‘माझी साप्ताहिकी ‘ लेख संग्रहाचे प्रकाशन
लातूर/प्रतिनिधी:ॲड. प्रभाकर येरोळकर लिखित “माझी साप्ताहिकी” या लेख संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
गांधीवादी विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या समारंभास विशेष अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे व पुणे येथील चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर,पद्माकर कुलकर्णी येरोळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. जनार्दन वाघमारे यांनी एका व्हिडिओ क्लिप द्वारे मार्गदर्शन केले. म्हणाले की,”माझी साप्ताहिकी” नव्हे तर माझी साहित्यिकी म्हणावे या दर्जाचे हे लिखाण आहे. येरोळकर हे ज्येष्ठ साहित्यिक होते.त्यांच्या लिखाणाचा दर्जा अतिशय उच्च होता.प्रत्येकाने वाचायलाच हवे असे लिखाण ते करत असत.कथा,कविता, कादंबरी असे साहित्याचे सर्व मार्ग त्यांनी चोखाळले.त्यांची तीन पुस्तके यापूर्वीच प्रकाशित झालेली असून हे चौथे पुस्तक आहे.

स्तंभलेखनाचे हे दुसरे पुस्तक असून विविध विषयांना स्पर्श करणारे अतिशय दर्जेदार असे लिखाण आहे.हे पुस्तक साहित्यात भर घालणारे ठरेल,असे डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले.
चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी पुस्तकाचा दर्जा अतिशय चांगला असल्याचे नमूद करत प्रकाशन होण्यापूर्वीच या पुस्तकाच्या १५० प्रतींची मागणी नोंदली गेलेली असल्याचे सांगितले. राज्यभरातील विविध वृत्तपत्रात येरोळकर यांनी लिखाण केले.त्यांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे.त्यांचे लिखाण
विविध विषयांना स्पर्श करणारे आहे.एकाच पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विषय वाचायला मिळतात.त्यामुळे नव्या पिढीने ही पुस्तके वाचली पाहिजेत.येरोळकर हे लातुरात राहणारे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते,असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सोमनाथ रोडे म्हणाले की,येरोळकर यांचे लिखाण प्रवाही होते.विविध विषयांना ते स्पर्श करत असत.साहित्यातील हा ठेवा नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.मराठवाड्यात त्यांच्यासारखा दुसरा स्तंभलेखक व भाष्यकार नाही.येरोळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची खुप मोठी हानी झालेली आहे. पुस्तक रूपाने त्यांचा विचार जपला जावा.पुढच्या पिढीने तो वाचावा,असेही ते म्हणाले. पत्रकार प्रदीप नणंदकर,राजेंद्र अत्रे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना येरोळकर यांची कन्या प्राची कुलकर्णी वक्राणी यांनी वडिलांच्या विचाराचा वारसा जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे सांगितले. लिखाण त्यांनीच केलेले आहे.हा ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे प्रकाशन फक्त आम्ही करत असल्याचे त्या म्हणाल्या. रोहन येरोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. आस्था वक्राणी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.










