दिन दुबळ्या धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारवड
सी. ना. आलुरे गुरुजी
आपल्या कृषितुल्य व्यक्तिमहत्वाने व मूलगामी दृढ प्रागतिक व शैक्षणिक विचारांनी प्रेरित होऊन ग्रामीण व्यवस्थेतील दैन्य, दु;ख, अंधश्रद्धा, जातीभेद, इत्यादी सामाजिक परिवर्तनातील अडथळे ठरणाऱ्या घटकांवर सत्यवादी आचरणाने निर्भय पणे प्रहार करीत पंचकृषीत समता व समानतेची शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीची जाळे उभारून लाखो समाज मनात आशेचा किरण निर्माण करणारे मा. आलुरे गुरुजी सर्वांचे दीपस्तंभ असून ग्रामीण भागातील नव्या शैक्षणिक पॅटर्न चे जनक होत. सर्वदूर शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात.
वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित अशा मागास घटकातील शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे दिसत असून ग्रामीण भागात ते अधिक प्रकर्षाने जाणवत होते. अशा साठी आणि ऐकून सकळ समाजाच्या उद्धारासाठी काही केले पाहिजे या मानवतावादी विशाल धैयवादी विचारातून १९६९ मध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करून जवाहर विद्यालयाची सुरुवात झाली त्या शाळेतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला त्यांच्या या तत्वनिष्ठातेमुळेच हजारो प्रयत्नवादी/धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते आधारवड पडले.
माझे वडील बंधू कै. डॉ. के.डी. शेंडगे यांनी जाणीवपूर्वक जवाहर विद्यालयात प्रथम माझा प्रवेश घेतला शाळेचा लौकिक सर्वदूर पसरलेला होताच त्याबरोबर आलुरे गुरुजींचा असलेला परिचय व अन्य शिक्षकांसोबतचे स्नेहसंबंधामुळे १९८५ मध्ये मी इयत्ता ९ मध्ये प्रवेश घेतला अन माझ्या जगण्याला नवी दिशा मिळाली अडचणींवर मात करून नवीन धैय प्राप्तीसाठी अखंड मार्गभ्रमण करण्यासाठी शिकवणीचा शुभारंभ झाला.
ग्राम दैवत खंडोबा मंदिर परिसरातील निकोप श्रद्धायुक्त वातावरण त्यास अंतर्गत असलेल्या वर्ग खोलीतून चालणारे विद्यादानाचे पवित्र कार्य असे एकंदरीत भारावलेले वातावरण होते.
साध्या, स्वच्छ अशा विशिष्ट पेहरावातील गुरुजींच्या पहिल्या भेटीतच मी सुखावून गेलो. डॉ. के डी शेंडगेंचा भाऊ आहेस मात्र तुला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. या वाक्यांनी मी पुरता भानावर आलो जणू यशस्वितेचा मंत्रच गुरुजींनी दिला. हा संजीवनी मंत्र ९वी ते १२वी च नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील अंतिम पदवी संपादन करे पर्यंत शिरोधार्य मानला. अद्यापही तो केला जात आहे. म्हणूच यशस्वी वाटचाल करीत आहे.
मला गुरुजी भावले ते त्यांच्या साधी राहणी उच्चतम प्रभोधनात्मक विचार सारणी आणि कडक शिस्त या गुणामुळे शिस्त हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांच्या गुणांचा वकूब विद्यार्थी, शिक्षक, पालक इ. सर्व घटकावर होत असे म्हणूनच विद्यार्थी शाळेत उशिरा येत नसत शिक्षक तर उशीर करणे शक्यच नव्हते. या शिस्तीमुळे चांगल्या सवयी जडत गेल्या.
मुलं मुलींचे वसतिगृह ” हि नाविन्यपूर्ण व्यवस्थेचा विषय गुरुजींच्या अधिकच जिव्हाळ्याचा होता गुरुजींच्या औदार्य, समता, समानता, जातीनिर्मूलन शैक्षणिक क्रांती या तत्वाचा कास पाहणारी होती. ग्रामीण भागातील कित्येक गोर गरीब व पालक अनंत अडचणीमुळे अणदूर ला स्वतंत्र व्यवस्था करून शिक्षण देऊ शकत नव्हते. त्यामुळे अनेकांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. तर कित्येकांचे अर्धवट शिक्षण राहत असे. हीच अडचण ओळखून गुरुजींनी सर्व सोयी नियुक्त मुलां मुलींचे वसतिगृह सुरु केले अत्यंत नाममात्र शुल्कात किंबहुना जवळजवळ मोफतच धडपडणाऱ्या गोर गरीब होतकरू विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला. केवळ या सुविधेमुळे कित्येकांचे जीवन यशस्वी झाले. वसतिगृह म्हणजे भावी भारताचे सुजाण नागरिक घडवणारे केंद्रच बनले. ते केवळ फक्त आलुरे गुरुजींमुळेच.
गुरुजी स्वतः पहाटे ५ वाजता मुलांना उठवण्यासाठी येत असत मुलांसोबत व्यायामही करत असत उठण्यास उशीर झाल्यास शिक्षा हि करत असत गुरुजींमुळे लवकर उठण्याची जी सवय लागली ती आज तागायत तशीच आहे.
वर्गातील अध्यापन सर्वच शिक्षकांचे कमालीचे गुणवत्तापूर्ण होते. गुरुजींच्या प्रभावामुळे सर्वच शिक्षक शिस्तबद्ध अभ्यास, चरित्रसंपन्न व व्यासंगी वक्तशीर व कार्यतत्पर होते. विध्यार्थ्यांना घडवण्यामध्ये ते तासभरही कमी पडत नव्हते.त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्यामुळेच प्रत्येक वर्षी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत विध्यार्थी झळकत असे तर काही वेळा महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान हि या शाळेने पटकावला आहे. ते केवळ गुरुजी व शिक्षक यांच्या सामुदायिक प्रयत्नातूनच.
”रात्र अभ्यासिका” हा अभिनय उपक्रमामुळे ज्ञान दृढ झाले. संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्येंत विधार्थी मंदिरात अभ्यासासाठी सक्तीने बसवण्यात येत असे. दररोज एक शिक्षक या कालावधीत उपस्थित राहत असत. या नित्यक्रमामुळे दैनंदिन अभ्यास वेळेत पूर्ण होत असे याचा फायदा परीक्षेत उत्तम गुणप्राप्तीसाठी होत असे. त्यामुळे आपले चांगले गुण संपादन करू शकतो हा आत्मविश्वास या रात्र अभ्यासिकेतून मला मिळाला.
बक्षीस वितरण, सत्कार समारंभ, प्रमाणपत्र वितरण इ. कार्यक्रमात गुरुजींच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र स्वीकारणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. या निमित्ताने मिळणाऱ्या शाबासकीमुळे पराक्रम गाजवायला आणखीन धार यायची. नवी चेतना प्राप्त होत असे.
लेखन:डॉ. आर. डी. शेंडगे
एम. एस. सर्जन
शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, उमरगा











