सुख आणि दुःखात भगवंतांच्या नामस्मरणात रहावे
ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर यांचे विचार
ज्येष्ठ कवयित्री, लेखिका,तत्वदर्शी प्रज्ञावंत वै.सौ.उर्मिला वि. कराड यांचे प्रथम पुण्यस्मरणावर रामेश्वर (रुई) येथे हजारो नागरिक उपस्थित
लातूर दि. ९ जुलै: जीवनात सुख आणि दुःखात भगवंतांच्या नामस्मरणात राहण्याचा मंत्र जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी दिला. कलयुगतील आयुष्य मौल्यवान आहे. त्यामुळे आपण कसे जगतो हे महत्त्वाचे आहे. या पृथ्वीतलावरून गेल्यानंतर ज्या व्यक्तीची समाजात चर्चा राहते ती व्यक्ती वैकुंठाला जाते. असे भावपूर्ण विचार ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे प्रमुख व थोर शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या सहचारिणी व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड यांच्या मातोश्री ज्येष्ठ कवयित्री, लेखिका,तत्वदर्शी प्रज्ञावंत वै.सौ.उर्मिला वि. कराड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तत्पूर्वी माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड यांनी धार्मिक वैदिक विधिवत पूजा केली. या वेळी ह. भ. प. तुळशीराम दा. कराड, काशिराम दा. कराड, डॉ. मंगेश तू. कराड, डॉ. अदिती कराड, आमदार रमेशअप्पा कराड, राजेश कराड, सुनील कराड सहीत संपुर्ण कराड परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच समाजातील राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक स्तरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर महाराज म्हणाले, जीवनात ज्यांनी पुण्य संपादन केलं त्यांच्याच जीवनात पुण्यस्मरण घडत. हे भाग्य उर्मिला कराड यांना लाभले. त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्यात्माची साथ सोडली नाही. वारी पूर्ण केल्यानंतरच त्यांनी आपला देह सोडला. हे भाग्याचे लक्षण आहे. मनुष्य जेव्हा जातो तेव्हा तो आपल्या गुणांनी व कीर्तीमानाने मागे राहतो. मृत्यू अटळ असला तरी त्याला गोड करावे असे तुकाराम महाराज सतत सांगत असे. रामायणामध्ये सर्व प्रकारच्या प्रेमाचे नाते सापडतात. त्याचाच बोध घेऊन आपण जीवन व्यतीत करावे. वै.सौ. उर्मिला कराड यांनी एमआयटीच्या नावलौकिकात व उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या उर्मिला यांचा कराड घराणे घडविण्यास मोठा वाटा आहे. दोन पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचे महान कार्य केले आहे. आज त्यांनी दाखविलेल्या अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न नवी पिढी करीत आहे. त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणावर येथे आलेले सर्व भाविक भक्ताचा आम्हाला मोठा आधार आहे. तसेच जगातील सर्वात मोठया डोममधून वैष्णव परंपरा संपुर्ण जगात पोहचन्याची महिती दिली.
या प्रसंगी लक्ष्मण महाराज व महेश महाराज यांनी उर्मिला काकू बद्दल भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पाणेगावकर, लक्ष्मण महाराज, नारायण महाराज, किसन महाराज, तुकाराम महाराज शात्री, महेश महाराज, पंडित उद्धव बापू आपेगाकर, कोकाटे महाराज, भगवान महाराज कराड, बाबा महाराज पाडगावकर, पांचाळ महाराज, गणपत महाराज जगताप, डॉ. पठाण आणि डॉ. हरी नरके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविणारे सुवर्ण पिंपळ नाटकाचे सादरीकरण
तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविणारे सुवर्ण पिंपळ हे नाटक शनिवारी रामेश्वर येथील पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सादर करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी या आध्यात्मिक नाट्यकृतीचे लेखक लक्ष्मण सूर्याभान यांना ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले.
समाजामध्ये संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र पोहोचावे यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये नाटकाचे प्रस्तुतीकरण करण्याचा बिडा उचलला आहे. यापुढील नाटकाचे सादरीकरण बार्शी येथे केले जाणार आहे. तत्पूर्वी हे नाटक आळंदी, पंढरपूर व रामेश्वर रुई येथे दाखविण्यात आले होते.