मराठा आरक्षण रॅलीची जय्यत तयारी आंतरवाली सराटीत शिष्टमंडळाकडून आढावा
लातूर (प्रतिनिधी)-मंगळवार ९ जुलै रोजी लातूर येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची जय्यत तयारी झाली असून त्याचा आढावा अंतरवाली सराटी येथून आलेल्या एका शिष्टमंडळाने लातूर येथे सोमवारी (दि.१) रात्री घेतला. प्रदीप सोळुंके, विक्रम देशमुख, बद्रीनाथ तारक व माऊली उबाटे यांचा या शिष्टमडळात समावेश होता
या बैठकीला लातूर शहासह तालुक्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी या संभाव्य रॅलीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती शिष्टमंडळास विस्ताराने दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर काढण्यात येणारी ही रॅली लक्षवेधी करण्याचा व त्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार समाज बांधवांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध माध्यमे, प्रत्यक्ष भेटी, बैठका या माध्यमातून रॅलीसाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

हजारोंच्या संख्येत वाहने लातूरला येणार असून यासाठी वाहन तळाची सोय करण्यात आली आहे. रॅलीसाठी समाज बांधव सढळ हाताने मदत करीत आहेत. नागरिक, महिला,मुली, विद्यार्थी विद्यार्थिनी, राजकीय तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाजबांधव व भगिणींचा अखंड मराठा या भूमिकेतून या रॅलीत सहभाग असेल. 9 जुलै रोजी सकाळी बारा वाजता लातूर येथील छत्रपती शाहू महाराज चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास जरांगे पाटील व समाजबांधवांच्या अभिवादनानंतर रॅली मार्गस्थ होईल. शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रॅलीचा मार्ग असेल. रॅली मार्गावर असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह विवेकानंद चौकातील स्वामी विवेकानंदांच्या, म.बसेवश्वर चौकातील महात्मा बसवेश्वरांच्या व अहिल्या देवी चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास जरांगे व समाजबांधव अभिवादन करतील. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांना संबोधित करतील व त्यानंतर रॅलीचा समारोप होईल असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान अन्य समाजबांधवही जरांगे यांचे रॅलीदरम्यान स्वागत करणार आहेत.

रॅली मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. भगवे ध्वज लावण्यात येणार आहेत. ड्रेस कोडमध्ये सुमारे दोन हजार स्वंयसेवक कार्यरत असतील त्यात ४०० महिला स्वंयसेवकांचा समावेश असेल. रॅली मार्गावर पाणी, फळे, अल्पोपहाराची सोय असेल. शिवाय डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिकाही उपलब्ध असतील.