महाराष्ट्र विलासरावांचे नाव कधीच विसरणार नाही
‘उजाळा साहेबांच्या आठवणींना’ कार्यक्रमांत
अनेक मान्यवरांच्या आठवणी जागल्या
लातूर प्रतिनिधी २६ मे २२:
कृतज्ञता हा कर्तृत्वान विलासराव देशमुख यांचा मनस्वी गुण होता़ त्यांनी दिलेला शब्द कधीच मोडला नाही आणि लिहिलेला शब्द कधीच खोडला नाही़ अतिश्य भावनाप्रधान माणुस म्हणुन विलासरावजींची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला असल्यामुळे विलासरावजींचे नाव महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी येथे व्यक्त केला़.
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त समस्त लातूरकरांच्या वतीने गुरूवार दि़. २६ मे रोजी सायंकाळी ‘उजाळा साहेबांच्या आठवणींना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात तब्बल चार तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणुन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची उपस्थिती होती़. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे, ज्येष्ठ विधिज्ञ बी़ व्ही़ मोतीपवळे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ़. सोमनाथ रोडे यांची उपस्थिती होती़.

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्यासोबत २७ वर्षे मैत्री असलेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी विलासरावजींच्या एक-एक आठवणींचा उलगडा केला़ विलासरावजी आज असते तर काँग्रेस पक्षावर ही वेळ आली नसती, असे ठामपणे नमुद करुन मधुकर भावे म्हणाले, विलासरावजींनी मुख्यमंत्री म्हणून आठ पक्षांचे सरकार अतिश्य सक्षमपणे चालवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला़ असे धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता इतर कोणात कधीच पाहिली नाही़ हजरजबाबीपणा हा त्यांचा आणखी एक महत्वाचा गुण होता़ त्यांनी घेतलेले असंख्य निर्णय हे समाजातील सर्वच घटकांना स्पर्श करुन जाणारे आहेत़.

अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्व वक्त्यांनी सभागृहात साहेबांच्या आठवणींचा सुगंध निर्माण केला, असे नमुद करुन पुढे म्हणाले, साहेबांची किर्ती दिवसेंदिवस वाढतच आहे़ मी त्यांच्या सावलीखाली वाढलो आणि माझे भाग्य इतके मोठे की, मी त्यांची सावलीपण राहिलो़ साहेबांनी सर्वांशी जपलेली बांधिलकी भविष्यातही देशमुख कुटूंबिय जीवापाड जपतील, असेही ते म्हणाले़.

साहेबांच्या आठवणींना उजाळा हा आमचा दिनक्रम
विकासरत्न विलासराव देशमुख यांना शब्दात बंदीस्त करणे शक्य आहे काय?, असे यावेळी बोलताना नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले, साहेबांच्या आठवणींना उजाळा हा आमच्या कुटूंबियांचा दिनक्रम आहे़ साहेबांचे विलक्षण कार्य सर्वोपरिचीत आहेत़ लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशाला विलासरावजींचा स्पर्श झालेला आहे़. आपले वडील आपल्यासोबत कसे होते तसेच आपल्या मुलांसोबत वागण्याचा आमचा प्रयत्न असतो़ माझे वडील माझ्यावर रागावले, चिडले, रुसले, अशी आठवण माझ्याकडे नाही़, राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांसोबत नेहमी आदर बाळगणारे साहेब होते़ साहेबांनी मदत केली म्हणणारे लाखोंच्या संख्येत मिळतील पण साहेबांनी माझे वाईट केले, असे म्हणणारा एकही माणुस भेटणार नाही, राज्य आणि देशातील ज्ञात-अज्ञात लाखो लोकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आदरणीय साहेबांनी परिश्रम घेतल्याच्या आठवणी मान्यवरांनी सांगितल्या.त्यांचे हे कार्य पुढे चालवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही याप्रसंगी ना. देशमुख यांनी दिली.

विलासरावजींची खरी ओळख ही विकासपुरुष म्हणुनच
विकासरत्न विलासराव देशमुख यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व सर्वांना भावणारे होते़ परंतू, त्यांची खरी ओळख ही विकासपुरुष अशीच आहे, असे नमुद करुन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला़.
साहेब अनेकांचे आदर्श
मी आमदार झालो आणि पहिल्यांदा विधीमंडळात गेलो तेव्हा तेथे साहेबांचे असंख्य सहकारी आणि माझे तरुण सहकारीही मला भेटले़ त्या सर्वांनी साहेबांसोबतचे अनेक प्रसंग, किस्से मला सांगीतले़ माझ्या तरुण सहकार्यांनी तर साहेब हेच आमचे आदर्श असल्याचे सांगीतले तेव्हा खरंच नेतृत्व कसे घडवले पाहिजे हे लातूरच्या जनतेकडून शिकले पाहिजे, याची प्रचिती आली, असे सांगतांना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी साहेबांचे किस्से सांगीतले़.

विलासरावजी मोठ्या आणि मोकळ्या मनाचे
यावेळी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे म्हणाले, विलासरावजींच्या विरोधात मी चार वेळा निवडणुका लढलो़ प्रत्येक वेळी त्यांच्याकडून माझा पराभव झाला़ परंतू, आमच्यातील संबंध कधीच बिघडले नाही़ ते खुप मोठ्या आणि मोकळ्या मनाचे होते़ अत्यंत चांगली राजकीय संस्कृती त्यांनी येथे रुजवली़ परंतू, काँग्रेस पक्षातून बाहेर पडून विलासरावजींच्या विरोधात ज्या महान नेत्यांनी निवडणुक लढली त्यांनी विलासरावजींवर वैयक्तीक टिका, टिप्पणी केली़ विलासरावजींकडून पराभूत झाल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये यावे वाटले विलासरावजींनी त्यांना मोठ्या मनाने काँग्रेसमध्ये घेतले़ असा मोठा माणुस आता होणे नाही, असेही ते म्हणाले़.

यावेळी अॅड़ बी़ व्ही़ मोतीपळे, डॉ़ सोमनाथ रोडे यांनीही विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला़ प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केले़ प्रारंभी डॉ़. कल्याण बरमदे, डॉ़ चेतन सारडा, डॉ़. अशोक पोद्दार, संतोष बिराजदार, योगेश कर्वा यांनी सर्व पाहूण्यांचे स्वागत केले़. सुत्रसंचालन भारत सातपूते, प्रा़ गणेश बेळंबे यांनी केले तर योगेश कर्वा यांनी आभार मानले़ या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते़.
—————