20.2 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeशैक्षणिकविद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी ...

विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी – डॉ. उदय मोहिते

*’केशवराज’मध्ये संस्था वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा*

लातूर, दि.२८ (माध्यम वृत्तसेवा ):– सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे तसेच व्यसन करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे आजार, मानसिक आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक, अधिष्ठाता डॉ.. उदय मोहिते यांनी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. २८ जून २०२५ रोजी लातूर येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने दयानंद सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रात कला, क्रीडा क्षेत्र, संस्कृती ज्ञान परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डाॅ. उदय मोहिते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज शैक्षणिक संकुल स्थानिक समन्वय समिती, अध्यक्ष धनंजय तुंगीकर तर विशेष अतिथी बारीपाडा धुळे येथील पर्यावरण रक्षक व सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री चैत्राम पवार, वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हभप दत्तात्रय पवार तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जितेश चापसी, प्रवीण सरदेशमुख, संजय गुरव, विष्णू सोनवणे, विद्यासभा संयोजक , महेश कस्तुरे, स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शैलेश कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर, केशव शिशुवाटिका शालेय समिती अध्यक्षा वर्षाताई डोईफोडे, श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे प्राचार्य बांगर, केशव शिशु वाटिका प्रधानाचार्या श्रीमती अवंती कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री चैत्रराम पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफीत दाखवून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. उदय मोहिते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलसारख्या बॉम्ब पासून दूर राहावे. आई-वडिलांच्या आज्ञेत रहावे आणि गुरुजनांचा आदर करावा. शाळेतून बाहेर पडताना चांगल्या आठवणी घेऊन बाहेर पडा, चांगल्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विशेष अतिथी म्हणून पद्मश्री चैत्राम पवार यांनी आपल्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याचा व सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला. वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात येऊन पर्यावरण रक्षणाचे कार्य कशाप्रकारे सुरू केले हे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपण ज्या गावातून आलोत, त्या गावाच्या विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्मरक्षीय मनोगतात धनंजय तुंगीकर यांनी केशवराज संकुलाचे वेगळेपण सांगून संकुलातील शिक्षकांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सांगितले. तसेच ही संस्था आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करीत असून भारतमातेसाठी आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणारी एक पिढी घडवत आहे असे सांगितले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्था माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर शैलेश कुलकर्णी यांनी संस्था परिचय करून दिला. कु. अदिती बादाडे, श्रेयश कंधारकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी तसेच विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती तेजस्विनी सांजेकर व प्रदीप कटके यांनी केले. दहावी प्रमुख श्रीमती शैलजा कुलकर्णी व सहप्रमुख संजय आढाव यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. महेश काकनाळे यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी विद्यार्थी, संघ पदाधिकारी, सर्व निमंत्रित पालक, विद्यार्थी, नातेवाईक, संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]