहिती आहे. यातील अमीर खान यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रेंचो उर्फ “फुनसुख वांगडू” हा पुस्तकातील अभ्यासक्रमापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकत निरनिराळे शोध विकसित करताना दिसून येतो. श्री.सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित ही व्यक्तिरेखा आहे.

तशीच एक व्यक्ती म्हणजे श्री.चैतन्यजी चापसी लातूर येथे एमआयडीसी भागात वुड टूल्स या नावाने 1988 साली त्यांच्या परिवाराने उद्योगाची सुरुवात केली. वुड टूल्सच्या माध्यमातून विविध प्रकारच्या इंडस्ट्रीसाठी लागणारे कटिंग टूल्स ते बनवतात. स्वतः कॉलेज ड्रॉप आऊट असणारे श्री.चैतन्यजी चापसी यांनी प्रत्यक्ष अनुभवातून विकसित केलेले तंत्रज्ञान वापरणारे ते देशातील एकमेव व जगातील केवळ ८ उद्योजकांपैकी एक आहेत. नुकतेच त्यांनी जपान देशासोबत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार केला आहे. त्या निमित्ताने लातूर आणि जपानचा संबंध निर्माण झाला आहे. स्टील सोबत स्टील जोडणे, त्यासोबत सर्वात कठीण धातू असणाऱ्या कार्बाईड चा वापर करत अतिशय धारदार व एक हजार किलो एवढ्या वजनाच्या वस्तूंना सुद्धा सहजरित्या कापले जाईल, असे कटिंग टूल्स तयार केले आहेत. सध्या त्याच्यासाठी लागणारा कच्चामाल हा जर्मनी येथून ते आयात करतात आणि त्यांचे कटिंग टूल्स देशातील नामांकित कंपन्यांसह जगभर निर्यात होतात.

शहरातील व परिसरातील सुमारे 60 कामगारांना त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला असून त्यापैकी कोणीही स्किल्ड लेबर नसून त्यांच्याच फॅक्टरिमध्ये अनुभवातून तयार झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री श्री.अमितजी देशमुख यांच्या समवेत त्यांच्या फॅक्टरीला भेट देण्याचा योग आला आणि त्यांचे कार्य जाणून घेतल्यानंतर अचंबित झालो. आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या प्रवासा बद्दल जाणून घेतले. श्री.चैतन्यजी चापसी हे बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल या अनेक देशांमध्ये काम करणाऱ्या संस्थेशीही जोडले गेले आहेत. या माध्यमातून संस्थेच्या उद्योजक सभासदांना विना कमिशन व्यापाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. दर महिन्याला हजारो कोटीचा व्यापार व्यवसायिकांना मिळत असतो. अशा या अवलिया व्यक्तिमत्वाची भेट अतिशय ऊर्जा देणारी होती. उद्योग, व्यापारात नवीन काहीतरी करु इच्छिणाऱ्या तरुणांकरिता ते प्रेरणास्रोत आहेत. इच्छाशक्तीच्या जोरावर जगाला गवसणी घालण्याची क्षमता ठेवणाऱ्या या लातूरच्या फुनसुख वांगडूला मानाचा मुजरा.




