27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराष्ट्रीय*लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे...

*लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे*

ऑगस्टपर्यंत कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न
• स्थानिकांना रोजगार, लातूरच्या विकासाला गती मिळणार

लातूर, दि. 23 (जिमाका): येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपर्यंत हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून याठिकाणी 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती केली जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार गोविंद केंद्रे, मध्य रेल्वेचे आर. के. मंगला, शिशिर दत्ता यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाने लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना उभारण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा उघडल्यानंतर भारतीय रेल्वेची आरव्हीएनएल कंपनी आणि रशियातील एका कंपनीसोबत कराराची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष बोगी निर्मितीला येत्या ऑगस्टपर्यंत सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन 400 वंदे भारत रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली असून यापैकी 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होईल. आवश्यकता भासल्यास आणखी 80 रेल्वे निर्मितीचे कामही लातूर येथील कारखान्यात केले जाईल, असे श्री. दानवे यावेळी म्हणाले.

लातूर येथील रेल्वे बोगी कारखाना सुरु झाल्यानंतर लातूरसह मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना याठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या परिसरात छोटे-छोटे व्यावसायिक तयार होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही श्री. दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, नवीन रेल्वे मार्ग आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, अहमदनगर-बीड-परळीवैजनाथ रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरु असून येत्या मार्चअखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे पोहचणार आहे. मनमाड-नांदेड महामार्गाच्या दुहेरीकारणाच्या पहिला टप्प्याला लवकरच मंजुरी मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या सोलापूर-तुळजापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे, असे श्री. दानवे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात रेल्वेचे आणखी प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नशी असल्याचे ते म्हणाले.

स्वावलंबी भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून रेल्वे बोगी निर्मितीत भारत स्वावलंबी बनण्यासाठी लातूर येथील रेल्वे बोगी कारखाना महत्वाची भूमिका बजाविणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंदे भारत रेल्वेची निर्मिती याठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यावेळी म्हणाले.

मराठवाड्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ भूमिपूजन करून न थांबता या प्रकल्पाची उभारणी गतीने होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्यात सर्वाधिक कुशल मनुष्यबळ मराठवाड्यात असून या रेल्वे बोगी निर्मिती कारखान्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सांगून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा प्रकल्प लातूरला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले.

मध्ये रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी शिशिर दत्ता यांनी यावेळी मराठवाडा रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याबाबत माहिती दिली. 350 एकरावर उभारण्यात आलेल्या या कारखान्यात रेल्वे बोगी निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा उभारताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले.

कारखान्याची पाहणी, सद्यस्थितीचा आढावा

केद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वप्रथम भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. रेल्वेचे अधिकारी राजकुमार मंगला, अभय मिश्रा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी प्रकल्पाबाबत पीपीटी व व्हिडीओद्वारे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी मराठवाडा बोगी निर्मिती कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टोअर वार्ड, शेल शॉप, फिनिशिंग शॉप, पेंट शॉप आणि बोगी शॉप आदी विभागांना भेटी देवून माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]