23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeशैक्षणिक*विनम्र अभिवादन बाबा…*

*विनम्र अभिवादन बाबा…*

आज बरोबर १० वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै २०१४ रोजी माझे वडील प्राचार्य रामदास डांगे यांचे निधन झाले. बाबांच्या एकंदरीत कार्याविषयी दैनिक लोकसत्तातील ‘व्यक्तिवेध‘ या सदरात घेतलेली नोंद :

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या दिशेने रवाना होत असताना संशोधनकार्यात ज्यांनी वारकऱ्यांइतकीच आस्था आणि निष्ठा दाखवली त्या प्राचार्य रामदास डांगे यांचे निधन झाल्याने जणू एक संशोधन दिंडीच अर्ध्यावर थांबली आहे.

संत साहित्य हा डांगेसरांचा अभ्यासाचा आणि अतीव आदराचा विषय होता. संपूर्ण हयात त्यांनी आपल्या संशोधनकार्यात घालवली. जन्म विदर्भातला, नोकरी मराठवाडय़ात आणि निवृत्तीनंतरचे संशोधनकार्य पुण्यात अशा प्रकारे अवघ्या महाराष्ट्राशीच डांगेसरांचे भावनिक बंध जुळले होते.

‘प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी’ हा त्यांच्या जणू आयुष्याचाच ध्यास बनला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी या ध्यासापोटी अनेक गावे पालथी घातली.

संत वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यांना एक बाब लक्षात आली ती म्हणजे ज्ञानेश्वरीइतके पाठभेद कशातच नाहीत. शिवाय ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांची संख्याही भरपूर आहे. अशा वेळी सर्व प्रतींचा अभ्यास करून त्यांनी ‘मूळपाठ दीपिका ज्ञानदेवी’ प्रत सिद्ध केली. ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांचा शोध घेत असताना प्रा. डांगे आडवळणाच्या एखाद्या गावापासून ते अंदमान निकोबार पर्यंत फिरत राहिले. ज्ञानेश्वरीच्या किमान २५ महत्त्वाच्या प्रती त्यांनी अक्षर ना अक्षर वाचल्या. १९९६ मध्ये सुरू झालेले त्यांचे हे संशोधनकार्य दशकभर चालले.

प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीनंतर प्रा. डांगे यांचे महत्त्वाचे काम म्हणजे शब्दकोश व व्युत्पत्तिकोशाचे केलेले संपादन. शब्दकोशाचे काम करताना त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या बोलीतले अनेक नवे शब्द अंतर्भूत केले. ‘शिवशाहीतील दोन संत’, ‘देशीकार लेणे’ ही त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्यातल्या अभ्यासू चिकित्सकाचा परिचय देणारी आहे. आयुष्यभर प्रा. डांगे यांनी जे संशोधन केले त्या संशोधनकार्याला शेवटी शासनानेही ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारा’ ने गौरविले.

एखाद्या व्रतस्थ साधकाप्रमाणे ग्रंथांशी सदैव जखडलेल्या डांगेसरांच्या व्यक्तिमत्त्वात मिस्कीलपणाही होता. त्यांच्या शाब्दिक कोटय़ा या केवळ अजोड असत. एक काम संपले की दुसरे हाती घ्यायचे ही वृत्ती त्यांच्यात होती. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये ३३ वर्षे प्राचार्यपदाची धुरा त्यांनी सांभाळली. मराठवाडा विकास आंदोलनात त्या भागातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून तरुणांचे नेतृत्व पुढे आले. या तरुण नेतृत्वाला मार्गदर्शन करण्याचे कामही त्या काळी सरांनी तळमळीने केले.

परभणीसारख्या शहरात वेगवेगळ्या सांस्कृतिक चळवळींसाठी ते सतत मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. परभणीकरांनाही त्यांच्याविषयी कमालीचा अभिमान होता. आयुष्याच्या शेवटापर्यंतही ते ‘निवांत’ नव्हते. दासोपंतांच्या ‘गीतार्णव’ या ग्रंथाविषयी त्यांचे संशोधन सुरूच होते.

- प्रशांत डांगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]