▪ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे याही प्रगणकाबरोबर मुरुड-अकोल्यात सहभागी
▪ दहा तालुके,एक महानगरपालिका, चार नगरपालिका, पाच नगरपंचायती क्षेत्रात सर्व्हेक्षण
लातूर, दि. 23 (प्रतिनिधी) : मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण लातूर जिल्ह्यात आज पासून सुरु झाले असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी मुरुड – अकोला या गावात जाऊन प्रगणकांबरोबर जाऊन सर्व्हेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे-विरोळे उपस्थित होत्या.

मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील 10 तालुक्यात, एक महानगरपालिका, चार नगरपालिका, पाच नगरपंचायती क्षेत्रात हे सर्व्हेक्षण सुरु आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे प्रत्यक्ष फिल्डवर नजर ठेवून आहेत. जिल्हाधिकारी यांना वेळच्या वेळी अपडेट दिले जात आहे. नागरिक सर्व्हेक्षणासाठी सहकार्य करत आहेत. असेच सहकार्य हा सर्व्हे होई पर्यंत नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले आहे.

याबरोबर जिथे कुणबी नोंदी सापडल्या आहेत तिथे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.लातूर तालुक्यात आता पर्यंत 157 प्रमाणपत्र देण्यात आले असून पुढची कार्यवाही सुरु आहे.तर रेणापूर येथे 16 गावात 496 नोंदी सापडल्या आहेत. त्याअनुषंगाने 1000 अर्ज वाटप केले असून आता पर्यंत 103 जणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, पुढील कार्यवाही सुरु आहे. औसा तालुक्यात तीन गावात 14 नोंदी सापडल्या असून त्या गावात 100 फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. 04 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित कार्यवाही सुरु आहे. जळकोट तालुक्यातील विराळ यागावी 9 नोंदी आढळून आल्या असून तिथे 55 अर्ज वाटप करण्यात आले असून 10 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. निलंगा तालुक्यातील 7 नोंदी आढळून आल्या असून तिथे 21 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.

प्रत्येक तालुक्यातील गावात गावसभा घेतल्या, गावात चावडीवर नोंदी प्रसिद्ध केल्या,गावात दवंडी दिली तसेच तहसिल कार्यालयात मदत कक्ष व अभिलेख कक्ष सुट्टी दिवशी सुद्धा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील पाचही उपविभागीय अधिकारी यांनी दिली.