वडवळ सोसायटीच्या चेअरमनपदी उमाकांत आचवले तर व्हाईस चेअरमनपदी आजमत पटेल यांची बिनविरोध निवड
वडवळ नागनाथ:( वार्ताहर)..बहुचर्चित आणि चाकूर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उमाकांत आचवले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी आमजत पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर फटाके फोडून व गुलालाची उधळण करुन जल्लोष करण्यात आला.
येथील ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी सर्व नुतन संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी उमाकांत आचवले आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आमजत पटेल यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस.किलचे यांनी वरील दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा संस्थेचे विद्यमान संचालक अण्णासाहेब पाटील, वैजनाथ नंदागवळे, संभाजी रेकुळगे, हणमंत लवटे-पाटील, शशिकांत चिंतलवार, अशोक बेंडके, कोंडीबा कराड, संतोष वाघमारे, बाबुराव भोजने, ललिता भेटे, राजूबाई कसबे उपस्थित होते.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी येथील महात्मा बसवेश्वर चौकात फटाक्यांची आतिशबाजी करित एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे आणि सदस्यांनी, सोसायटीमध्ये गटसचिव रमाकांत कुसनुरे, लिपीक रामकिशन केंद्रे यांनी तर (कै.) बापुसाहेब पाटील शाळेत उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, सचिव उमाकांत लव्हराळे, मुख्याध्यापिका शर्मिला धनाश्री यांनी नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांचा यथोचित सत्कार केला.

दरम्यान, सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.२० मे रोजी मतदान घेण्यात आले होते. यावेळी अॅड. भिमाशंकर नंदागवळे यांच्या पॅनेलचा पराभव करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. गत पंचवार्षिक वगळता या सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्री.पाटील यांच्या गटाचेच वर्चस्व राहिले आहे.




