28.6 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा*

*लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा*

राज्यातील 28 जिल्ह्यात जावून राज्य महिला आयोगाने

महिलांच्या सुमारे अठरा हजार तक्रारींचा निपटारा केला

–  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

लातूर, दि. 28 (वृत्तसेवा ): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने सर्वच महिलांना आपले प्रश्न आयोगाकडे मांडता येत नाहीत. त्यामुळे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात महिला आयोग पोहचला आहे. या माध्यमातून जवळपास 18 हजार प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून दिला गेला. महिलांच्या न्यायासाठी शासनानी केलेले कायदे महिलांपर्यंत जावेत. महिलांनी ते प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हेही या उपक्रमातून आम्ही सांगत आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जनसुनावणीप्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या. या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 93 तक्रारी दाखल झाल्या. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेवून त्याचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी, महिला आयोगाचे समन्वयक श्री. गंगापुरे आदी यावेळी उपस्थित होते.

  महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून त्या स्वतःच्या पायावर स्वालंबी झाल्या तर समाज म्हणून आपणही प्रगती करू, असे श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या. समाजात आजही बालविवाह, स्त्री-भ्रूणहत्या होत आहेत हे गंभीर असून याबाबतीत सर्वसामान्यांनी आमच्यापर्यंत तक्रारी द्याव्यात. लातूर जिल्हा प्रशासनाने याबाबतीत ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या यंत्रणांना असे विवाह रोखण्यासाठी आदेश काढावेत. एवढेच नाही तर बालविवाह जिथे होतील, अशा मंगल कार्यालय, अशा लग्नाची पत्रिका छापणारे प्रिंटर्स यांच्यावरही कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिथे महिलांच्या विकासाला चालना दिली जाते, तेच कुटुंब सर्व अर्थांनी प्रगती करतात. महिलांनी मागच्या दोन दशकात त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आहे. महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेण्याचा हा उपक्रम घेतला आहे तो खूप कौतुकास्पद असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

 लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनीही यावेळी महिला आयोग महिलांसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत असल्याचे सांगून लातूर जिल्ह्यामध्ये ‘माझी मुलगी- माझा सन्मान’ योजना राबविणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

जनसुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा

जनसुनावणीमध्ये एकूण 93 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तीन पॅनलच्या माध्यमातून एकाच वेळी या सर्व तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न केला. यात विविध तक्रारी आल्या त्यात महानगरपालिका हद्दीत बस स्टॉप असूनही सिटी बस थांबत नाहीत, कोर्टाचे आदेश येऊनही पोटगी मिळत नाही, बेपत्ता मुलींच्या तक्रारी, सात – बारावरचे नाव फसवणूक करून घरच्यांनीच हटवले, अशा विविध प्रकारच्या तक्रारी समोर आल्या. जिल्हाधिकारी, पोलीस, विधी व सेवा प्राधिकरण अशा संबंधित यंत्रणांकडे त्या सोपवून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

  यानंतर विविध विभागांमार्फत महिलांसाठीच्या योजनांची अंमलबाजवणी, हिरकणी कक्ष, प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी विशाखा समिती स्थापन करणे या संदर्भातील सादरीकरण झाले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]