एमजी मोटार इंडियाने महाराष्ट्रातील रिटेल क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवली, आता लातुरातही विक्रीचे दालन सुरू
लातूर, 23 ऑक्टोबर 2021: देशभरात कार खरेदीच्या अनुभवाला नव्याने परिभाषित करण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधोरेखित करत एमजी मोटार इंडियाने लातुरात विक्री दालनाचा भव्य शुभारंभ केल्याची घोषणा केली. लातुरचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन पिंगळे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रात प्रीमियम एसयूव्हींसाठी मजबूत बाजारपेठ असल्याचे जाणत हे नवे दालन शहरातील ग्राहकांच्या वाहतूकविषयक विकसित गरजांची पूर्तता करणार आहे. हे एमजीचे अद्ययावत शोरूम आपल्या संभाव्य ग्राहकांच्या दृष्टिकोनानुरूप त्यांना आधुनिक चेहरामोहरा व अनुभव देत आपल्या ब्रिटिश वारशाचेही दर्शन घडवते.

या नव्या दालनाच्या शुभारंभासोबतच एमजीची आता महाराष्ट्रात 41 टचपॉइंट्वर आपली सेवा देत आहे. 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील टचपॉइंट्सची संख्या 43 वर नेण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे देशभरात आजमितीस एकूण 294 टचपॉइंट्स सेंटर्स आहेत. 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात आपल्या रिटेल उपस्थितीचा विस्तार करत टचपॉइंट्सची संख्या 300 वर नेण्याची एमजीची महत्त्वाकांक्षा आहे.

या शुभारंभ प्रसंगी एमजी मोटार इंडियाच्या डीलर डेव्हलपमेंटचे संचालक पंकज पारकर म्हणाले की, “लातुरात एमजीच्या दालनाचा शुभारंभ हा महाराष्ट्रातील संभाव्य ग्राहकांच्या अनुषंगाने आमची रिटेल उपस्थिती वाढवण्याच्या योजनेच्या अनुरूप आहे. हे दालन विक्री, सेवा, सुटे भाग आणि अॅक्सेसेरीजसह सर्व गरजांची पूर्तता करेल.”
शुभारंभ कार्यक्रमात एमजी लातुरचे डीलर प्रिन्सिपल मनीष धूत म्हणाले की,”भविष्याचा वेध घेणारा एक ब्रँड म्हणून एमजीने आपली नाविन्यशीलता व तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारतीय वाहन उद्योग क्षेत्रात यापूर्वीच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.या ब्रँडसोबत भागीदारी स्थापन झाल्याचा आम्हाला अतीव आनंद वाटत आहे. एमजीचा वैभवशाली ब्रिटिश वारसा आणि तंत्रज्ञान केंद्रीत दृष्टिकोनाचा लाभ घेऊन लातुरातील ग्राहकांना सर्वस्वी नवा तथा अद्वितीय रिटेल अनुभव देण्यासासाठी आम्ही सज्ज आहोत.”

एमजी मोटार इंडियाबाबत :
युकेत 1924 मध्ये स्थापन झालेली मॉरिस गराजेस कंपनीची वाहने आपल्या स्पोर्ट्स कार, रोडस्टर्स, कॅब्रियोलेट मालिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आपली वैशिष्ट्यपूर्ण स्टायलिंग, अभिजातपणा आणि जोरदार परफॉर्मन्ससाठी एमजीची वाहने अनेक ख्यातनाम सेलिब्रिटीजची पहिली पसंत आहेत. यात ब्रिटनच्या पंतप्रधानांसह ब्रिटिश राजघराण्याचाही समावेश आहे. 1930 मध्ये युकेच्या ऍबिंग्डनमध्ये स्थापन झालेल्या एमजी कार क्लबचे हजारो दर्दी चाहते आहेत. कार ब्रँड्समधील हा जगातील सर्वात मोठ्या कार क्लबपैकी एक आहे. गेल्या 96 वर्षांच्या निरंतर प्रवासात एमजी हा आधुनिक, फ्युच्युरिस्टिक आणि अभिनव कल्पनांचा ब्रँड म्हणून विकसित झाला आहे. भारतातील गुजरातच्या हलोलमध्ये एमजीचा आधुनिक निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याची वार्षिक वाहन निर्मिती क्षमता 80 हजार वाहनांची आहेत. आजमितीस या प्रकल्पात सुमारे 2500 कर्मचारी कार्यरत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एसएपी, अडोब, कॉग्निझंट, आयटेलिजन्स या कंपन्यांच्या सहकार्याने 1930 पासून सुरू झालेल्या सिलसिल्यामुळे एमजीला आपल्या ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा पुरवता आली आहे. आपल्या सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड आणि इलेक्ट्रिक) दृष्टीकोनाच्या माध्यमातून एमजीने ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वोत्तम सेवेची पायाभरणी केली आहे. भारतीय वाहन क्षेत्रात एमजी अनेक नव्या सुविधांची उद्गाती राहिली आहे. त्यात पहिली इंटरनेट एसयूव्ही – एमजी हेक्टर, पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – एमजी झेड एस ईव्ही आणि पहिल्या ऑटोनॉमस (स्वायत्त)लेव्हल 1 प्रीमियम एसयूव्ही – एमजी ग्लॉस्टरचा समावेश आहे.











