काही माणस वारसा घेऊन जन्माला येतात, पण काही माणसं त्या लाभलेल्या वारशाला आपल्या कष्टाने आणि कर्तृत्वाने एक नवं कोंदण मिळवून देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात लातूर जिल्ह्याला एक वेगळे वलय आहे. हे वलय निर्माण करण्यात आणि नेण्यात लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे.

हा अफाट राजकीय आणि लोकसेवेचा वारसा केवळ नावापुरता न चालवता, आपल्या कर्तृत्वाने आणि शालीनतेने त्याला नवा आयाम देणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख ६ एप्रिल १९८० रोजी बाभळगावच्या मातीत जन्मलेले धीरजआज लातूरच्या ग्रामीण भागातील जनतेचा एक भक्कम आधारवड म्हणून ओळखले जात आहेत.धीरज देशमुख यांचा प्रवास बाभळगावच्या शेतकरी कुटुंबातून सुरू झाला. विलासरावजींच्या तालमीत वाढल्यामुळे राजकारण हे सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम आहे, हे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. बी.कॉम आणि त्यानंतर एम.बी.ए. (MBA) पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांच्याकडे आधुनिक प्रशासकीय दृष्टी आली. मात्र, उच्च शिक्षण घेऊनही त्यांची नाळ कायम जमिनीशी आणि ग्रामीण जनतेशी जोडलेली राहिली.धीरज देशमुख यांचा राजकीय प्रवास अचानक मिळालेल्या पदांचा नसून, त्यांनी संघटनेत पायरी-पायरीने काम केले आहे. सन २००४ पासून पक्षाच्या प्रचारात सक्रिय असलेल्या धीरजयांनी २००९ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून संघटन कौशल्याची चुणूक दाखवली.

लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. २०१७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवून प्रत्यक्ष संसदीय राजकारणाचे धडे गिरवले.सन २०१९ मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येत त्यांनी विलासरावजींच्या कार्याचा वारसा पुढे नेला. यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी त्यांची झालेली निवड, हे त्यांच्यातील ‘सहकार’ क्षेत्रातील जाण आणि प्रशासकीय कौशल्याचे प्रतीक आहे. लातूर जिल्ह्याच्या अर्थकारणाची धुरा असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर धीरज साहेबांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची धुरा चेअरमन धीरज देशमुख अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळत आहेत. त्यांच्या पुढाकारातून बँकेने केवळ आर्थिक उलाढालच वाढवली नाही, तर सहकार क्षेत्रासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.एम. बी. ए.शिक्षणाची जोड लाभलेल्या धीरजसाहेबांनी बँकेच्या कामकाजात व्यावसायिकता आणि पारदर्शकता आणली.

सहकार क्षेत्रातील जुन्या त्रुटी दूर करून, सर्वसामान्यांचा आणि सभासदांचा बँकेवरील विश्वास अधिक दृढ करणारे निर्णय त्यांनी घेतले, जे आज ‘मैलाचा दगड’ ठरत आहेत.शेतकरी हा केवळ कर्जदार नसून तो बँकेचा मालक आहे, ही भावना धीरजसाहेबांनी रुजवली. शेतकऱ्यांना विनासायास आणि अत्यंत सन्मानाने कर्जपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली. बँकेच्या दारात येणाऱ्या प्रत्येक बळीराजाला आदराची वागणूक आणि तत्पर सेवा मिळावी, हा त्यांचा कटाक्ष असतो.लातूर जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. सोयाबीन, ऊस आणि इतर नगदी पिकांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी बँकेच्या माध्यमातून त्यांनी कृषी क्षेत्राला मोठा आर्थिक आधार दिला आहे.

नैसर्गिक संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका बँकेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहे.जिल्ह्यातील शेकडो सहकारी संस्था, विकास सोसायट्या आणि दूध उत्पादक संघ या बँकेशी जोडलेले आहेत. या सर्वांना आर्थिक बळ देऊन ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम धीरज साहेबांच्या पुढाकारातून ही बँक करत आहे.ग्रामीण भागातील मुलांकडे गुणवत्ता असूनही केवळ संसाधने आणि भाषेच्या अडचणीमुळे ते जागतिक स्पर्धेत मागे पडू नयेत, या उदात्त हेतूने धीरज देशमुख यांनी ‘रीड लातूर’ हा उपक्रम सुरू केला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल असलेली भीती दूर करून, त्यांना संवाद कौशल्यात निपुण करणे हे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जागतिक स्तरावर टिकण्यासाठी इंग्रजी ही काळाची गरज आहे, हे ओळखून धीरज यांनी ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाचे वातावरण निर्माण केले. “हातात पुस्तक आणि डोळ्यात स्वप्न” हे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे. केवळ पदव्या मिळवणारे विद्यार्थी न घडवता, ज्यांच्या डोळ्यात स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवण्याची स्वप्ने असतील आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल, असे तरुण घडवण्यावर या उपक्रमाचा भर आहे.पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा आणि इतर सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘रीड लातूर’ व्यासपीठ उपलब्ध करून देते. ग्रामीण भागातील मुलांच्या बुद्धिमत्तेला आधुनिक शिक्षणाची जोड देऊन त्यांना शहरांतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उभे करण्याचे काम हा उपक्रम करत आहे.’रीड लातूर’ हा केवळ वाचन उपक्रम नसून तो ग्रामीण महाराष्ट्रातील बौद्धिक क्रांतीचा पाया आहे. धीरज देशमुख यांच्या या विधायक दृष्टिकोनामुळे लातूरच्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आज आत्मविश्वासाचे नवे स्वप्न फुलत आहे.राजकारणाच्या धकाधकीतही धीरज यांनी आपली खेळाडूवृत्ती आणि कलासक्ती जपली आहे.

लातूरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा ‘लातूर फेस्टिव्हल’ असो किंवा ७२० खेळाडूंचा सहभाग असलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धा असोत, त्यांनी लातूरच्या तरुणाईला नेहमीच प्रोत्साहन दिले. स्वतःला क्रिकेट, फोटोग्राफी आणि घोडेस्वारीची आवड असल्याने, ते खेळाडूंमधील ऊर्जा ओळखण्यात नेहमीच यशस्वी ठरतात.धीरज देशमुख यांची कार्यपद्धती ही ‘शांत पण प्रभावी’ आहे. ते अकारण प्रसिद्धीच्या मागे न लागता जमिनीवर राहून काम करण्यावर भर देतात. कार्यकर्त्यांशी असलेला संवाद, विरोधकांच्या टीकेला संयमाने दिलेले उत्तर आणि विकासकामांचा ध्यास, यामुळे लातूरच्या राजकारणात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळालेले चांगले यश यामुळे आज ग्रामीण भागासाठी आणि पुरोगामी विचारासाठी आश्वासक ठरले आहेत.”राजकारण हे जनतेच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी असावे, हाच त्यांचा मूळ मंत्र आहे.”वारसा मोठ्या नावाचा असला की अपेक्षांचे ओझेही मोठे असते. मात्र, धीरज देशमुख यांनी हे ओझे न मानता, त्याला विश्वासाचे आणि विकासाचे प्रतीक बनवले आहे. लातूरच्या विकासाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या या तरुण नेत्याचा प्रवास असाच यशस्वी राहो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

@राहूल हरीभाऊ इंगळे पाटील





