विकासकामात खोडा घालणार्यांना उच्च न्यायालयाचा दणका
– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.17/05/2022
लातूर तालुक्यातील कव्हा येथे मराठवाडा विभागीय क्रीडा संकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या मागणीवरून कव्हा व खोपेगाव शिवारामध्ये 25 एकर जमीन देऊन क्रीडा संकूलाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी पहिल्या टप्प्यात 24 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 48 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. यातून 47.90 लाख कंम्पाऊंड वॉलवरती खर्च करून बहूतांश कंम्पाऊंड वॉलचे काम एम.एस.विटा इन्फ्रास्ट्रक्चर (लोणी जि.अहमदनगर) यांच्याकडून करण्यात आले. तेही काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम राजकीय द्वेशातून थांबविण्यात आल्यामुळे या विरोधात मी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या निर्णयातून न्याय मिळाला असून सदरील विभागीय क्रीडा संकूलाचे काम 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करून याबाबतच त्रैमासिक अहवाल क्रीडा विभागाने न्यायालयास द्यावा. असे आदेश देण्यात आल्याची माहिती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.

यावेळी ते महाराष्ट्र नागरी बँकेच्या गूळ मार्केट भागातील कार्पोरेट ऑफीसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, उपाध्यक्ष निळकंठराव पवार, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे, बाबासाहेब देशमुख, कव्ह्याचे उपसरपंच किशोरदादा घार, भाजपा लातूूर तालुकाध्यक्ष महादेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, लातूरची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगती पाहता लातूर येथे मराठवाड्यातील क्रीडाप्रेमीसाठी विभागीय क्रीडा संकूल कव्हा येथे उभारण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. याकरीता 24 कोटी रूपयाची तरतूद करून कव्हा येथे गट नं.230 अंतर्गत असलेले 8 हेक्टर 79 आर जमीन राखीव करण्यात आली. निधी आणि जमीन उपलब्ध झाल्यानंतर क्रीडा संकूलाचे काम सुरु करण्यात आले. या कामाला गती मिळावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 48 कोटीचा निधी मंजूर केला आणि कामही सुरु झाले. यामध्ये टेनिस कोर्ट, जलतरण तलाव गॅलरी, मल्टिपर्पज हॉल, क्रीडांगण, मुलां-मुलींसाठी वसतिगृह, सोलार, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदीसह 2.40 कोटी रूपयांच्या साहित्याला मान्यता देण्यात आली. मात्र राजकीय द्वेशातून कोरोनाचे कारण सांगत सदरील काम थांबविण्यात आले. याबाबत खोपेगाव, चांडेश्वर, कव्हा या भागातील नागरिकांसह क्रीडाप्रेमींच्या रोषामुळे याबाबत माजी आ.कव्हेकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली असून आता सदर काम पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून क्रीडा विभागाला देण्यात आले आहे. तसेच सदरील मराठवाडास्तरीय क्रीडा संकूलाचे काम 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करून याबाबतच्या कामाचा अहवाल दर तीन महिण्याला उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्यामुळे सदरील क्रीडा संकूलाचे काम हे आहे त्याच ठिकाणी कव्हा येथे पूर्ण होणार असल्याचा विश्वास माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
क्रीडा संकूलाच्या कामासाठी अवमान याचिका दाखल करणार
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी राजकीय सूडबुध्दीने हे काम बंद केलेले आहे. परंतु आता उच्च न्यायालयानेच आदेशीत केल्यामुळे क्रीडा विभागाला विभागीय क्रीडा संकूलाचे काम वेळेत पूर्ण करावे लागेल. हे विभागीय क्रीडा संकूलाचे काम वेळेत सुरु नाही झाले तर याबाबत पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये संबंधीताविरोधात अवमान याचिका दाखल करून न्याय मिळविणार असल्याचेही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
————————————————–




