30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeलेख* विचाराचं शक्तीस्थळ : विलासराव देशमुख*

* विचाराचं शक्तीस्थळ : विलासराव देशमुख*

विशेष लेख

  • राहूल हरिभाऊ इंगळे पाटील

  माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांचा आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी ११ वा स्मृतिदिन आहे. पाहता पाहता विलासरावजींना आपल्यातून जाऊन ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण लातूरकरांच्या आयुष्यात असा एकही दिवस नाही की विलासराव देशमुख यांची आठवण झाली नाही. एवढे मोठे कार्याची शिदोरी ते आपल्याला ठेऊन गेले आहेत.

    लातूरकरांच्या नाही तर देशभरात त्यांच्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांच गारूड लोकांच्या मनावर आहे. विलासरावजींच्या रूपाने नेता आणि लोकनेता कसा असतो याचा फरक दिसून येतो. सामान्य माणसाचे दु:ख, वेदना जाणणारे मन, त्यांच्या व्यथा न पाहता दिसणारे डोळे आणि न सांगता समाजातल्या शेवटच्या माणसाला काय हव आहे हे ऐकणारे कान आदरणीय विलासराव देशमुख यांना होते. एक संवेदशील मन एक संवेदशीन नेतृत्व घडवीत असते. विलासरावजी देशमुख यांच्याकडे हे लोकनेत्या म्हणून नावारूपाला येणारे गुण होते. 

    देशाला स्वातंत्र्रय मिळाले तेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले होते, देशातील शेवटचा घटक  सामान्य माणूस आहे, त्यांच्या हिताचे काम होईल आणि तो सुखी होईल तेव्हाच खरे स्वातंत्र मिळाले असे म्हणता येईल. ही संकल्पना खऱ्या अर्थाने मुर्त स्वरूपात आणली ती विलासरावजी देशमुख या नेतृत्वाने. त्यांचा जन्म मागसलेल्या मराठवाडयातील लातूरचा विकासपासून वंचीत असलेल्या आणि अठराविश्व दारिद्यात जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात या नेतृत्वामूळे सुखाचे दिवस आले. राज्यात आणि देशात काम करतांना या मागास भागात आणि येथील लोकांच्या प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या भागात शिक्षण, कृषिविकास, रस्ते, दळणवळण सुविधा, सिंचन व्यवस्था, साखर उदयोगासह अनेक उदयोगांना चालना दिली. त्यांच्या राजकीय कालखंडा या भागात झालेली विकासाची कामे ही पिढयानपिढया पुरणारी आहेत. 

अस म्हणतात माजी केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण देशात कुठेही त्यांच्या अंगावरून झूळूक वाहून गेली तरी ते म्हणत हा सह्रयाद्रीचा वारा आहे. असेच आदरणीय विलासराव देशमुख जगभर वावरतांना कुठेही काही नवीन पाहिल की त्यांना वाटायच हे नव ते आपल्या लातूरला हव. समाजातील सर्व माणस सारखी आहेत. सर्वांचा विकास झाला तर हे सगळे एका माळेत ओवले जातील. हा नवा प्रकाश घराघरात, प्रांताप्रातातून संपूर्ण राष्ट्रात जातो. विकासाचा मार्ग समाजाच्या भावनीक एकतेचा मार्ग होतो. अशी विधायक सामाजिक ऐक्यांची दृष्टी त्यांच्याकडे होती. काम सुरू असेल तर लोक सोबत येण्यासाठी खारीचा वाटा उचलतात यातूच चांगले सहकारी विलासरावजींना त्या काळात लाभले. या त्यांच्या नेतृत्वगुणामूळे पंढरपूर, देहू, आळंदी ही अध्यात्मिक साधनेची तिर्थस्थळ आहेत त्या प्रमाणे येथील लोककल्याणाच्या विचाराच शक्तीस्थळ म्हणून विलासरावजी देशमुख यांच कार्यक्षेत्र असलेले लातूर नावारुपाला आले आहे.

खऱ्या अर्थाने देशाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा गावखेडयांचा विकास होईल. हा विचार स्विकारून सहकार आणि साखर उदयोगातून ग्रामिण भागाचा आणि शेतकरी, कष्टकरी माणसांचा विकास केला. मराठवाडा विशेषता लातूरमध्ये सहकार चळवळीची मुहूर्तमेंढ रोवली. या सहकार चळवळीमुळे येथे कायापालट झाला आहे.

सहकार आणि कोणताही एकटा ऊसउत्पादक शेतकरी किवा काही ऊसउत्पादक शेतकरी एकत्र येऊन साखर उदयोग ऊभारणी करू शकत नाहीत. पण कतृत्ववान नेतृत्व लाभल्यास शेतकरी साखर उदयोगाचा व्यवस्थापक होऊ शकतो यांचे उदाहरण म्हणजे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परीवारातील साखर कारखाने होय. आजही या परीवारातील विलास सहकारी साखर कारखानासह सर्व कारखाने यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, ग्रामीण भागात नवविचारांची जागरूकता वाढली आहे, लोकांना एकत्र येण्याची आणि स्वविकासासाठी संधी मिळाली आहे. या सर्व वाटचालीस साखर उदयोगातील मानाच्या संस्था वसंतदादा शुगर इंडस्ट्रिज ली.,पूणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुबंई, राष्ट्रीय सहकारी साखर संघ, नवी दिल्ली यासह देशपातळीवरील विविध संस्थानी पारीतोषिके देऊन कारखान्याचा गौरव केला आहे. आदरणीय विलासरावजींनी ही विकासाची निर्माण केलेली चळवळ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख पूढे घेऊन जात आहेत.

आज आपण पाहतो नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे सहकार आणि साखर उदयोगाचा पाया रचला गेला. पण खऱ्या अर्थाने या क्षेत्राचा कळस पहायचा असेल तर तुम्हाला लातूरलाच याव लागेल. हे लोकोत्तर कार्य विलासरावजींच्या नेतृत्वाची पावती आहे. 

लातूर जिल्हा आणि या परिसरातील जनजीवन म्हणजे यात्रा, जत्रा, उरूस, गावकी, भावकीत यात मग्न असलेला समुदाय होता. येथील किमान भावीपिढयांना शिक्षण, ज्ञान, विज्ञान आणि काळाची पाऊल ओळखून पूढे घेऊन जाणारा नेता आणि विचार हवा होता. अशा या संक्रमणाच्या काळात विलासरावजी देशमुख यांच नेतृत्व आपल्याला लाभल. या सर्व शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातल्या युवकांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना नवे पंख उपलब्ध करून देण्याचं फार मोठ कार्य आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी त्या काळात केले आहे. मराठवाडा, लातूर म्हणजे दुष्काळ, गरिबी आणि अठराविश्व दारिद्रयातील काळरात्रीचा प्रवास पण या अंधारातील मंगलमय उष:कालाची सुरूवात म्हणजे विलासराव देशमुख होय. एवढे मोठया कार्याचा पाया त्यांनी घातला. यामूळेच आज मराठवाड्यातील कष्टकरी माणसाच्या हातातील लखलखता हिरा म्हणजे विलासरावजी त्यांच्या अष्टपैलू दर्शनाने लोकनेत्याचे नवे परिमाण निर्माण झाले आहेत.

आदरणीय विलासराव देशमुख हे आपल्याला लाभलेल कर्तबगार नेतृत्व आहे. प्रारंभीपासूनच राजकीय वाटचालीत चढउतार आले पण ज्या ज्या पदावर काम केले त्या पदाला न्याय देण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाची सत्ता होती तेव्हा विकासकामातून आणि सत्ता नव्हती तेव्हा वैचारीक संघर्षातून त्यांच्या कर्तृत्व, नेतृत्वगूणाची चमक सर्वांना पाहता आली. कठीण काळात अनेक वेळा महत्वाच्या जबाबदारी त्यांनी पार पाडली. देशात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे सर्वांधिक काळ आघाडी सरकार त्यांनी चालविले. या सरकारच्या माध्यमातून विशेषता बहूजनासाठी कार्य केले. राजकीय, सामाजिक, कृषी, आर्थिक, संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा दाखविणारे आहे. मराठवाडयाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी पाणी मंजूर करणे, आशिया खंडातील पहिल्या मोनोरेल सेवेस मंजूरी, माहिती अधिकार, मराठवाडा विकासनिधी, महिला बचत गटाना अल्प व्याजाने कर्ज, सामाजिक विकास समन्वय कक्ष, खेळाडूना आरक्षण, दुय्यम न्यायालयात मराठीत निर्णय, ग्रंथालय अनुदानात वाढ, गृहनिर्माण धोरण, राज्यभारनियमनमुक्त केले, झोपडपटटी पुर्नवसन, शेतकरी व विदयार्थ्याना विमा योजना एक ना अनेक ऐतिहासीक निर्णय घेतले यामुळे महाराष्ट्र विकास, गुंतवणूक यामध्ये देशात क्रमांक एकचे राज्य झाले होते. या सारखी विविध आघाडीवर त्यांनी कर्तबगारी केली.

लोकशाहीतील नेतृत्वाला वकतृत्वाचा विशेष गुण असेल तर तो मुकुटमनी असतो. असे फर्डे वक्तृत्व त्यांना लाभले होते. अवीट गीत गाणाऱ्या लतादीदी आणि आशाजी यांचा आवाज होता कोकीळवाणी, विलासरावजींनी शेवट पर्यंत लोकांच जगण मांडल म्हणून ती होती लोकवाणी. त्यांच्या भाषणाची बोली लोकांच सुख-दु:ख मांडणारी भाषा होती. बहूजन हिताय, बहूजन सुखाय हा विचार त्यांनी मांडला, म्हणून लोकशाहीत त्यांचे विचार चिरंतन आहेत. 

आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब या कर्तबगार नेतृत्वाचा आज स्मृतिदिन आहे, त्यांना मनापासून शतशा नमन, विनम्र अभिवादन

राहूल हरिभाऊ इंगळे पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मो. ९८९०५७७१२८

——–

                       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]