लातूर येथे 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन
▪️ सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश
▪️राज्यातील नामांकित कलाकारांचे सादरीकरण
▪️सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजन
लातूर , 07 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लोकसंगीत महोत्सव 9 ते 11 ऑगस्ट, 2025 या कालावधीत लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात राज्यातील विविध गायक कलाकार व कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी रामानंद उगले, श्रावणी महाजन, विनल देशमुख, कुणाल वराळे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करणार आहेत, तर रविवार, 10 ऑगस्ट, 2025 रोजी चैतन्य कुलकर्णी, आसावरी बोधनकर, प्रतीक सोळसे, अनुष्का शिकतोडे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करतील. या महोत्सवाचा समारोप सोमवार, 11 ऑगस्ट, 2025 रोजी होणार असून अपेक्षा घारे, राधा खुडे, अभिजित कोसंबी, गौरव पवार यांच्यासह सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत.हा लोकसंगीत महोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.***




