मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद…
औसा – औसा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आशा मागण्यांसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.१७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवून सविस्तर चर्चा केली.त्या सर्व मागण्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होतील असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.
रया भेटीत प्रामुख्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील व कासार सिरसी मंडळातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग अत्यंत खराब झाले असून सदरील रस्त्यांचा समावेश पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात करुन रस्ता सुधारणा कामांना निधी मंजूर करावा. विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात यावी. मागच्या दोन्ही वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहुन गेलेल्या पुल व रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद, लातुर ने शासनास सादर केलेल्या प्रस्तावांना निधीसह प्राधान्याने मंजूरी देण्यात यावी तसेच कासार सिरसी – कोराळी, आलमला मोड – उंबडगा – आलमला, औसा – तुंगी – माळकोंडजी, हिप्परसोगा – कातपूरसह अनेक ग्रामीण जोडरस्ते खड्डेमय झाले असुन रस्त्यांवरील पुल बांधकाम व रस्ता सुधारणा कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना निधी अंतर्गत प्राधान्याने मंजूरी देण्यात यावी.लातुर जिल्हयातील सततच्या पावसामुळे व शंखी गोगलगाय च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या उगवलेली कोवळी पिके नष्ट झाली आहेत. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत युद्धपातळीवर पंचनामे करुन मदत मंजूर करावी. २०२० खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होऊनही लातूर जिल्ह्यातील जवळपास २ लक्ष ३८ हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा वाटपाबाबत मा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करुन वितरित करण्यात यावा.

हालसी हत्तरगा, माळुंब्रा व आशिव येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्रांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.भुकंपग्रस्त भागातील मुलभूत प्रश्नांसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात यावी तसेच भुकंपग्रस्त अ/ब/क वर्गवारीच्या गावातील मुलभूत कामांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा. किल्लारी व कासार सिरसी या दोन मोठ्या गावांच्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतमध्ये परिवर्तित करण्यात यावे, किल्लारी व कासार सिरसीसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापित कराव्यात तसेच कासार सिरसी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात यावे. औसा येथील ग्रामीण रुग्णालय दर्जोन्नत करुन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे, उजनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात यावे तसेच कासार सिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे औसा शहरातील मुख्य रस्ता तिसरा टपयाच्या भूसंपादनासह रुंदीकरण कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या केल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या संदर्भात निर्णय होतील असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.