पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
काँग्रेसच्या शाही परिवाराने देशाला गरीबी दिली
पाणीप्रश्नास प्राधान्य देत मोठे शैक्षणिक केंद्र उभारण्याची ग्वाही
रखरखत्या उन्हात लाखोंचा जनसागर उसळला
लातूर/प्रतिनिधी ः लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत रेल्वे बनणार आहेत. यासाठी लातूरमध्ये अनेक लहान -मोठे उद्योग सुरू होणार आहेत. लातूर हा आत्मनिर्भर भारताचा एक भाग बनणार असून भविष्यात लातूरला विकसित भारताचं केंद्र बनविण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न झालेलेच आहेत. आघाडी सरकारने त्या योजना गुंडाळून ठेवल्या होत्या. परंतु आता नव्याने योजनांना गती देवून लवकरात लवकर लातूरसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. शैक्षणिक हब असणार्या लातूर येथे मोठे शैक्षणिक केंद्र उभारण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनतेला दिला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, कवाडे गट, मनसे, रासप, महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी लातूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जनआशीर्वाद सभा संपन्न झाली. या सभेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. अजित गोपछडे, उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, राज्याचे मंत्री ना. संजय बनसोडे, लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, लोकसभा प्रभारी प्रा. किरण पाटील, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे यांच्यासह प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, लातूर विधानसभा प्रभारी गुरुनाथ मगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, शहर जिल्हाध्यक्षा रागिनी यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, संजय दोरवे, शैलेश लाहोटी, अयोध्या केंद्रे, अॅड. जयश्री पाटील आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सुरूवात केली. शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणार्या लातुरकरांना माझा नमस्कार असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडताच उपस्थित जनसमुदायाने मोदी- मोदी नावाचा गजर सुरू केला. पंतप्रधान म्हणाले की, मागील दहा वर्षात देशात विविध विकास योजना राबवितानाच लातूरसाठी रेल्वे कोच कारखाना सुरू केला. या कारखान्यात वंदे भारत रेल्वे तयार होणार आहेत. विशेष म्हणजे लातूरात तयार झालेले कोच विदेशातही जाणार आहेत. या अनुषंगाने लातूर येथे अनेक उद्योग सुरू होणार आहेत. देशाला आत्मनिर्भर बनविताना लातूर हा त्यातील मुख्य भाग असणार आहे. त्यात लातुरच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यातूनच विकसित भारताचे केंद्र म्हणून लातूर उदयास येणार असल्याचे सांगतानाच भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या पक्षाने कधीही जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट समस्यांचे भांडवल करत त्या माध्यमातून मतदान मिळविण्यासाठी काँग्रेस कार्यरत राहिली. काँग्रेसच्या शाही परिवाराने आपल्या वारसांसाठी पैसा, जमिनी व संपत्तीची लयलूट केली. या पक्षाने देशाला काय दिले ? असा प्रश्न उपस्थित करून शाही परिवाराने देशाला फक्त गरिबी दिली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

या निवडणुकीत विरोधकांनी आघाडी केली आहे. परंतु त्यांच्याकडे नेता नाही. त्यामुळे पंतप्रधानपद एक-एक वर्षासाठी वाटून घेण्याचा निर्णय आघाडीतील नेत्यांनी घेतला आहे. विरोधी आघाडीने आलटून पालटून देशाला लुटण्याची योजना तयार केली असल्याचे मोदी म्हणाले. अशा सरकारला संधी देणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक केवळ खासदार निवडण्यासाठी नाही तर देशाला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे. दहा वर्षांपूर्वी दररोज नव-नवे घोटाळे उघडकीस येत होते. आज दररोज विविध विकास योजनांची चर्चा होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढला असून आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिम्मत नाही. भारत आज घरात घुसून मारतो हे जगाने पाहिले आहे. जगात भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी आपण सर्वांनी आम्हाला निवडून दिले. त्यामुळेच विकासाची ही गती दिसून येत आहे. देशाला लुटणारे आज जेलमध्ये आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी यांनी सांगितले की, देशातील तरुणांकडे प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे स्वप्नंही आहेत परंतु, काँग्रेसने तरुणांची स्वप्ने उध्द्वस्त करत एकाच परिवाराचा विचार केला. आम्ही देशाला आमचा परिवार मानतो. या अनुषंगाने आम्ही काम करीत आहोत. देशातील नागरिकांमध्ये आज निर्माण झालेला आत्मविश्वासच विकसित भारताकडे घेवून जाणार आहे. काँग्रेसने आरक्षण हटविण्यासाठी काम केले. परंतु, संविधानात बदल करणे कोणालाही शक्य होणार नाही. काँग्रेसने अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गातील नेतृत्व मोठे होऊ दिले नाही. आमच्या सरकारमध्ये 60 टक्क्याहून अधिक मंत्री या प्रवर्गातील आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मागील दहा वर्षात सरकार विकासासाठी कटिबध्द आहे. जनतेला मोफत अन्नधान्य, आरोग्य सुविधा व हक्काचे घर ही मोदींची गॅरंटी आहे. आपण दोन वेळा आमच्या सरकारला जनादेश दिला. त्याचा वापर आम्ही जनहितासाठीच केला. महिला आरक्षण आमच्याच सरकारने दिले. सामाजिक न्यायाला ताकद देणारे सरकार आम्ही चालवले. काँग्रेस व समस्या ही जुळी भावंडे असल्याचेही मोदी म्हणाले.
लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजना लागू केली होती. परंतु नंतर आलेल्या आघाडी सरकारने ही योजना गुंडाळली. आता शिंदे सरकारने वॉटर ग्रीडसह जलयुक्त शिवार योजना पुन्हा लागू केली आहे. या माध्यमातून लातूरचा पाणीप्रश्न सोडवू असे मोदी म्हणाले. देशातील जनतेला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक स्वप्न नागरिकांनी पाहिली आहेत. जनतेची स्वप्न पूर्ण करणे हाच मोदींचा संकल्प असल्याचेही मोदी यांनी शेवटी सांगितले.

तत्पूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न तयार केला होता. परंतु, भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने विकासाचा नवा पॅटर्न सेट केला आहे. महायुतीकडे शिक्षणावर चर्चा होते तर आघाडी मतांचे राजकारण करते. युतीकडे महामार्गांचे जाळे आहे तर आघाडीकडे रस्त्यांवर फिरूनही लाँच न होणारा युवराज असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी देशातील गरिबी हटवली. दुष्काळ मुक्तीसाठी योजना राबविल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांकडे नेता, नीती व नियतही नाही. ते देश चालवू शकत नाहीत. त्यांची गाडी विना डब्यांची आहे. सध्या निवडणूकांची आचार संहिता आहे. निवडणुका संपताच शेतकर्यांना सोयाबीन भावांतराचे पैसे देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आ. संभाजी पाटील यांनी केलेल्या मागणीस प्रतिसाद देताना मोदी यांनी तिसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय विद्यापीठाची मागणी घेवून आपण त्यांच्याकडे जावू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

लोकसभा संयोजक आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसकडून विषारी राजकारण केले जात असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या कर्तृत्वामुळे लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले. मात्र मोदी सरकारने रेल्वे तयार करण्याचा कारखानाच लातूरला दिला. लातुरकर पाण्यासाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे लातूरसाठी केंद्र सरकारने स्थायी पाणी योजना द्यावी. शैक्षणिक क्षेत्रातील लातूरचा इतिहास पाहता लातूरला केंद्रीय विद्यापीठ व आयआयटी सारख्या संस्था द्याव्यात अशी मागणीही आ. निलंगेकर यांनी केली.
प्रारंभी प्रा. जोगेंद्र कवाडे, खा. अजित गोपछडे, ना. संजय बनसोडे, उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, गणेश हाके, संजय दोरवे यांनीही मनोगत व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचलन शैलेश गोजमगुंडे व प्रेरणा होनराव यांनी केले.

रेकॉर्डब्रेक गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येने नागरिक लातूर येथे आले होते. उपस्थितांच्या गर्दीने मंडपातील जागाही अपुरी पडली. उपस्थितांना उन्हाचा त्रास होवू नये याची काळजी संयोजकांच्या वतीने घेण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. मंडपात जागा नसल्याने अनेकांना बाहेर उभे राहूनच आयोजकांनी लावलेल्या पडद्यांवर मोदींचे भाषण ऐकावे लागले. गत काही दिवसांपासून वातावरणात बदल होवून प्रचंड उष्णता निर्माण झालेली आहे. मंगळवारीही रखरखते ऊन असताना मोदींचे विचार ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळलेला पाहण्यास मिळाला.

मोदी की सोच…
आपल्या भाषणात मोदी यांनी 2036 मध्ये आपल्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा भरवणे हे माझे स्वप्न असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी म्हणजेच 2029 ला युवा ऑलिंम्पिक स्पर्धा पार पाडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असल्याचे स्पष्ट केले. मी कधीही छोटा विचार करीत नाही. देवाने मला घडविताना अशी कुठलीतरी चिप बसवली असल्याने मी छोटा विचार करूच शकत नाही. नेहमीच मोठा विचार करतो, असेही मोदी म्हणाले.
युवकांचा उत्साह
सभेसाठी जिल्हाभरातून आलेले युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच सभास्थळाकडे युवकांचे लोंढे जात होते. मोदी यांनी युवकांशी विशेष संवाद साधताच उपस्थित युवकांनी मोदी नावाचा गजर करत सभागृह दणानून सोडले. पहिल्यांदाच मतदान करणार्या युवकांची संख्या यात लक्षणीय होती. यावरून युवकांमध्ये मोदी नावाचे गारूड किती लोकप्रिय आहे याचा साक्षात्कार झाला.
देशमुखांना डोळ्याच्या डॉक्टरांची गरज ः आ. निलंगेकर
लातूर मतदारसंघात रेल्वे कोच कारखाना आला. नव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या. महामार्गांचे जाळे तयार झाले. विविध विकास योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला, असे असले तरी आ. अमित देशमुख लातूरात दहा वर्षात काय विकास झाला ? असा सवाल उपस्थित करीत आहेत. मागील दहा वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे व त्यापूर्वी 65 वर्षात काँग्रेसने केलेली कामे या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे खुली चर्चा करण्यासाठी सामोरे या असे आव्हानच आ. संभाजी पाटील यांनी आ. अमित देशमुख यांना दिले. देशमुखांना विकास कामे कदाचित दिसत नसतील त्यामुळे त्यांना डोेळ्याच्या डॉक्टरांची खरी गरज असल्याचा टोलाही आ. निलंगेकर यांनी लगावला.