विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये

0
216

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकारने खेळू नये-आ. संभाजी पाटील निलंगेकर

परीक्षा रद्दने झालेल्या आर्थिक भुर्दंडाची भरपाई देण्यात यावी

लातूर/प्रतिनिधीः- शासनाच्या वतीने आरोग्य विभागात कर्मचारी भरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून आपले भविष्य उज्वल असावे या दृष्टीने परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकारने खेळू नये असा इशारा देत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक भुर्दंडाची भरपाई शासनाने त्वरीत द्यावी अशी मागणी केली आहे.

शासनाच्या वतीने आरोग्य विभागात कर्मचार्‍यांची भरती व्हावी याकरीता परीक्षेचे नियोजन केलेले होते. सदर परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती. या परीक्षेकरीता हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी करून परिक्षा फी सुद्धा भरलेली होती. मात्र जाहीर झालेली परीक्षा अचानक शासनाच्या वतीने रद्द करण्यात आली. यामुळे परीक्षेसाठी केंद्र असलेल्या शहरांमध्ये पोहचलेले अनेक विद्यार्थी आणि प्रवासात असणारे विद्यार्थी निराश झालेले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झालेले आहे. या विद्यार्थ्यांशी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या या चुकीच्या निर्णयांचा निषेध करून शासन आमच्या भविष्याशी खेळत असल्याचे बोलून दाखविले.

विशेष म्हणजे आदल्या दिवशी अचानक रात्री परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसलेला आहे. त्याचबरोबर शासनाने या परीक्षेकरीता ज्या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सांगितले होते तीच कंपनी यापुर्वी अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परीक्षेकरीता विद्यार्थ्यांकडून शेकडो रुपयही फी म्हणून विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले होते. आता ही परीक्षा नवीन तारीख जाहीर करून घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे.

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार समाजातील प्रत्येक घटकांच्या भावनासोबत खेळत असल्याची टिका केली. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्याचे व देशाचे उज्वल भविष्य घडले जाणार आहे त्या विद्यार्थ्यांसोबतही शासनाचा खेळ सुरु असल्याचे स्पष्ट केले. परीक्षा तारखा जाहीर करून ती परीक्षा आयत्यावेळी रद्द करणे हे शासनाचे नेहमीचेच झालेले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्दवस्त होण्याची भिती आ. निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा देण्याचा हक्क असून त्या दृष्टीने शासनाने नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत आ. निलंगेकर यांनी याबाबत विधानसभेत आपण आवाज उठवू अशी विद्यार्थ्यांना ग्वाही दिली. ज्या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेची नोंदणी करण्यास सांगितली होती तीच कंपनी अपात्र होती याबाबत आश्चर्य व्यक्त करत आ. निलंगेकर यांनी या कंपनीसोबत मंत्र्यांचे किंवा सरकारमधील कोणाचेतरी पटलेले नसले म्हणूनच आयत्यावेळी परीक्षा रद्द करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप यावेळी आ. निलंगेकर यांनी केला.

विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीसच्या माध्यमातून जमा केलेली कोट्यावधीची रक्कम आता कोणाच्या घशात जाणार असा प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी सरकार केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. लवकरच आघाडी सरकारने हा खेळ थांबवून विद्यार्थ्यांच्या झालेल्या आर्थिक भुर्दंडाची तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी केली. आगामी काळात सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले व शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here